Skip to main content
x

शेख, फैय्याज ईमाम

फैय्याज

     भिनयाची  उपजत असलेली समज आणि जोडीला सुरेल आवाज या गुणांनी फैय्याज शेख यांनी नाट्य-चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण केली. फैय्याज यांना त्यांच्या आईकडून गायनाचा वारसा मिळाला.

      सोलापूरला आपल्या भावंडांसमवेत आजीकडे राहणाऱ्या फैय्याज यांना शाळेपासूनच गाण्याची, अभिनयाची आणि नृत्याची आवड होती. आपले शिक्षण सांभाळून त्या मेळ्यांमध्ये, कलापथकात सहभागी होत असत. लहानपणापासूनच त्यांचे हिंदी आणि मराठी भाषांवर प्रभुत्व होते. शिक्षणाची विलक्षण ओढ असूनही त्यांनी नाइलाजाने चरितार्थाचा मार्ग म्हणून नाट्यसृष्टीत प्रवेश केला. त्यांना १९६५ साली ‘गीत गाइले आसवांनी’ या सुमती धनवटे यांच्या संगीत नाटकात काम करण्याची संधी मिळाली. नाटक विशेष चालले नाही, तरी ‘फैय्याज’ हे नाव मात्र अधोरेखित झाले. त्याच दरम्यान त्यांची प्रभाकर पणशीकर यांच्याशी ओळख झाली. त्यांनी फैय्याज यांना ‘मदनाची मंजिरी’ या नाटकात भूमिका दिली. फैय्याज यांनी १९६६ साली ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकापासून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. नाटकांमध्ये भूमिका करत असतानाच त्यांनी पं. जितेंद्र अभिषेकी, सी.आर. व्यास आणि बेगम अख्तर यांच्याकडे गायनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकामध्ये समरसून केलेली ‘झरीना’ची भूमिका आणि ‘लागी कलेजवा कटार’, ‘नाहक झाले मी बदनाम’ ही त्यांची गाणी विलक्षण लोकप्रिय झाली. अभिनयसंपन्न, गुणी गायक नटी म्हणून ‘फैय्याज’ हे नाव कायम झाले. ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘होनाजी बाळा’, ‘तो मी नव्हेच’, ‘संत तुकाराम’, ‘अंधार माझा सोबती’, ‘मत्स्यगंधा’ अशा नाटकांमधून त्यांनी अभिनय केला.

     ‘कट्यार’मधील त्यांची भूमिका पाहून दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांनी ‘सबसे बडा सुख’ या हिंदी चित्रपटात फैय्याज यांना नायिकेची भूमिका दिली. अभिनयाबरोबर फैय्याज यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी पार्श्‍वगायनही केले आहे. ‘बावर्ची’, ‘प्रेमपर्बत’, ‘अचानक’, ‘रंगबिरंगी’, ‘गोकुल का चोर’, ‘आलाप’, ‘जुंबिश’ या हिंदी चित्रपटांतील काही गाणी त्या गायल्या आहेत. फैय्याज यांनी राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘पाठराखीण’ या चित्रपटात दोन लावण्या गायल्या आहेत. गाण्यावर मनापासून प्रेम असलेल्या फैय्याज यांचा ‘हुस्न-ए-गजल’ हा गजलसंग्रह एच.एम.व्ही.ने प्रसिद्ध केला.

      गायन आणि नाटक यामध्ये गुंतलेल्या फैय्याज यांनी मराठी चित्रपटालाही योगदान दिले. महेश सातोस्कर यांनी त्यांना ‘महानंदा’ (१९८४) या चित्रपटात महत्त्वाची आणि गंभीर भूमिका दिली. चित्रपटाचे कथानक, गोव्याच्या पार्श्‍वभूमीवर असलेली ‘देवदासी’ची, एका भाविणीची गोष्ट आणि ‘माझो लवतोय डावा डोळा’ आणि ‘माजे रानी माझे मोगा’ ही फैय्याज यांच्यावर चित्रित झालेली गीते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. ‘वजीर’ या १९९४ साली आलेल्या राजकीय पार्श्‍वभूमीच्या चित्रपटात अशोक सराफ, विक्रम गोखले, आशुतोष गोवारीकर, अश्‍विनी भावे या अभिनयकुशल सहकाऱ्यांबरोबर महत्त्वपूर्ण भूमिकाही त्यांनी साकारली. ‘एक उनाड दिवस’ या चित्रपटात अशोक सराफ आणि सुधीर जोशी या सहकलाकारांबरोबर त्यांनी चरित्र भूमिका साकारली. ‘पैंजण’ (१९९५) या चित्रपटात त्यांनी अशोक सराफ, निळू फुले, अजिंक्य देव, मच्छींंद्र कांबळी, वर्षा उसगावकर यांच्याबरोबर चरित्र भूमिका केली. चित्रपटापेक्षा नाटकाला अधिक पसंती देणाऱ्या फैय्याज यांना ‘बालगंधर्व’ पुरस्कार, गोवा सरकारचा ‘रघुवीर सावरकर’ पुरस्कार, रंगभूमीच्या सेवेकरता ‘मामा वरेरकर’ पुरस्कार, नाट्यदर्पणचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार इ, सन्मान प्राप्त झाले आहेत.

     गायन, नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका यासोबतच राज्य शासनाच्या ‘शालेय विद्यार्थ्यांच्या समूहगीत गायनाच्या’ उपक्रमात फैय्याज यांनी आनंदाने सहभाग घेतला. राम गबाले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खेडोपाडी, विद्यार्थ्यांना तीन दिवसांच्या प्रशिक्षणवर्गात समूहगीते शिकवण्याचा आनंदही त्यांनी घेतला आहे.

     आजही गाण्यावरचे प्रेम जपत त्याच उमेदीने फैय्याज शेख चित्रपटांतून आणि दूरदर्शन मालिकांमधून रसिकांना आनंद देत आहेत.

- नेहा वैशंपायन

संदर्भ
१) गोखले वा.वा., 'संगीतातील माणिकमोती', रोहन प्रकाशन, पुणे; २००४.
शेख, फैय्याज ईमाम