Skip to main content
x

शेडगे, कमल जयंत

          मल शेडगे यांचे शालेय शिक्षण गिरगावातील ओरिएण्ट हायस्कूलमध्ये झाले. त्यांचे वडील ‘टाइम्स ऑफ इंडिया’त नियतकालिकांची शीर्षके बनवण्याचे काम करीत असत. शेडगे यांना वाचनाची आवड होती आणि ‘फिल्मफेअर’सारख्या नियतकालिकांमधली नट-नट्यांची चित्रे काढण्याचा, अक्षरांची नवी वळणे गिरवण्याचा त्यांना छंद होता. यातूनच त्यांचे कलाशिक्षण घडत गेले. कोणत्याही कलाशिक्षणसंस्थेत जाऊन त्यांनी कलेचे शिक्षण घेतलेले नाही.

शेडगे यांच्या वडिलांनी आपल्या मुलातले चित्रकलेतले गुण ओळखले आणि एक दिवस ते ‘टाइम्स’च्या कलाविभागाचे प्रमुख वॉल्टर लँगहॅमर यांच्याकडे कमल शेडग्यांना घेऊन गेले. लँगहॅमर यांनी शेडगे यांचे काम पाहून त्यांना लगेच नोकरी दिली. अशा तर्‍हेने १९५६ मध्ये शेडगे ‘टाइम्स’च्या कलाविभागात काम करू लागले.

रमेश संझगिरी १९५९ साली ‘टाइम्स’चे कलादिग्दर्शक म्हणून रुजू झाले. त्यांनी शीर्षक ही केवळ अक्षरजुळणी न करता ते डिझाइन म्हणून कसे करावे याचा मंत्र दिला. शेडगे यांनी ‘फिल्मफेअर’, ‘फेमिना’, ‘माधुरी’ अशा नियतकालिकांसाठी शीर्षके तयार केली. शेडगे यांच्या कलागुणांना १९६२ साली ‘महाराष्ट्र टाइम्स’ सुरू झाल्यावर अधिक वाव मिळाला आणि वृत्तपत्रांच्या मांडणीला त्यांनी एक दर्जा प्राप्त करून दिला.

नाटकांच्या जाहिरातींमध्ये त्यांनी कायापालट घडवून आणला, तो १९६५ साली ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ ,'गारंबीचा बापू', ' स्वामी', 'लग्नाची बेडी' अशा अनेक नाटकाच्या जाहिराती तसेच 'एक रात्र मंतरलेली', 'बयो', ' एक फुल, तीन हाफ' अशा मराठी सिनेमांची टायटल्स आणि 'भुलभुलैय्या', 'प्यारे मोहन', 'सरकार राज' अशा हिंदी सिनेमांची टायटल्स त्यांनी तयार केली. याखेरीज  शेडगे यांनी पुस्तकांची मुखपृष्ठे, ध्वनिमुद्रिकांची वेष्टणे अशी विविध प्रकारची कामे केली. ते १९९० साली ‘टाइम्स’मधून निवृत्त झाले आणि त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. आपल्या अक्षररचनेच वाटचाल सांगणारी  ‘माझी अक्षरगाथा’ (१९९५), ‘चित्राक्षरं’ (२००२) आणि ‘कमलाक्षरं’ (२००९) अशी तीन पुस्तके त्यांनी  प्रकाशित केली. आपल्या अक्षरकलाकृतींची प्रदर्शनेही त्यांनी आयोजित केली. 

आपल्याकडे सुलेखनकलेची (कॅलिग्रफी) परंपरा समर्थ रामदासांपासून आहे. मुद्रणकलेच्या  आगमनानंतर मुद्राक्षरांच्या (टाइप्स) रचनेत निर्णयसागरने एक नवा मापदंड निर्माण केला. संगणक आल्यानंतर संगणकाक्षरी अक्षरसंचांचा (डिजिटल फॉण्ट्सचा) जमाना आला. कमल शेडगे ज्या काळात काम करत होते, तेव्हा देवनागरी मुद्राक्षरांमध्ये अक्षरवळणांची विविधता नव्हती. जाहिरातक्षेत्राचा विस्तार भारतीय भाषांमध्ये होऊ लागला होता. त्यासाठी इंग्रजी म्हणजेच रोमन लिपीतील अक्षरवळणांशी संवाद साधू शकतील अशी अक्षरवळणे मराठी अथवा देवनागरी लिपीत असणे गरजेचे होते.

शेडगे यांनी सेरिफ/सॅन्सेरिफ अशा इंग्रजी भाषेसाठी वापरल्या जाणार्‍या अक्षरवळणांना समांतर अशी देवनागरी अक्षरवळणे त्यांच्या जाड, बारीक वजनांसकट (बोल्ड, लाइट) मराठीत व देवनागरीत समर्थपणे आणली आणि मराठी अक्षरांकनाचे (लेटरिंग) रूपच पालटून टाकले. आज संगणकावर आपण जे अक्षरवळणांचे अक्षरसंच (फॉण्ट्स) पाहतो, त्यांची सुरुवात कमल शेडगे यांनी केली. ‘महाराष्ट्र टाइम्स’चा सुरुवातीचा लोगो (बोधचिन्ह), ‘कालनिर्णय दिनदर्शिका’, ‘किर्लोस्कर’ व ‘चंदेरी’ यांसारखी नियतकालिके आणि अनेक नाटक-चित्रपटांचे लोगो म्हणजेच अक्षरनामांकने शेडगे यांच्या खास शैलीतून तयार झालेले दिसतात .

नाटकांच्या जाहिरातींमधून शेडगे यांनी प्रेक्षकांची अभिरुची अधिक चोखंदळ करण्याचे काम केले. त्यांनी नाट्यप्रयोगाला प्रयोगमूल्य आणि संहितेचे साहित्यमूल्य यापेक्षा वेगळा असा परिचय (ब्रँड आयडेंटिटी) दिला. अशा ह्या महान सुलेखनकाराचे वयाच्या ८५ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.

- रंजन जोशी, दीपक घारे

शेडगे, कमल जयंत