Skip to main content
x

शहा, सुमतीबाई नेमचंद

     स्त्रीशिक्षण आणि स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून सुमतीबाई शहा यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री उन्नतीचे कार्य केले. सुमतीबाईंच्या आत्या राजुलमती यांना शिक्षण देण्यासाठी बनारसवरून पेंढारकर गुरुजींना बोलविण्यात आले होते. आत्या सोबत सुमतीबाईंनीही पडद्याआड बसून घरीच शिक्षण घेण्यास प्रारंभ केला.

      स्त्रियांच्या दु:स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच प्रमुख आहे म्हणून सुमतीबाईंनी आधी स्वत: शिक्षणाचा ध्यास घेतला. त्यांना संतचरित्रे वाचण्याचा छंद जडला. धर्मग्रंथाचे परिशीलन होऊ लागले व ‘लोकविलक्षण व्रत अंगीकारावं’ असे त्यांनी ठरवले. सोलापुरात सेवासदनमध्ये व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा पास झाल्यावर नववीसाठी जी. पी. पटवर्धन त्यांना घरी येऊन शिकवीत. धर्मग्रंथ, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र वगैरेसंबंधी चर्चा होई. पटवर्धनांप्रमाणे आचार्य शांतिसागर महाराजांचे मार्गदर्शन लाभले. सुमतीबाईंना साहित्याप्रमाणे वक्तृत्वाची गोडी लागली. “वाचनालये ही एक मोठी राष्ट्रीय संपत्ती आहे” असे त्या म्हणतात. हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत महर्षी कर्वे यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली. वयाच्या १९ व्या वर्षी सुमतीबाईंनी आजन्म ब्रह्मचर्य व्रताची प्रतिज्ञा घेतली. इंदूरला जाऊन त्यांनी संस्कृत परीक्षा दिल्या व पुढे बनारसला जाऊन ‘हिंदी साहित्याचार्य’ पदवी संपादन केली.

      निश्‍चय केल्याप्रमाणे शिक्षण, भरपूर वाचन करून, आजन्म ब्रह्मचर्याचे व्रत आचरताना ‘धार्मिक शिक्षणाची शिदोरी’ घेऊन त्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी सज्ज झाल्या. सुदैवाने त्यांचे कुटुंब शिक्षणप्रेमी होते आणि सुमतीबाईंच्या प्रयत्नांना त्यांचा पूर्ण पाठींबा होता. त्यांच्या आत्या राजुलमती पूर्णपणे धर्मप्रचारास लागल्याने श्राविकाश्रमाची सूत्रे सुमतीबाईंकडेच आली. या आश्रमाच्या माध्यमातून त्यांनी मुलींच्या शाळा काढल्या, गृहविज्ञान अभ्यासक्रमात समाविष्ट केले, मुलींसाठी वसतिगृहे काढली, एकट्या नोकरदार महिलांसाठी वसतीगृहाची सोय केली. सढळ हाताने देणग्या दिल्या, देणग्या जमा करण्यासाठी दौरे काढले. श्राविकाश्रमाच्या जागेत विद्यापीठासारखा शैक्षणिक परिसर त्यांनी फुलविला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीच्या शिस्तबद्धतेचा आणि निष्ठेचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्याच धर्तीवर त्यांनी श्राविकामंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या अनेक शाखा उघडून त्यांनी व्याख्याने व मार्गदर्शनाद्वारे तरुण-तरुणींना समाजकार्याची प्रेरणा दिली.

      खादीचा वसा घेतलेल्या व स्वातंत्र्य चळवळीत सोलापुरात महिलांच्या मिरवणुकीचे नेतृत्व केलेल्या सुमतीबाईंनी कस्तुरबा विश्‍वस्त संस्थेसाठी जिल्ह्यातून सर्वाधिक निधी जमविला. जिल्हा शाखेच्या त्या अध्यक्ष झाल्या. अ. भा. जैन महिला परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले व देशाच्या विविध भागात परिषदेच्या शाखा उघडल्या. सोलापुरातील ‘लेडीज क्लब’चा पूर्ण कायापालट करून त्याला ‘भगिनी समाजाचे’ रूप दिले. या समाजातर्फे साक्षरता, स्वावलंबन, स्त्री प्रबोधन, महिला व्याख्यानमालेचे उपक्रम हाती घेतले. दुर्गाबाई भागवत, सरोजिनी बाबर, लीलावती मुनशी, यमूताई किर्लोस्कर, हंसाबेन मेहता इत्यादींची व्याख्याने घडवून आणली. अभिजात शिक्षकाचे गुण, निष्ठावंत असे  त्यांचे काका वाताचंद देवचंद शहा त्यांना आश्रमाच्या कामात तत्परतेने मदत करीत. देणग्या व निधी जमवून ‘उमाबाई विद्यालय व वसतिगृहा’ची इमारत बांधली. दयानंद महाविद्यालयाचे प्राध्यापक व कन्नड भाषेचे प्रसिद्ध कवी द. रा. बेंद्रे यांनी दिलेल्या उत्तेजनामुळे सुमतीबाईंनी हृदगंध, महापुराण, रामायण, ज्ञानगीता, भावगीता इत्यादी पुस्तके लिहिली. श्राविका प्रकाशनातर्फे अनेक ग्रंथ प्रकाशित केले. महाविद्यालयाचे ग्रंथालय समृद्ध केले.

     ‘गोमटसार’ या ग्रंथाचे मराठीत भाषांतर केले. ‘षट खडागम’ या मूळ अर्धमागधी ग्रंथाची हिंदीतून संक्षिप्त आवृत्ती काढली. निराधार, निराश्रित म्हणून आश्रमात आलेल्या अनेक मुलींनी शिकून पुढे नाव कमावले. सुशीलाताई, त्रिशल्यादेव, विद्युल्लता ही काही उदाहरणे.

     इंदूरला झालेल्या अ. भा. महिला परिषदेच्या अधिवेशनात सुमतीबाईंचा ‘विदुषीरत्न’ हा किताब देऊन गौरव करण्यात आला. श्राविकाश्रमाचा ‘श्राविका संस्था नगर’ मध्ये झालेला विकास सुमतीबाईंच्या अखंड कार्याचा आलेख म्हणता येईल. भारत सरकारने या विदुषीला ‘पद्मश्री’ किताब देऊन गौरविले.

- वि. ग. जोशी

संदर्भ
१. ‘हे गीत जीवनाचे’, आत्मचरित्र;  १९७१.
२. जोशी, अरविंद; 'गुणी जनांची मांदियाळी'; सुविद्या प्रकाशन, सोलापूर; सप्टेंबर २००१.
शहा, सुमतीबाई नेमचंद