Skip to main content
x

समर्थ भाऊ

          नागपूर शहरात केवळ आधुनिक पद्धतीच्या प्रयोग-शील चित्रकलेवर जगणे सोपे काम नव्हते. असे असूनही लाखनी येथील भाऊ समर्थ हे चित्रकार नागपूर या कर्मभूमीत जगण्याची जिद्द बाळगत व चित्रकलेवर अर्थार्जनाची कसरत करीत स्थायिक झाले. त्यांनी स्वत:ला विचारवंत व श्रेष्ठ कलावंत मानले व ते त्याच मस्तीत जगले.

            विचारवंत कलावंत अशी त्यांची ओळख होती. नागपुरात विदर्भ साहित्य संघाशी भाऊंचा संबंध आल्यामुळे तेथील साहित्यिकांशी ते कलाविषयक चर्चा करीत. भाऊंनी कलाविषयक समीक्षणात्मक लेख, पुस्तके लिहिली. यांत ‘चित्रकला और समाज’, ‘कला और संस्कृति’ ही पुस्तके प्रामुख्याने आहेत. समर्थांचा ‘मिस्सी’ नावाचा एक कथासंग्रहदेखील आहे. कलावंताच्या व्यक्तिगत जीवनातील परवड आणि वैफल्यग्रस्त जीवनाचे चित्रण त्यात आहे. ‘मिस्सी’ या कथेत व्यक्तिचित्र काढण्याच्या निमित्ताने एक चित्रकार आणि एक अमेरिकन महिला यांच्यातील भावबंधांची कहाणी आहे. समर्थ यांच्या व्यक्तिगत जीवनाचे पडसाद त्यात उमटले आहेत.

            भाऊंची शैली विरूपीकरणाकडे झुकलेली व काहीशी अमूर्त होती. चंद्र, सूर्याबरोबर शहरांतील घरांची दाटी, नदीकिनारी असणारे गाव, कोंबड्यांची झुंज अशा विषयांना न्याय देताना पोताचा वापर, जोरकस फटकारे, इंपॅस्टो रंगलेपन ही वैशिष्ट्ये प्रामुख्याने दिसतात. भाऊ समर्थ त्यांचे चित्र काढून झाले की मिळेल त्या किमतीला विकून टाकत. उपाशीपोटी कलासाधना करता येत नाही. त्यामुळे चित्र विकण्याकरिता ते तडजोडी करत. भाऊंच्या अशाच तडजोडीचा एक प्रयोग म्हणजे ‘डेस्टिनी पेंटिंग’ हा होता. भाऊ १९६८ मध्ये या प्रयोगात गुंतले. रंगशास्त्र व रंगाचा मनावर होणारा परिणाम यांवर हा प्रयोग आधारित होता. घरात व घरातील व्यक्तीस सुखशांती लाभावी म्हणून घरामध्ये कोणत्या रंगसंगतीचे चित्र असावे हे भाऊ सांगत. अर्थात, चित्रही भाऊच करून देत.

            भाऊंचा आणखी एक प्रयोग म्हणजे १९६३ मध्ये जबलपूर येथे झालेला, प्राध्यापक मित्र शंकर तिवारी यांच्या संगीतावर चित्र चितारण्याचा. भीमसेन-हुसेन हा संगीताचा कार्यक्रम त्यानंतर कितीतरी वर्षांनी झाला. म्हणूनच भाऊ काळाच्या खूप पुढे होते असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. 

            भाऊंची नागपूर, मुंबई, कोलकाता, भोपाळ, जबलपूर शहरात प्रदर्शने झाली. त्यांची १९७० मध्ये राज्य कला शिक्षण सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. १९७१ ते ७४ या काळात ते राज्य कला प्रदर्शन समितीवर होते. प्रसिद्ध चित्रकार एन.एस.बेंद्रे यांच्या हस्ते १९७८ मध्ये भोपाळ येथे त्यांचा सत्कार झाला. त्यांची १९७५ मध्ये राज्य सांस्कृतिक मंडळावर म्युझियमचे सल्लागार सदस्य म्हणून नियुक्ती झाली. चित्रकलेच्या क्षेत्रात विदर्भ सोडता, अमूर्त शैलीतील चित्रकार भाऊ समर्थ यांना फारशी मान्यता लाभली नाही.

- प्रभाकर पाटील

समर्थ भाऊ