शिरनामे, तुकाराम गणपत
तुकाराम गणपत शिरनामे यांचा जन्म एका दुर्गम खेड्यातील गरीब कुटुंबात झाला. बालपणीच आईवडिलांचे निधन झाल्यामुळे लांबच्या नातेवाईकाकडे त्यांचे बालपण गेले. या काळात ते त्यांच्या नातेवाईकाला दुधाच्या धंद्यात मदत करत असत. ते ज्या मुख्याध्यापकाकडे दूध घालावयास जात असत त्यांच्या प्रयत्नामुळे शिरनामे यांना शाळेत प्रवेश मिळाला व त्यांच्या मोफत शिक्षणाची सोय झाली. पुढे शिक्षण कमी खर्चात व शिष्यवृत्तीवर होईल, असे सुचवल्यामुळे त्यांनी कला शाखेच्या पहिल्या वर्षानंतर कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला, पण त्या काळी शिष्यवृत्ती फक्त शेतकऱ्यांच्या मुलालाच मिळत असल्यामुळे ब्रिटिश प्राचार्यांना भेटून त्यांनी आपली परिस्थिती सांगितली. प्राचार्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रवेश, शिष्यवृत्ती व फ्रीशिपही त्यांना दिली. या मिळालेल्या संधीचा त्यांनी पुरेपूर लाभ घेतला. प्रथम वर्षाच्या चांगल्या शैक्षणिक प्रगतीमुळे त्यांना बाहेरच्या संस्थांकडून दोन शिष्यवृत्त्याही मिळाल्या. दरवर्षी परीक्षेत त्यांचा पहिला किंवा दुसरा क्रमांक ठरलेलाच असे. त्यामुळे त्यांना महाविद्यालयाच्या वसतिगृहाची मॉनिटरची जागाही मिळाली.
शैक्षणिक प्रगतीप्रमाणेच महाविद्यालयाच्या इतर कार्यक्रमातही त्यांचा सहभाग असे. ते महाविद्यालयाच्या जिमखान्याचे सचिव म्हणूनही निवडून आले होते. महाविद्यालयामध्ये असताना त्यांनी ‘संशयकल्लोळ’ व ‘माधवरावांचा मृत्यू’ या नाटकांतही भूमिका केल्या होत्या. १९२५मध्ये त्यांनी बी.एजी. ही पदवी संपादन केली. त्यानंतर १९२५ ते १९३४ अशी नऊ वर्षे महाविद्यालयात कृषि-अर्थशास्त्राचे अध्यापनही केले. त्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक शासकीय आणि अशासकीय पदे भूषवली. १९३५ ते १९३९ या काळात नवी दिल्ली येथे वरिष्ठ विपणन अधिकारी म्हणून काम केले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात (१९३९-४५) ते अन्नधान्ये, कोळसा, औषधे, इंधन यांसारख्या विविध जीवनावश्यक वस्तूंचे सार्वजनिक अर्थव्यवस्था नियंत्रक अधिकारी होते. त्यानंतर भारत सरकारच्या अनेक विभागांत प्रमुख व सल्लागार म्हणून कामे केली. १९५२ ते १९५७ पर्यंत मुंबई राज्याचे कृषि-संचालक म्हणूनही शिरनामे यांनी जबाबदारी सांभाळली. पुढे १९६५पर्यंत जागतिक अन्न आणि कृषी या संघटनेत भारतातर्फे सदस्य व विशेषज्ञ सल्लागार म्हणून ते कार्यरत होते.
तुकाराम शिरनामे यांचे एकंदर ११ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. प्रशासकीय कामाव्यतिरिक्त विविध समित्यांचे ते सदस्य होते. त्यामध्ये प्रामुख्याने आजीव सदस्य, रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी व रॉयल इकॉनॉमिक सोसायटी लंडन, विद्यापीठांच्या व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य व परीक्षक, कापूस, तेलबिया, तंबाखू, चहा, कॉफी, नारळ, सुपारी, ऊस, ताग इत्यादी उपयुक्त वस्तूंच्या भारतीय मध्यवर्ती समितीचे सदस्य, भा.कृ.अ.प.चे व सल्लागार मंडळाचे सदस्य, सहकारी शेतीच्या अभ्यासासाठी पॅलेस्टाइनला गेलेल्या प्रतिनिधींचे मुख्य इत्यादी समित्यांचा उल्लेख करावा लागेल. १९३९मध्ये तुकाराम शिरमाने यांनी इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चर इकॉनॉमिक्सची स्थापना केली आणि कित्येक वर्षे त्याचे ते कार्यवाह आणि उपाध्यक्ष होते. १९५०मध्ये लखनौ येथे भरलेल्या ११व्या कृषि-अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष होण्याचा मानही त्यांना मिळाला होता.