शिरगावकर, अनंत धोंडूशेठ
गुहागर तालुक्यातील विसापूर गावी अनंत धोंडूशेठ ऊर्फ अण्णांचा जन्म झाला. त्यांचा खरा पिंड इतिहास संशोधकाचा होता. कोकणातील असंख्य दुर्मिळ वस्तू-नाणी गोळा करण्याचा छंद जोपासतानाच सामाजिक जाणिवेतून त्यांनी शिडाच्या होड्या बाळगणाऱ्या गरीब खारवी व भोई समाजातील लोकांना एकत्र आणून १९७८ मध्ये ‘दर्यावदी कामगार संघ’ ही संघटना बांधली. त्यांना स्वतंत्र अस्तित्व मिळवून दिले. त्यांच्या मुलांची होणारी शिक्षणाची गैरसोय लक्षात घेऊन त्यांच्यासाठी छात्रालये उघडली. सात वाचनालयेही चालवली. जिल्हा परिषदेमधेही निवडून आल्यानंतर बांधकाम व आरोग्य खात्याचे ते सभापती होते. केवळ सातवी इयत्तेपर्यंत पोहोचलेल्या अण्णांना स्वतःला मनाप्रमाणे शिकता आले नाही, म्हणून त्यांनी वंचितांच्या शिक्षणाचा ध्यास घेतला व ‘सागरपुत्र’च्या कार्याला वाहून घेतले. १९८३ मध्ये ‘सागरपुत्र विध्याविकास संस्था’ स्थापन केली. पुढे १९८९ मध्ये कला छात्रालयाची पंचनदी येथे स्थापना केली. सुमारे दोन हजार मुले-मुली या दोन्ही संस्थांमध्ये राहतात व शिक्षण घेतात. सागरपुत्रला मुख्यमंत्र्यांकडून तीन मोठे पुरस्कार मिळाले. खुद्द अण्णांना १९९४ साली दलितमित्र हा शासनाचा मानाचा पुरस्कार मिळाला. त्याखेरीज भाऊसाहेब वर्तक पुरस्कार, अपंगमित्र पुरस्कार, गुरुवर्य पुरस्कार, अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, आण्णासाहेब पटवर्धन पुरस्कार, महात्मा फुले शैक्षणिक पुरस्कार, नानासाहेब शेट्ये पुरस्कार असे एकूण ४५ पुरस्कार मिळाले. आकाशवाणीवरील भाषणे व विविध विषयांवरील पाच पुस्तके यातूनही ते लोकांसमोर आले. पुरस्कारांची रक्कम त्यांनी दान केलीच; परंतु जिवापाड गोळा केलेला प्राचीन वस्तूंचा खजिनाही त्यांनी दान करून टाकला. वयाच्या ७५ व्या वर्षी ‘कोकणचा कोहिनूर’ असा त्यांचा गौरव केला गेला.