Skip to main content
x

सिरूर, प्रभाकर ग.

           इंग्रजी व मराठी नियतकालि-कांची मुखपृष्ठे व कथाचित्रे करणारे व मराठी वाचकांची दृश्यकलेबद्दलची अभिरुची जोपासणारे चित्रकार प्र.ग. सिरूर यांनी १९२४ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला व १९२८ मध्ये त्यांनी फाइन आर्टमधील पदविका प्राप्त केली.

              शिक्षण घेताना त्यांना त्यांच्या काळात प्रत्यक्ष नग्न स्त्री-पुरुष समोर बसवून सुरू झालेल्या अभ्यासवर्गाचा (न्यूड क्लास)चा भरपूर फायदा झाला. मानवाकृतीचे चित्रण करण्यात त्यांनी प्रभुत्व  संपादन केले व त्या सोबत निसर्गचित्रण व प्रसंगचित्रण या विषयांतही प्रावीण्य मिळविले. सुरुवातीच्या काळात त्यांनी नियतकालिके व प्रकाशनांसाठी चित्रे काढली.

              ‘टाइम्स’ वृत्तसमूहाच्या कलाविभागात १९२९ मध्ये  ते चित्रकार म्हणून रुजू झाले. ‘द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’ या प्रसिद्ध व प्रतिष्ठित साप्ताहिकात आणि टाइम्सच्या अन्य नियतकालिकांसाठी त्यांनी बरीच वर्षे  कथाचित्रे आणि इलस्ट्रेशन्स काढण्याचे काम केले. या काळात टाइम्स ऑफ इंडियात प्रसिद्ध होणारी पाश्‍चिमात्य चित्रकारांची चित्रे व इंग्लंडमधील प्रकाशनांमधून प्रसिद्ध होणार्‍या चित्रांचा अभ्यास करून सिरूर यांंनी स्वतःची चित्रशैली विकसित केली. टाइम्स वृत्तसमूहाचे आर्ट डायरेक्टर डब्ल्यू. लँगहॅमर यांच्याही नाट्यपूर्ण व जोमदार चित्रशैलीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. अचूक आरेखन, छायाप्रकाशाचा नाट्यपूर्ण वापर, आकर्षक रंगसंगती या सोबतच त्या काळातील छपाईच्या तंत्रासाठी आवश्यक ज्ञान ही त्यांची वैशिष्ट्ये होेती.

              टाइम्समध्ये असतानाच ‘किर्लोस्कर’ मासिकासाठी त्यांनी अनेक मुखपृष्ठे केली. किर्लोस्करवर सुरुवातीला शं.वा. किर्लोस्कर, बाबूराव पेंटर यांची चित्रे असत. पण १९३४ पासून सातत्याने सिरुरांची चित्रे येऊ लागली. या चित्रांचे विषय निसर्गचित्रांपासून ते स्त्री-पुरुषांच्या सहजीवनापर्यंत कुठलेही असत. किर्लोस्करचा एकूणच पुरोगामी दृष्टिकोन आणि मध्यमवर्गीय सुशिक्षित तरुणवर्गाच्या सहजीवनाच्या आकांक्षा यांचे प्रतिबिंब सिरुरांच्या या मुखपृष्ठांमधून दिसते. तळ्याकाठी मुक्तविहार, विणकाम करणारी पत्नी आणि नभोवाणी ऐकणारा पती अशी कौटुंबिक चित्रे सिरुरांनी रंगवली.

              याशिवाय व्यक्तिचित्रणातही ते पारंगत होते. त्यांनी काही व्यावसायिक व्यक्तिचित्रे रंगवली असून ती खाजगी संस्था व मुंबईचे नवीन विधान भवन यांसारख्या प्रतिष्ठित ठिकाणी लागली आहेत. प्र.ग. सिरूर यांनी मराठी नियतकालिकांच्या मुखपृष्ठ क्षेत्राला एक उंची प्राप्त करून दिली. त्यांच्या शैलीपासून पुढील काळातील मुखपृष्ठे व कथाचित्रे काढणार्‍या बसवंत महामुनी, ग.ना. जाधव यांसारख्या अनेक चित्रकारांनी प्रेरणा घेतली.

- दीपक घारे

सिरूर, प्रभाकर ग.