Skip to main content
x

शेट्ये, सतीश रामनाथ

     तीश रामनाथ शेट्ये यांचा जन्म गोव्यात झाला. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण गोव्यात झाल्यावर त्यांनी मुंबईच्या आय.आय.टी.मधून १९७३ साली भौतिकशास्त्रात एम.एस्सी. केले. १९८२ साली त्यांनी अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठातून फिजिकल ओशनोग्राफी या विषयात पीएच.डी. केली. त्यानंतर ते लगेच गोव्यात परत आले आणि राष्ट्रीय सागर संशोधन संस्थेत नोकरी पत्करून त्यांनी संशोधनास सुरुवात केली. झुआरी खाडीतील पाण्याचा क्षारांश कसा बदलतो या अभ्यासाने त्यांच्या संशोधनाला सुरुवात झाली. भारतीय किनाऱ्यांवरील समुद्राच्या पातळीत फरक कसा पडतो, त्याचे घटक कोणते, बंगालच्या उपसागराची पातळी अरबी समुद्राच्या पातळीपेक्षा जास्त का आहे, अरबी समुद्राच्या वरच्या पातळीचे तापमान ऋतुमानाप्रमाणे कसे आणि का बदलते, अशा अनेक विषयांवर त्यांनी संशोधन केले.

     भारताच्या किनाऱ्यावर असंख्य खाड्या आहेत. त्यांच्यामुळे मत्स्योत्पादन, काठावरच्या तिवरामुळे होणारे प्रदूषण नियंत्रण व नैसर्गिक जीवनचक्राला होणारी मदत, पावसाचे पाणी वाहून नद्या आणि खाड्यांना मिळण्यापूर्वी जमिनीत किती मुरते, त्यातून नत्र क्षारांमुळे जैविक आणि कोणते जैवरासायनिक परिणाम होण्याची शक्यता असते, यांवरही त्यांनी संशोधन केले. भारताचा आर्थिक कणा शेती आहे. ही शेती पावसावर अवलंबून आहे. त्याविषयीचे अंदाज वर्तविणे शेट्ये यांच्या संशोधनामुळे सुलभ झाले.

     खंबायतच्या आखातापासून बंगालच्या उपसागरापर्यंत किनाऱ्यानजीक आणि थोडे दूर सागराच्या हालचाली, प्रवाहांची दिशा, यांचाही त्यांनी अभ्यास केला. सर्व्हे ऑफ इंडिया आणि इतर सहकारी संस्था, जलस्थिती शास्त्र संशोधक संस्था यांच्याशी समन्वय साधून त्यांनी संशोधन केले.

     त्यांनी जागतिक पातळीवर सामुद्रिक आणि सागरभूतलाच्या हालचाली, त्सुनामीसारख्या अस्मानी संकटाची जाणीव व व्याप्ती, तीव्रता, उगम यांचे संशोधन केले. त्यातून काढलेल्या निष्कर्षांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. ईशान्य अरबी समुद्रावर होणाऱ्या पावसाळी ढगांचा युनेस्कोने पुरस्कृत केलेला अभ्यास, हिंदी महासागराच्या किनाऱ्याला लागून असलेल्या राष्ट्रांच्या किनाऱ्यावरील भरती ओहोट्यांची पाहणी, उत्तर हिंदी समुद्राचा मॉन्सूनवर होणाऱ्या परिणामांचा फ्रान्सच्या सहकार्याने अभ्यास, जागतिक समुद्रपातळ्यांच्या अभ्यासगटातील सहभाग, वारे, लाटा आणि प्रवाह यांचा स्वतंत्र आणि संयुक्त संबंध, परिणाम अशा अनेक अभ्यासगटांचे नेतृत्व अथवा त्यांतील त्यांचा सहभाग देश-विदेश पातळीवर महत्त्वाचा ठरला.

     या सर्व कामांमुळे त्यांची २१ मार्च २००४ रोजी राष्ट्रीय सागर संशोधन संस्थेच्या संचालकपदी नेमणूक झाली.

     १९९२ साली बंगळुरूच्या ‘इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस’ने त्यांना फेलो केले. त्याच वर्षी त्यांना जमीन, वातावरण, सागर आणि पर्यावरण शास्त्रातील त्यांच्या अभ्यासासाठी शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला. १९९७ साली दिल्लीच्या इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीने त्यांना फेलो केले. २००० साली पुण्यात भरलेल्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’च्या अधिवेशनात त्यांना ‘न्यू मिलेनियम सायन्स पुरस्कार’ मिळाला. २००१ साली ते अलाहाबादच्या ‘अकॅडमी ऑफ सायन्स’चे फेलो झाले. २००१ सालापासूनच ते ‘इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या ‘अर्थ आणि प्लॅनेटरी सायन्सेस’च्या कार्यवृत्ताचे संपादक म्हणून नेमले गेले.

अ. पां. देशपांडे

शेट्ये, सतीश रामनाथ