Skip to main content
x

सहस्रबुद्धे, पुरुषोत्तम गणेश

      भारतीय तत्त्वज्ञान आणि तत्कालीन लोकसत्ताक राष्ट्रधर्माचा विचार करणार्‍या डॉक्टर पु.ग. तथा पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे यांनी लोकशाहीचा, तसेच विज्ञान-प्रणीत समाजरचनेचा आयुष्यभर सातत्याने पाठपुरावा केला, समाजप्रबोधनासाठी व्याख्याने दिली, लेखमालांसह ग्रंथलेखनेह केले. ‘ग्रंथ हेच गुरू’ ही त्यांची धारणा होती. या विचारवंताचा जन्म पुणे येथे झाला.

       लहानपणी मनात वैराग्यभावना निर्माण झाल्यामुळे त्यांनी हिमालयात जाऊन जपाचा आणि ध्यानाचा प्रयोग केला. पण त्यातले वैयर्थ्य जाणवल्याने लौकिकात परतून ते १९२४ मध्ये मॅट्रिक झाले. याच वर्षी त्यांचा प्रा.श्री.म.तथा बापूसाहेब माटे यांच्याशी परिचय झाला; तो त्यांच्या आयुष्याला वळण लावणारा, संस्कार करणारा ठरला. १९२८मध्ये स.प.महाविद्यालयातून बी.ए. झाल्यावर ते नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून काम करू लागले. १९२९ मध्ये मित्रवर्य वि.कृ.दातार यांच्या भगिनी द्वारकाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर १९३१ मध्ये ते एम.ए. झाले.

       १९३१ मध्ये सहस्रबुद्धे यांनी ‘किर्लोस्कर’ मासिकातून कथालेखनाला आरंभ केला. १९३४ मध्ये त्यांच्या ‘लपलेले खडक’ या लघुकथासंग्रहाचे प्रकाशन झाले. कथांतून ‘कुणबी’सारख्या बोलीभाषेतून संवाद साधणार्‍या या कथांत जिवंतपणा असला, तरी त्यांचे वळण बोधवादी होते. येथे केतकर, वा.म.जोशी, सावरकर यांच्या ललित लेखनाशी जवळीक जाणवत होती. १९३३ मध्ये त्यांचे पहिले नाटक ‘सत्याचे वाली’ हे प्रसिद्ध झाले आणि दुसरे नाटक ‘वधू संशोधन’ १९३७ मध्ये प्रसिद्ध झाले. मात्र त्यांचे प्रयोग झाल्याचे उल्लेख नाहीत.

       याच सुमारास हिंदूंच्या समाजरचनाशास्त्रावरचा गो.म.जोशींचा ग्रंथ त्यांच्या वाचनात आला. प्राचीन हिंदू समाजाला स्मृतिकारांनी दिलेली शिकवण आजच्या काळात निरुपयोगी असून तीत आमूलाग्र बदलाची गरज त्यांना जाणवली. लोकांच्या आचार-विचारांतील भ्रम दूर करण्याच्या उद्देशाने सूक्ष्म आणि दीर्घ अभ्यासाअंती त्यांनी उद्योगप्रधान ‘विज्ञानप्रणीत समाजरचने’च्या प्रयोगावर भर दिला. भोवतालच्या समाजातील धर्मादी व्यावहारिक प्रश्न, समोरची आव्हाने तपासून आणि विज्ञानाच्या मर्यादा ध्यानी घेत त्यांनी नवे चिंतन मांडले. आपल्या १९३६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘विज्ञानप्रणीत समाजरचना’ या ग्रंथातून व्यक्तिस्वातंत्र्याचे माहात्म्य सांभाळत समाजकल्याणासाठीचा नवा मार्ग त्यांनी दाखवला. या ग्रंथाचे अभ्यासकांत स्वागत झाले. शिवाय त्यास भोरचे ‘शंकराजी नारायण’ हे पारितोषिकही मिळाले.

       यानंतर त्यांनी १८५८ ते १९३८ या काळातील मराठी ललित साहित्यातील ‘स्वभावलेखन’ या विषयावर प्रबंध लिहिला. त्यांना साहित्यसम्राट न.चिं.केळकर हे मार्गदर्शक लाभले, तर वा.म.जोशी हे परीक्षक होते. १९३९ मध्ये ते मुंबई विद्यापीठाचे पहिले पीएच.डी. झाले. आपण ‘ग्रंथकार’ व्हायचे असा मनोमन निर्णय करून आणि ‘भारताचा उत्कर्ष’ हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी ललित लेखनाकडे पाठ फिरवली आणि आपल्या समाजाचा, तसेच समाजशास्त्राचा, राजकारणाचा अभ्यास सुरू केला. १९३९ ते १९४३ या काळात ते केवळ अभ्यास, मनन आणि चिंतन करत होते.

       याच काळातच ते ‘नूतन मराठी विद्यालयात’ शिक्षकही होते. शाळेत त्यांचा पांढरा पोलो कॉलरचा शर्ट, काळा कोट, काळी टोपी, धोतर व वहाणा असा वेश असे; आणि त्यातूनही त्यांचे व्यायामाने कमावलेले शरीर लक्षात येई. ताठ मानेने झपझप चालण्याची त्यांची सवय प्रारंभापासून होती. ते शाळेत मुलांच्या शिस्तबद्ध सहली काढत. त्यांना निसर्गाचे रौद्ररूप आवडे. मुलांबरोबरीने व्हॉलीबॉल, बास्केट बॉल हे मैदानी खेळ खेळत; पण त्यांचे विशेष प्रेम धसमुसळ्या रग्बीवर होते. इतके की, त्यासाठी त्यांनी ‘गेंडा क्लब’ स्थापन केला होता. मैदानी खेळातून शिस्त येते असे त्यांचे मत होते. १९४३नंतर जवळजवळ बारा वर्षे ते नियमित रोज दीड-दोन तास फिरायला जात असत.

      १९२८ ते १९४६ पर्यंत शाळेत शिक्षक म्हणून काढल्यावर १९४६पासून ते १९६४मध्ये निवृत्त होईपर्यंत ते सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून अध्यापन करत होते. विद्यार्थ्यांविषयी मनात ममता असली, तरी बाह्यतः ते कठोर होते. पण अभ्यासू, हुशार मुलांसमोर तो कठोरपणा फार काळ टिकत नसे. १९४६च्या प्रारंभीच्या काळात समाजजागृती करणारे लेखक-वक्ते विद्यार्थ्यांमधून निर्माण व्हावेत, या हेतूने ते विद्यार्थी मंडळही चालवत होते. त्यांनी १९४९पर्यंत हा प्रयोग केला.

       १९४३मध्ये त्यांचे मित्र दत्तप्रसन्न काटदरे यांनी ‘वसंत’ मासिक सुरू केले. १९४३च्या ‘वसंत’ दिवाळी अंकात त्यांनी ‘राष्ट्रीय अहंकार’ या विषयावर लिहिले. त्यातूनच ‘अहंकार’विषयक लेखमाला तयार झाली. तेव्हापासून १९७९पर्यंत ते सातत्याने ‘वसंत’साठी लिहिते राहिले.

       त्यांचे गुरू - माटे मास्तरांनी - ललित लेखनातून जे समाज जागरण करण्याचा प्रयत्न केला, त्याची पुढची पायरी डॉ.सहस्रबुद्धे यांनी आपल्या निबंधांतून गाठली. त्यांची अशी एक लेखनप्रवृत्तीही ठरून गेली. ते श्रेष्ठ निबंधकार होते; ते चिपळूणकर, आगरकर, टिळक, राजवाडे, माटे या परंपरेतले; जवळजवळ शेवटचेच शिलेदार होते. राजकीय विश्लेषणाबरोबरच सामाजिक निदानही त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.

     आपला विषय मांडताना ते विवेकनिष्ठा, विज्ञाननिष्ठा व बुद्धिस्वातंत्र्य ह्यांचा पुरस्कार करतात. विषयाचा प्रवास विश्‍लेषणातून विचारमंथनाच्या मार्गाने प्रबोधनाकडे होतो; त्यांच्या लेखना/व्याख्यानातून काहीसा अहंकारयुक्त आवेश असे. विवेचनाच्या ओघात पूर्वपक्ष-उत्तरपक्ष करत, खंडनमंडनात्मक पद्धतीने जाताना प्रसंगी विनोद, कोट्या असत. त्यांची वाणीही लेखणी-उद्दीपक आणि वेधक जाणवे. केवळ मुद्यांधारे विषय मांडताना श्रोत्यांच्या/वाचकांच्या बुद्धीस आवाहन केलेले असे. तर्काचे बारकावे सांभाळत आधार-प्रमाणे देत विषय मांडताना ते श्रोत्यांना कधी ताब्यात घेत, हे कळतही नसे. उपहास, उपरोध, व्याजोक्ती, वक्रोक्ती, व्यंजना यांच्याबरोबरीने विषय प्रतिपादनार्थ समर्पक उपमा-दृष्टान्तही येत; पण विशेषत्वाने भर जाणवे तो उपहास-उपरोधाच्या धारेचा प्रभाव. आणि व्याख्यानान्ती विषयासंबंधीचा नवा दृष्टिकोन मिळाल्याचे समाधानही अभ्यासूंना मिळत असे.

     आपल्या निबंधांची सुरुवात बर्‍याचदा ते नाट्यमय, चित्रमय रितीने करत, तसाच शेवटही नाट्यपूर्ण, लालित्यपूर्ण असे. त्याचे काहीसे आकर्षणच मनात असे. सुरुवातीस ते भाषासौंदर्यासाठी प्रयत्न करत असत. नंतर ते साधले व त्यांच्या शैलीचेच अविभाज्य अंग झाले. निबंधाची जडणघडण कुशलतेने करणार्‍यास जीवनात कोणतीही जबाबदारी पार पाडता येते अशी श्रद्धा असल्याने, त्यांनी प्रत्येक विषय त्याच पद्धतीने मांडला.

      डॉक्टर मूलतः मराठीचे प्राध्यापक होते. त्यांचा साहित्यविचारही त्यांच्या राजकीय व सामाजिक विचारांशी निगडित होता. त्यांची वाङ्मयविषयक भूमिका स्थिर असल्याने बदलत्या वाङ्मयप्रवाहाशी तसेच टीकाविचारातील नवतेशी ते समरस होऊ शकले नाहीत. वैचारिक साहित्याविषयीची भूमिका आणि ललित साहित्याविषयीच्या कल्पना, यांत फारसा फरक नव्हता. त्यांचे संतवाङ्मयविवेचन समतोल होते; पण समाजावर विशेषतः राष्ट्रावर त्याचा अपेक्षित परिणाम होत नाही हे त्यांनी मांडले.

       स्वभावलेखनविषयक प्रबंधात त्यांची मते सापडतात, पण प्रामुख्याने बोधवादाचा पुरस्कारच आढळतो. वाङ्मयीन महानतेविषयीचे मर्ढेेकर त्यांना धक्का देणारे होते. आत्मविष्काराचा विचार करताना केशवसुतांचा ‘नेमका आत्मा’ कोणता, हा प्रश्न त्यांना पडे. ‘औदुंबर’मधले बालकवींचे व्यक्तिमत्व व कवितेचे श्रेष्ठत्व त्यांना समजणे अवघड जाई, तर गंगाधर गाडगिळांचे दुर्बोधतेचे समर्थन त्यांना अक्षम्य गुन्ह्यासारखे वाटे. त्यांनी विविध टीकाकारांचा अभ्यास करून साहित्यिकांच्या व्यक्तिमत्व, अनुभव, आत्माविष्कार यांवर मते मांडली आहेत. साहित्याचे कार्य, प्रयोजन, स्वरूप यांचाही त्यांनी विचार मांडलेला आहे. त्यांनी बोरकर, तांबे, माधव जूलियन शिकवले; पण एकंदरीत कवितेचे अंग त्यांना नव्हते, हेच लक्षात येते. काही वर्षे त्यांनी मॅट्रिक स्तरावर मराठी गद्य-पद्याविषयी मार्गदर्शिकांचेही लेखन केले. ग्रंथांना गुरू मानणारे डॉक्टर ग्रंथरचनेची तुलना राष्ट्ररचनेशी करत. ग्रंथ नष्ट करणारा परमेश्वराची मूर्ती अशी बुद्धी नष्ट करतो, असे ते मानत व ग्रंथरचना करणार्‍याला परमेश्वराची मूर्ती व्यक्तीच्या चित्रात स्थापन करणारा मानत.

       त्यांचा भर नेहमीच राष्ट्रवादावर असे. ते त्यास प्रागतिक शक्ती मानत. त्यांना ते संघटित समाजजीवनाचे अधिष्ठान वाटे. राष्ट्राचा गौरव करताना राष्ट्रशत्रूंचा द्वेषही ते आवश्यक मानत. राष्ट्रवाद विचारात राष्ट्र घडवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांना महत्त्वाची वाटे. मार्क्सवाद, समाजवाद, गांधीवाद यांचा विचार करून, दंडशक्तीचा अभ्यास करून ते आव्हान स्वीकारत. डॉक्टरांनी सतत लोकशक्ती आणि लोकसत्तेचाच पुरस्कार केला. टिळक आणि महात्माजींच्या कार्याचे लक्षणीय विश्‍लेषण केले. लोकशाहीला तारक आणि मारक प्रवृत्तींचा विचार करून समतोल विवेचन केले.

       रंगसत्तेची यशस्विता संशयास्पद वाटल्याने लोकसत्ता-लोकशाहीविषयक विचार ते अधिक  गांभीर्याने करतात. गांधीवाद आणि साम्यवाद यांविषयीचे वैयर्थ्य व धोके सांगताना या विचारप्रणाली त्यांना पटत नसल्याचे जाणवते. या सर्व राजकीय, सामाजिक लेखनामागे देशहिताची तळमळ आणि विद्यार्थी - तरुणांना कार्यप्रवण करण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट आहे. राष्ट्रनिष्ठेबरोबरच त्यांनी समाजावर व्यक्तिस्वातंत्र्य आणि बुद्धिवादाचे संस्कार केले. बहुजन समाजासही याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

      राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक प्रमुख या नात्यानेही त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. १९४६ ते १९५३ या काळात सर परशुरामभाऊ महाविद्यालयात त्यांनी प्रतिवर्षी चोवीस व्याख्याने दिली. वर उल्लेख आलेल्या विषयांप्रमाणेच रशिया-चीन आणि अमेरिका-इंग्लंड ह्यांच्या लोकसत्तेवरही ते लिहीत/बोलत. तसेच मराठी कादंबरी, ह.ना.आपटे, संतसाहित्य यांवरही ते भाष्य करत. सावकारांपासून विल ड्यूरांटपर्यंत आणि मार्क्सवादापासून ते बांगलादेशाच्या मुक्तिवाहिनीपर्यंत, विविध विषयांवर ते विवेचन करत होते. आफ्रिकन नवोदित राष्ट्रांच्या माहितीपर अठ्ठावीस लेखांबरोबरच त्यांनी शेवटी १९७९मध्ये जगाच्या प्रगतीविषयीही पाच लेखांक लिहिले आहेत.

       निबंधरचनाकार म्हणून गौरवल्या गेलेल्या डॉक्टरांच्या राजकीय-सामाजिक विचारांची झेप जशी मोठी होती, तशीच त्यांची साहित्यनिष्ठा, विज्ञान-विवेकनिष्ठा ही तितकीच जबर होती. ज्ञानकोशकारांची परंपरा लाभलेले डॉक्टर पु.ग.सहस्रबुद्धे सर्वार्थाने ऐश्वर्याच्या राजविद्येचे जाणते प्राध्यापक होते.

- जयंत वष्ट

सहस्रबुद्धे, पुरुषोत्तम गणेश