Skip to main content
x

शेवाळकर, राम बाळकृष्ण

     वक्ते, ललितनिबंधकार, समीक्षक, संपादक, संशोधक राम शेवाळकर यांचा जन्म बाळकृष्ण व गोपिका ह्या दाम्पत्याच्या पोटी, विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर (जुने एलिचपूर) ह्या गावी झाला. हिंगोली - नांदेड मार्गावर कयाधू नदीकाठावरचे शेवाळा हे शेवाळकर घराण्याचे मूळ गाव. हे घराणे धार्मिक, परंपरावादी, कीर्तन - प्रवचनाची व साधुपुरुषांची परंपरा असलेले होते. मूळ आडनाव धर्माधिकारी. पणजोबा रामशास्त्री उपाख्य रामकृष्णानंदस्वामी महाराज हे तत्कालीन ख्यातनाम प्रवचनकार होते. वडील बाळकृष्ण उर्फ भाऊसाहेब हेसुद्धा कीर्तनकेसरी म्हणून विख्यात होते.

     त्यांचे प्राथमिक ते मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण अचलपूरच्या नगरपरिषद शाळांमध्ये झाले, तर पुढचे महाविद्यालयीन शिक्षण अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात झाले. तिथेच शेवाळकरांच्या व्यक्तित्वाची व वक्तृत्वाची जडणघडण होत गेली. लेखक, वक्ता व सार्वजनिक कार्यकर्ता या तीनही भूमिकांची पायाभरणी अमरावतीला झाली असे शेवाळकरांनी स्वतः नमूद केले आहे. १९५०मध्ये बी.ए. झाल्यावर नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयामधून त्यांनी संस्कृत विषयात एम.ए.ची पदवी प्राप्त केली. दरम्यान, नागपुरातच कवी - साहित्यिकांच्या सहवासात त्यांच्या काव्यलेखनाला प्रारंभ झाला व साहित्यविषयक जडणघडण होत गेली. त्यानंतर वाशीमच्या शासकीय शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी अध्यापनास शुभारंभ केला. पुढे यवतमाळच्या ‘यवतमाळ महाविद्यालया’त ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्याच काळात खासगीरीत्या मराठी विषयात एम.ए.ची पदवी ना.के. बेहेरे सुवर्णपदकासह त्यांनी नागपूर विद्यापीठातून प्राप्त केली. १९५५ ते ६५ या कालावधीत पीपल्स कॉलेज नांदेड येथे मराठीचे अध्यापक व पुढे १९६५ ते १९८८ या दीर्घकाळात लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी, जि. यवतमाळ येथे प्राचार्यपदावर कार्य केले. आपल्या कार्यकाळातून त्यांनी वणीमध्ये अनेक साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांचा श्रीगणेशा केला आणि विदर्भातील सांस्कृतिक चळवळीचे एक केंद्र म्हणून त्यास नावारूपास आणले. ह्याच काळात शेवाळकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रभावी वक्ता आणि सांस्कृतिक, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ता व नेता हे पैलू विदर्भात व महाराष्ट्रात सुप्रतिष्ठित झाले.

      साठोत्तरकालीन महाराष्ट्राचे सांस्कृतिक नेतृत्व करतानाच मराठी रसिकांच्या अभिरुचीची जडणघडण ज्या काही मंडळींनी केली, त्यांमध्ये शेवाळकरांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागते. ललित लेखक किंवा समीक्षक किंवा संशोधक - संपादक म्हणून मराठी साहित्यविश्वात फारशी मान्यता न मिळताही जे नेतृत्व व मानसन्मान त्यांना मिळाले, ते केवळ त्यांच्या प्रभावी वक्तृत्वशैलीमुळे! रसाळ, ओघवती, संदर्भसंपृक्त, प्रसन्न, सोज्ज्वळ, शैलीदार आणि पल्लेदार अशा वाक्कौशल्यामुळे ते साहित्यजगतात व मराठी रसिकविश्वात मान्यता पावले. भारतात आणि जगात जिथे-जिथे मराठी समाज आहे, तिथे-तिथे शेवाळकरांची विविध विषयांवरची व्याख्याने झालेली आहेत. रामायण, महाभारत, त्यांतील विविध व्यक्तिरेखा, ज्ञानेश्वर, स्वा. सावरकर, प्राचीन मराठी साहित्य, विनोबा आणि त्यांचे विचार, गांधीजी आणि त्यांचे विचार, भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय परंपरा आणि संस्कृती, आधुनिक मराठी साहित्य आणि साहित्यिक इत्यादी विषयांवर त्यांनी शेकडो व्याख्याने गुंफली.

      रूढ अर्थाने ते साहित्यिक ठरले नाहीत, तरी वाणीमय वाङ्मयाचे ते श्रेष्ठतम निर्माते ठरले. त्यांचे वक्तृत्व हेच त्यांचे वाङ्मयीन कर्तृत्व ठरले. त्यांच्या भाषणांचे एक संपादन ‘वक्ता दशसहस्रेषु’ (सं.डॉ.वि.स.जोग, विदर्भ साहित्य संघ, १९९४) व निरूपणांची तीन ग्रंथरूपे ‘अवसेचे चांदणे’ (मानसन्मान प्रकाशन, पुणे, १९९६), ‘अमृताचा घनु’ (नीलकंठ प्रकाशन, पुणे, १९९९), ‘गाभारा’ (साहित्य प्रसार केंद्र, नागपूर, २००१) प्रसिद्ध आहेत. याशिवाय काही ध्वनिफिती व चित्रफिती प्रसिद्ध आहेत. त्यात स्वा. सावरकर, योगेश्वर कृष्ण, विनोबा, कर्ण, कानडा वो विठ्ठलु, ज्ञानेश्वरमाउली, पसायदान इत्यादींचा समावेश होतो.

      त्यांच्या लिखित वाङ्मयनिर्मितीतही वक्तृत्व प्रक्रियेचा मोठा वाटा आहे. भाषणासाठी पूर्वतयारीतून व भाषणांमधून त्यांच्या अनेक लेखसंग्रहांची निर्मिती झाली. त्यांच्या कवितेवर आणि लेखनशैलीवर वक्तृत्वाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. वक्ता - व्याख्याता शेवाळकरांच्या मध्यवर्ती व्यक्तिमत्त्वाचे ते साहित्यरूप आविष्कार ठरले.

      ‘असोशी’ या १९५६मध्ये प्रकाशित काव्यसंग्रहापासून सुरू झालेला त्यांचा वाङ्मयप्रवास शंभरावर ग्रंथनिर्मिती करीत आज ‘पाणियावरी मकरी’ (२००७) या आत्मचरित्रापर्यंत येऊन विसावला आहे. यात प्रामुख्याने काव्य, ललित निबंध, वैचारिक गद्य, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा, संपादन इत्यादी साहित्यव्यवहारांत त्यांनी मुशाफिरी केली. त्यांचे ‘रेघा’ (१९६७) व ‘अंगारा’ (१९८९) हे इतर दोन काव्यसंग्रह आणि ‘उजेडाची झाडे’ (१९६४), ‘अमृतसरी’ (१९७६), ‘त्रिदल’ (१९७६), ‘सारस्वताचे झाड’ (१९८९), ‘पूर्वेची प्रभा’ (१९८८), ‘प्रवास आणि सहवास’ (१९९८), ‘मोरपीस’ (२००१), ‘रामसेतू’ (२००४), ‘माणिकाच्या वाती’ (२००५), ‘आकार आणि सुवास’ (२००६) इत्यादी अनेक ललितनिबंधसंग्रह प्रसिद्ध आहेत. ललितनिबंधाच्या ‘आठवणी - अनुभव’, ‘लघुनिबंध’, ‘व्यक्तिचित्र’, ‘प्रवासलेख’ आणि ‘ललितलेख’ ह्या पाच उपप्रकारांत समाविष्ट होणार्‍या लेखनांत लालित्य आणि वैचारिकता ह्यांच्या सम्यक समन्वयातून आकारास आलेले दिसतात.

       शेवाळकरांनी ह्याशिवाय केलेले संशोधन संपादनकार्यही मराठी साहित्यासाठी महत्त्वाचे ठरणारे आहे. त्यांच्या महत्त्वपूर्ण संपादनांमध्ये ‘यशोधन’ (डॉ.य.खु. देशपांडे, १९८८), ‘अक्षरमाधव’ (डॉ. बापूजी अणे, खंड १ व २, अनुक्रमे १९६९ व १९८१), ‘निवडक मराठी आत्मकथा’ (साहित्य अकादमी, १९९४), ‘लोकमान्य टिळकांचे निबंध’ (नॅशनल बुक ट्रस्ट, १९९९), ‘तुलाधर’, ‘चित्रगुप्त’, ‘त्रिविक्रम’ (वा.ना. देशपांडे, खंड १, २ व ३, २००४) इत्यादींचा समावेश होतो. याशिवाय अनेक गौरवग्रंथ - स्मृतिग्रंथ समित्यांचे अध्यक्ष व संपादक म्हणूनही त्यांनी कार्य केले.

      नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी नानासाहेबांनी अक्षरशः शेकडो ग्रंथांना प्रस्तावना लिहिल्या. ग्रंथनिर्मितीविषयक शासकीय व अशासकीय समित्यांवर कार्य करताना अनेक शिक्षणक्रमविषयक व अन्य पुस्तकांच्या - प्रकल्पांच्या निर्मितीत त्यांनी मार्गदर्शन केले. ‘श्रीवत्स’ आणि ‘दीपकळी’ या दोन वार्षिकांकांचे संपादनही त्यांनी केले.

     शेवाळकरांच्या कार्यकर्तृत्वाची व्याप्ती साहित्याला लागूनच विशाल अशा संस्कृतीच्या परिघापर्यंत पसरली आहे. समाजप्रबोधनाचे कार्य करणार्‍या विविध संस्थांची निर्मिती त्यांनी केली, तसेच अशा अनेक संस्थांचे मार्गदर्शक - आधार ते बनले. पु.भा. स्मृती समिती, विश्व संतसाहित्य प्रतिष्ठान, मध्यभारत संशोधन संस्था, विदर्भ साहित्य संघ, म. रा. पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ, अ. भा. सानेगुरुजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, विश्वकोश निर्मिती मंडळ, साहित्य अकादमी, म. रा. साहित्य व संस्कृती मंडळ, नागपूर विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषद इत्यादी अनेक संस्थांचे ते सक्रिय पदाधिकारी होते. या कार्यात शेवाळकरांचा पक्ष - विचारधारा निरपेक्ष व केवळ समाजसापेक्ष अशा दृष्टिकोनातून दिसून येतो. विशेषतः, गांधीवादी - सर्वोदयी अशा वर्तुळात ते वावरले तरी हिंदुत्ववादी वा अन्य विचारविश्वाचे त्यांनी वावडे मानले नाही. गांधीजी आणि गुरुजी किंवा विनोबा आणि सावरकर अशी परस्परविरोधी मानली जाणारी व्यक्तिमत्त्वे शेवाळकरांच्या कार्यप्रवासात एकत्र नांदली.

       अनेक आघाड्यांवर काम करणार्‍या शेवाळकरांच्या वाट्याला साहित्य - संस्कृतीच्या क्षेत्रातील अनेक प्रमुख मानसन्मान सहजपणे आले. विदर्भ साहित्य सम्मेलन, भंडारा, १९७८, अ. भा. मराठी साहित्य सम्मेलन, पणजी, गोवा, १९९४, बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन, बोस्टन, अमेरिका १९९७, जागतिक मराठी सम्मेलन, नागपूर, २००४ इत्यादींची अध्यक्षपदे त्यांनी भूषविली. दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान कुसुमाग्रज पुरस्कार (१९९९), मानद डी.लिट. नागपूर विद्यापीठ (२००१), डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्कार (२००१), अ. भा. कीर्तनकुल समाजभूषण पुरस्कार (२००३), विदर्भ गौरव (२००३), वि. सा. संघाचा जीवनव्रती पुरस्कार (२००६), इत्यादी अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले.

       २००६ हे शेवाळकरांचे अमृतमहोत्सवी वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात अनेक सत्कारसमारंभांसह आयोजित करण्यात आले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा लोकसंग्रह - गुणसंग्राहक लोकनेता हा पैलू या निमित्ताने उजळून निघाला. ‘मराठी कविता: परंपरा आणि दर्शन’ (संपादक: डॉ. रवींद्र शोभणे, विजय प्रकाशन, नागपूर २००६) हा गौरवग्रंथ यानिमित्त प्रकाशित झाला. डॉ. मेधा देशपांडे यांचा ‘राम शेवाळकर : शारदीय चांदणे’ (विसा बुक्स, नागपूर २००७) हा ग्रंथही प्रकाशित झाला आहे. शिवाय ‘शेवाळकर नावाचा माणूस’ (माधव सरपटवार, २००५), ‘पत्रसंवाद’ (शोभा उबगडे, २००५), ‘प्राचार्य राम शेवाळकर : साहित्यसूची’ (डॉ.व.वि. कुलकर्णी, २००७) ही पुस्तके त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेतात.

       ललित साहित्यिक, संपादक, संशोधक, अध्यापक, संघटक, शिक्षणतज्ज्ञ इत्यादी अनेक पैलूंनी त्यांचे व्यक्तिमत्त्व बहरलेले असले तरी समकाळातील सर्वश्रेष्ठ मराठी भाषक वक्ते हाच त्यांच्या व्यक्तित्वाचा प्रधान पैलू असल्याचे दिसून येते.

- डॉ. राजेंद्र नाईकवाडे

शेवाळकर, राम बाळकृष्ण