Skip to main content
x

सेठ, विजय नारायण

विन्स

          ‘विन्स’ या नावानेच विजय नारायण सेठ या कलावंताची कलारसिकांना ओळख आहे. प्रामुख्याने व्यंगचित्रकार म्हणून प्रख्यात असलेले विन्स इतर व्यंगचित्रकारांहून एक वेगळे वैशिष्ट्य असलेले कलाकार आहेत. कोणत्याही व्यंग-चित्राला चित्रकलेचाच आधार असतो हे खरे असले तरी इतर व्यंगचित्रकार त्यांची कलाकृती व्यंगचित्र म्हणून सादर करतात. म्हणजे व्यंगचित्राची म्हणून जी लक्षणे असतात, तीच त्यामध्ये असतात. ती पेंटिंग अथवा कलाकृतीपेक्षा वेगळी असतात. थोडक्यात, पेंटर आणि व्यंगचित्रकार हे दोन अलग प्रकारचे कलावंत आहेत. विन्स यांचे  वैशिष्ट्य हे, की ते रसिकांना पेंटिंगही सादर करतात आणि व्यंगचित्रेही.

          दिल्ली येथे १९४४ मध्ये जन्मलेल्या ‘विन्स’ यांनी बालपणीच्या वास्तव्यानंतर तेथून मुंबईला स्थलांतर केले. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या प्रख्यात संस्थेमधून १९६८ मध्ये फाइन आर्ट शाखेची पदविका संपादन केल्यावर ते मुंबईमध्ये स्थायिक झाले. भारतीय, तसेच विविध आंतरराष्ट्रीय प्रकाशनांसाठी व्यंगचित्रकार, कथाचित्रकार त्याचप्रमाणे पेंटर म्हणून गेल्या ३५ वर्षांमध्ये त्यांचा लौकिक प्रस्थापित झालेला आहे. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी केलेल्या कामाचा स्वदेशात, तसेच परदेशांत गौरव झाला आहे व त्यांना सन्मानित केले गेलेले आहे.

          २००९ मध्ये ‘चॅनल ६ हैद्राबाद’ यांनी आयोजिलेल्या छायाचित्रणाच्या स्पर्धेमध्ये त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले. व्यंगचित्रकार म्हणून त्यांना मिळालेल्या सन्मानांची यादी तर भरपूर दीर्घ आहे. त्यांपैकी काही निवडकच उल्लेखायचे तर इस्रायल येथील सहाव्या हायका आंतरराष्ट्रीय कार्टून स्पर्धेत मिळालेले उत्कृष्टतेचे मानांकन; स्विस कोएलेशन डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या संस्थेच्या स्पर्धेतले प्रथम क्रमांकाचे बक्षीस; बासेल, स्वित्झरलँड येथील म्यूझियमसाठी घेतलेल्या कलाकृती; कोेरियामधील तैजाँ येथील, तसेच एडिंबरा येथील कार्टून यात्रेत मिळालेली पारितोषिके इ.इ. असे सांगता येतील. काही कार्टून फेस्टिव्हल्समध्ये विन्स यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले, त्यांमध्ये बुडापेस्ट हंगेरी, बेल्जियम, दक्षिण पॅरिस, सॅलन कार्टून्स माँट्रियल, कॅनडा इत्यादींचा समावेश आहे. त्यांच्या व्यंगचित्रांची प्रदर्शने फ्रान्स, बेल्जियम, इस्तंबूल (तुर्कस्थान) येथे झाली. त्याप्रमाणेच मुंबईमध्ये १९९७ मध्ये अलायन्स फ्राँसे यांच्यातर्फे प्रदर्शन भरवले गेले.

          सन्माननीय निष्णात कलावंत म्हणून त्यांच्यावर सोपवलेल्या काही जबाबदार्‍या अशा आहेत : कोबे, जपान येथील शोई कम्युनिटी कॉलेजमध्ये प्रात्यक्षिकासह व्याख्यान, हैद्राबाद येथील ‘जागतिक विनोद कॉन्फरन्स’चे उद्घाटन, भारतात व परदेशात होणार्‍या कार्टून वर्कशॉपसाठी सल्ला, हैद्राबादच्या एशियन गेम्सच्या वेळच्या ‘क्रोकर्व्हल क्लब’ या कार्टून स्पर्धेमध्ये परीक्षक. ‘चॅनल ६’, ‘रीडर्स डायजेस्ट’, ‘इंडियन एक्स्प्रेस’, ‘बिझनेस वर्ल्ड’, ‘सायन्स टुडे’ या भारतीय, तर झुरिच, स्वित्झरर्लंड इ. परदेशी वृत्तपत्रांसाठी विन्स व्यंगचित्रे करतात. मुंबईतील ‘हिंमत’ या साप्ताहिकामध्ये ते व्यंगचित्रकार म्हणून काम करतात.

          न्यू दिल्ली येथील स्विस परराष्ट्र खात्याकडून प्रसिद्ध होणाऱ्या ‘२००८ इंडो-स्विस बिझनेस’ या प्रकाशनात एक संपूर्ण पानभर जागेत ‘अ कार्टूनिस्ट विथ अ स्विस माइण्डसेट’ या मथळ्याखाली विन्स यांची तपशीलवार माहिती दिली होती. त्याचा मुख्य मुद्दा विन्स हे स्विस मानसिकता असलेले व्यंगचित्रकार कसे आहेत हा होता.

          सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे विन्स हे नुसतेच व्यंगचित्रकार नाहीत, ते चित्रकार, पेंटरही आहेत. त्या दिशेने त्यांचे काम सतत चालू असते. त्यांची गोव्यातली रेखाटने, इतर  विविध स्केचेस पाहिली की हे जाणवते. बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्ट्सचे ते मानद उपाध्यक्ष आहेत.

- वसंत सरवटे

सेठ, विजय नारायण