Skip to main content
x

संझगिरी, रमेश व्ही.

          दी टाइम्स ऑफ इंडिया’ प्रकाशनसमूहाचे कलासंचा-लक (आर्ट डायरेक्टर) या नात्याने नियतकालिके व प्रकाशनक्षेत्राशी संबंधित उपयोजित कलेचे संवर्धन करणारे संयोजक चित्रकार रमेश व्ही. संझगिरी यांचा जन्म १९२५ मध्ये झाला. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून उपयोजित कला पदविका परीक्षा ते १९५२ साली पहिल्या वर्गात, प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले व त्यांनी फेलोशिप स्वीकारली. नंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी लंडनच्या सेंट्रल स्कूलऑफ आर्ट येथे प्रवेश घेतला व नॅशनल डिप्लोमा इन डिझाइन, यू.के. ही पदविका प्राप्त केली. पब्लिसिटी डिझाइन, मुद्राक्षरकला (टायपोग्रफी) आणि प्रदर्शने या उपयोजित कलेच्या विभागांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले.

          ते १९५५ च्या एप्रिलमध्ये जे. वॉल्टर थॉम्प्सन या जाहिरातसंस्थेत आर्ट डायरेक्टर म्हणून रुजू झाले. १९५७ मध्ये प्रा. वॉल्टर लँगहॅमर ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या कलासंचालकाच्या पदावरून निवृत्त झाल्यानंतर १९६४ पर्यंत ज.द. गोंधळेकर कलासंचालक होते. त्यानंतर रमेश संझगिरी ‘टाइम्स’चे कलासंचालक झाले. पुढे अनेक वर्षे ते या पदावर होते.

          रमेश संझगिरी यांनी लँगहॅमर यांचा वारसा आपल्या कारकिर्दीत पुढे चालू ठेवला. लँगहॅमर यांचा त्या काळात प्रकाशन क्षेत्रातील उपयोजित कलेपासून ते अभिजात चित्रकलेतील नव्या दमाच्या चित्रकारांपर्यंत मोठाच प्रभाव होता. ‘टाइम्स’च्या प्रकाशनांना लँगहॅमर आणि त्यांच्या कलाविभागातल्या अनेक प्रथितयश चित्रकारांनी जे दृश्य रूप दिले, त्याने प्रकाशनकलेच्या (पब्लिशिंग) क्षेत्रात भारतात एक नवा मानदंड निर्माण केला.

          संझगिरी यांच्या कारकिर्दीत टाइम्स वृत्तसमूहाची ‘द इलस्टे्रटेड वीकली ऑफ इंडिया’, ‘धर्मयुग’, ‘फिल्म फेअर’, ‘फेमिना’, ‘सायन्स टुडे’ यांसारखी विविध प्रकारची नियतकालिके प्रसिद्ध होत असत आणि प्रभाशंकर कवडी, शंतनू माळी, रवी परांजपे, कमल शेडगे, नाना शिवलकर, दत्तात्रेय पाडेकर अशी स्वतःची वेगळी ओळख असलेले चित्रकार तिथे काम करीत होते. प्रसारमाध्यमांमध्ये मुद्रण या माध्यमाचा त्या काळात सर्वाधिक प्रभाव होता. उपयोजित कलेत कथाचित्रे आणि इलस्ट्रेशन्सना प्रतिष्ठा होती.

          नव्वदच्या दशकानंतर संगणक आले आणि प्रसारमाध्यमांचे स्वरूप बदलले. संझगिरी यांचा कलासंचालक या नात्याने मुद्रणपर्वातील या प्रकाशनकलेत महत्त्वाचा सहभाग होता. कॅगच्या (कमर्शिअल आर्टिस्ट्स गिल्ड) १९६७-६८ च्या वार्षिकाचे मुखपृष्ठ संझगिरी यांनी केले होते. त्यात त्यांनी चित्रकारांच्या कौशल्याकडून संगणकाच्या तंत्रज्ञानाकडे होणारे दृश्यकलेचे संक्रमण आणि नवी दृश्यभाषा घडण्याची प्रक्रिया चित्रबद्ध केली होती. संझगिरी यांच्या जाहिरातकलेचे काही नमुने ‘कॅग’च्या वार्षिकांमध्ये पाहायला मिळतात; पण त्यांची खरी ओळख ‘टाइम्स’चे कलासंचालक म्हणूनच राहील.

- दीपक घारे, रंजन जोशी

संझगिरी, रमेश व्ही.