Skip to main content
x

शेळके, शांता जनार्दन

             राठी चित्रपटसृष्टीसाठी उत्कृष्ट, भावानुकूल गीतरचना लिहिणार्‍या गीतकार आणि श्रेष्ठ कवयित्री म्हणून चित्रपटसृष्टी आणि काव्यजगत या दोन्ही प्रांतात शांताबाई शेळके यांचे नाव सन्मानाने घेतले जाते. पत्रकारिता व प्राध्यापक म्हणून अध्यापनाबरोबरच कथा, कादंबरी, अनुवाद, ललित लेखन, बालवाङ्मय, कविता व चित्रपटगीते अशा साहित्याच्या सर्व प्रांतात त्यांनी लीलया संचार केला.

शंभरहून अधिक पुस्तके आणि तीनशेपेक्षा अधिक मराठी चित्रपटांसाठी गीते रचणार्‍या शांताबाई या एम.ए. होणार्‍या, कोष्टी समाजातल्या पहिल्या महिला होत्या. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात इंदापूर येथे झाला. शांताबाईंचे वडील जनार्दन शेळके वनाधिकारी होते आणि त्यांना साहित्याविषयी प्रेम होते.

शांताबाईंच्या आईदेखील चार इयत्ता शिकलेल्या होत्या. वाचनाचे वेड असलेल्या शांताबाईंच्या आईने, अंबिकाबाई यांनी आपल्या मुलीला लिहायला-वाचायला शिकवले. खेड, मंचर या परिसरात शांताबाईंचे बालपण गेले; पण त्या नऊ वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचा आकस्मिक मृत्यू झाला आणि त्यांची चार भावंडे व आई यांच्यासह त्या पुण्याला काकांकडे राहायला आल्या. पुण्यात आल्यावर हुजूरपागेमध्ये शांताबाईंचे शालेय शिक्षण, तर सर परशुरामभाऊ महाविद्यालयात उच्चशिक्षण झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी आणि संस्कृत विषयातून एम.ए.ची पदवी घेतली. मुंबई विद्यापीठात त्या पहिल्या आल्या आणि न.चिं. केळकर तसेच चिपळूणकर पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या. रामराम पाव्हणंया चित्रपटातून दिनकर द. पाटील यांनी शांताबाईंना १९५० साली चित्रपटासाठी गीतलेखन करण्याची पहिली संधी दिली. या चित्रपटाला संगीत होते लता मंगेशकर यांचे. या चित्रपटाने शांताबाईंचे नाव घराघरात पोहोचले.

चित्रपटांसाठी गाणी कशी लिहावीत याचा नेमका वस्तुपाठ मात्र त्यांना भालजी पेंढारकर यांनी दिला. नुकत्याच एम.ए. झालेल्या शांताबाईंना चिंतामणराव कोल्हटकरांच्या शिफारशीमुळे भालजींनी स्वराज्याचा शिलेदारया चित्रपटाची गाणी लिहिण्यासाठी कोल्हापूरला बोलावून घेतले. संगीत दिग्दर्शक होते दत्ता डावजेकर. पण प्रयत्नांची शिकस्त करूनही शांताबाईंना गाणी जमेनात, तेव्हा भालजी म्हणाले, “काहीतरी ललला, डडडा गुणगुणत राहा. आपोआप शब्द सुचतील. गाणी अवघड नकोत. सोपी हवीत. मुखडा सोपा, लोकांना कळतील असे शब्द हवेत. वाङ्मय-साहित्य सारे विसरा. एकमेकांशी बोलतो आहोत अशा भाषेत लिहा. सुचेल. आपोआप सुचेल.भालजींच्या मार्गदर्शनाने, प्रोत्साहनाने स्वराज्याचा शिलेदारची गाणी लिहून झाली. पुढे शिवा रामोशीचित्रपटाचे गीतलेखनही भालजींनी त्यांच्याकडून करून घेतले.

शांताबाईंनी लता मंगेशकर यांच्या संगीत निर्देशनात मोहित्यांची मंजुळासाठी आणि मराठी तितुका मेळवावासाठी (एखाद्या गीताचा अपवाद वगळता) गीते लिहिली. मराठा तितुका मेळवावामधली रेशमाच्या रेघांनीही लावणी अत्यंत लोकप्रिय झाली. संगीतकार वसंत पवार यांच्याबरोबर अनंत माने यांच्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. प्रख्यात संगीतकार-गायक सुधीर फडके यांच्याबरोबर १९६१-६२ च्या सुमाराला हा माझा मार्ग एकला’, ‘माझी आई’, ‘सोनियाची पावले’, ‘कलंकशोभाया चित्रपटांसाठी लिहिलेल्या गाण्यांनी शांताबाईंना रसिकांचे प्रेम मिळवून दिले. हा माझा मार्ग एकलामधली गीते स्वत: शांताबाईंनाही आवडायची. शांताबाईंनी बाबूजींसाठी लिहिलेले तोच चंद्रमा नभातहे एकदम प्रसिद्धीच्या झोतात आलेले त्यांचे गीत.

१९५० सालापासून लता मंगेशकर, दत्ता डावजेकर, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, वसंत पवार, बाळ पार्टे, राम कदम, विश्वनाथ मोरे, भास्कर चंदावरकर, अनिल-अरुण, सुहासचंद्र कुलकर्णी, श्रीधर फडके अशा संगीतकारांबरोबर सुरू राहिलेले शांताबाईंचे चित्रपटगीत लेखन, त्यांच्या मृत्यूनंतर २००४ साली प्रदर्शित झालेल्या आभाळाची सावलीतल्या येई लडिवाळे कान्हाबाईया गीतापर्यंत रसिकांच्या भेटीला येत राहिले. कौशल इनामदार, सलील कुलकर्णी या अगदी तरुण संगीतकारांसाठीही त्यांनी गीतलेखन केले. महानंदा’, ‘कलंकशोभा’, ‘गारंबीचा बापू’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘तांबडी माती’, ‘भुजंग’, ‘मंगळसूत्र’, ‘अवघाचि संसार’, ‘साता जन्माचा सोबतीआदि चित्रपटांतील त्यांची गीते विशेष गाजली. रेशमाच्या रेघांनी’ (मराठा तितुका मेळवावा), ‘चांदण टिपूर हलतो वारा की डुलतो वारा’ (गारंबीचा बापू) या लावण्या लिहिणार्‍या शांताबाई या मराठीतल्या दुर्मीळ स्त्री-लावणीकार आहेत. मराठीप्रमाणेच अन्य भाषिक गीतांच्या आणि संगीताच्या आधारे त्यांनी गाणी लिहिली. एकाच गीताचे चरण मराठी आणि हिंदी अशा दोनही भाषांमधून लिहिण्याचे प्रयोग त्यांनी सहज केले.

नादमधुर शब्द, चित्रदर्शी शैली, लालित्य, नाट्यमयता, उत्तम भावपरिपोष आणि मुख्य म्हणजे आकर्षक मुखडा या गुणांमुळे शांताबाईंची चित्रपटगीते रसिकांच्या मनात स्वतंत्र स्थान मिळवून आहेत.

डॉ. वसंत अवसरेहे काही तांत्रिक कारणाने शांताबाईंनी गीतलेखनासाठी घेतलेले टोपणनाव. शांताबाईंनी अवघाचि संसार’, ‘साता जन्मांचा सोबती’, या चित्रपटासाठी डॉ. वसंत अवसरेया टोपणनावाने गीते लिहिली. जे वेड मजला लागलेसारखी टोपणनावाने त्यांनी लिहिलेली गाणी खूपच गाजली. चालीवर गीत बांधणे हा कवीसाठी स्वातंत्र्याचा संकोच असतो, असे अनेक प्रतिभाशाली कवींना वाटत आले आहे. शांताबाईंच्या बाबतीत मात्र तो कवीच्या अभिव्यक्तीच्या कक्षा विस्तारणारा एक समृद्ध अनुभव ठरला. स्वतंत्रपणे उत्तम कवितालेखन करणार्‍या शांताबाईंना संगीतकाराने दिलेल्या चालींवर गीतलेखन करणे हे आव्हान वाटत असे. लयीचे मार्मिक भान, शब्दांचा मोठा संग्रह, शब्दांच्या उपयोजनाची नेमकी जाण आणि गीताची विविध वजने, चालीतील खटके, विराम, अर्धविराम यांच्या उपाययोजनांचे अचूक कौशल्य या सर्व गुणवैशिष्ट्यांनी त्यांनी संगीतकारांच्या सर्जनशीलतेला संपन्न करणारे गीतलेखन केले.

शांताबाईंच्या चित्रपटगीतांवर रसिकांनी जसे प्रेम केले, तशीच पुरस्कारांनीही यशाची मोहोर उमटवली. महानंदाचित्रपटातल्या मागे उभा मंगेश... पुढे उभा मंगेशया गीतासाठी सूरसिंगार, ‘भुजंगचित्रपटाच्या गाण्यासाठी भारत सरकारचा सर्वोत्कृष्ट गीताचा पुरस्कार, १९९६ सालचा ग.दि.मा. पुरस्कारतर २००१ चा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार असे पुरस्कार त्यांना लाभले. १९६५ साली आळंदीला झालेल्या ६९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शांताबाईंची बिनविरोध निवड झाली. कुसुमावती देशपांडे, दुर्गाबाई भागवत यांच्यानंतर हा मान मिळालेल्या शांताबाई या तिसर्‍या लेखिका, पण कवयित्री पहिल्याच होत्या.

कारागिरी आणि प्रतिभा यांचे साहचर्य उमजून प्रसंगोपात्त रचना आणि सर्जन यांचा दुहेरी देखणा प्रवास दीर्घकाळापर्यंत रसिकप्रियतेसह करणार्‍या शांताबाईंना मृत्यूने हाक दिली कॅन्सरच्या निमित्ताने. पुण्यात शांताबाई यांचे निधन झाले.

- स्वाती प्रभुमिराशी

संदर्भ
१) 'धूळपाटी', शेळके शांता, दिनपुष्प प्रकाशन; १९३९.
२) 'शब्दव्रती शांताबाई', उपाध्ये नीला, पुरुषोत्तम प्रकाशन; १९९६.
शेळके, शांता जनार्दन