Skip to main content
x

शोभणे, रवींद्र केशवराव

कादंबरीकार रवींद्र शोभणे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील खरसोली या गावी झाला. खरसोलीच्या आदर्श विद्यालयातून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नरखेड येथे, तर पदव्युत्तर शिक्षण नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून झाले. नागपूर विद्यापीठ, नागपूर येथून त्यांनी कादंबरीकार श्री. ना. पेंडसेया विषयावर प्रबंध सादर करून १९८९ साली पीएच.डी. ची पदवी प्राप्त केली.

प्रा. डॉ. रवींद्र शोभणे हे सध्या नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेज येथे मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. कथा, कादंबरी, नाट्य, कविता, समीक्षा, ललित, अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन करणार्‍या डॉ. रवींद्र शोभणे यांची वयाच्या विसाव्या वर्षी पहिली कविता, पहिला समीक्षात्मक लेख आणि पहिली कथा प्रकाशित झाली होती. सुरुवातीपासूनच वाचनाची प्रचंड आवड असलेले हे व्यक्तिमत्त्व सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय, सांस्कृतिक, प्रांतीय स्थित्यंतरांचा जाणीवपूर्वक अभ्यास करीत, परिस्थितीचे डोळसपणे अवलोकन करीत लेखक म्हणून घडत गेले आणि १९८३ मध्ये वयाच्या चौतिसाव्या वर्षी त्यांची प्रवाहही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. सव्वीस दिवससारख्या स्वानुभव कथनात्मक लघू कादंबरी लिहिणार्‍या रवींद्र शोभणेंच्या लेखणीतून उत्तरायणही महाभारतावर आधारित बृहद् कादंबरीही आकारास आली आहे.

कथालेखक म्हणूनही डॉ. रवींद्र शोभणे परिचित आहेत. १९९१ मध्ये त्यांचा वर्तमानहा पहिला कथासंग्रह मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केला. त्यानंतर १९९४ ते २००८ या काळात त्यांचे दाही दिशा’, ‘शहामृग’, ‘तद्भव’, ‘अदृष्टाच्या वाटाअसे पाच कथासंग्रह प्रकाशित झाले.

कादंबरीकार श्री.ना.पेंडसे’, ‘सत्त्वशोधाच्या दिशा’, ‘संदर्भासहअशी त्यांची समीक्षात्मक पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. कथांजलीआणि मराठी कविता परंपरा आणि दर्शनया दोन पुस्तकांचे संपादन डॉ. शोभणे यांनी केलेले आहे. ऐशा चौफेर टापूतहा त्यांचा ललित लेखसंग्रह २००७ मध्ये प्रकाशित झाला.

१९९२मध्ये प्रकाशित झालेल्या कोंडीया कादंबरीने त्यांना खर्‍या अर्थाने कादंबरीकार म्हणून लौकिक मिळवून दिला. वैदर्भीय प्रादेशिकतेची वैशिष्ट्ये, वैदर्भीय बोली भाषा, तेथील व्यक्तिमत्त्वे, त्यांची स्वभाववैशिष्ट्ये, त्यांचा सांस्कृतिक वारसा, त्यांचे राजकीय डावपेच या सर्वांचे वास्तव चित्रण करीत विलक्षण ताकदीने शोभणे यांनी कोंडीचे कथानक उभे केलेले आहे. त्यांच्या या कादंबरीला अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्यांमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग.ल.ठोकळ पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार असे काही महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या मानवी वास्तवाचा नवस्पर्श लाभलेल्या महाभारतावरील उत्तरायणया बृहद् कादंबरीला वि.सा.संघाचा पु.ल.देशपांडे पुरस्कार, घनश्यामदास सराफ पुरस्कार, महाराष्ट्र फाउण्डेशनचा पुरस्कार हे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, तर त्यांच्या पडघमया सामाजिक व राजकीय कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा ह.ना.आपटे पुरस्कार प्राप्त झाला आहे.

१९७५ ते १९८४ या कालखंडातील महाराष्ट्रीय, तसेच भारतीय समाजजीवनातील र्‍हासपर्वाचे, विविध राजकीय पक्ष संघटनांचे, आणीबाणीनंतरच्या राजकीय जीवनाचे असे बहुकेंद्री पडसाद पडघमया महाकादंबरीमध्ये उमटलेले आहेत. रक्तधृवया आगळ्या आशयाच्या व विचार प्रवृत्त करणार्‍या कादंबरीलाही तल्हार स्मृती पुरस्कार व लोकमत पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांच्या चिरेबंदया देशमुख आणि कंपनी, पुणे यांनी १९९५मध्ये प्रकाशित केलेल्या कादंबरीला ग्रंथोत्तेजक पुरस्कार, तसेच रणजीत देसाई पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

डॉ. रवींद्र शोभणे यांना त्यांच्या विविधांगी साहित्यसंपदेची दखल घेणारे अनेक प्रकारचे सन्मान प्राप्त झाले आहेत. २००३मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद या युवा साहित्यिकाने भूषविले होते. त्यांना साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती १९९४ साली प्राप्त झाली. मराठी भाषा साहित्य अकादमीमध्ये सल्लागार सदस्य म्हणून (२००७ -२०१२) ते कार्य करीत आहेत.

वास्तवाचे भान ठेवत सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक अशा सर्वच स्थित्यंतरांची वैशिष्ट्ये डॉ. रवींद्र शोभणे यांनी आपल्या कथा-कादंबरी या साहित्यप्रकारांमधून जपली आहेत. सामाजिक परिवर्तनांचे ग्रामीण व नागरी समाजजीवनावर होणारे चांगले व वाईट परिणाम टिपत कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत आकारास आलेल्या त्यांच्या साहित्यनिर्मितीने आपले वेगळेपण जपले आहे.

बोलीभाषेच्या संवादशैलीचा गोडवा, कथा-कादंबर्‍यांच्या आशयगर्भाशी एकरूप होत जाणारी संवादांची लयबद्धता, अस्सल वर्‍हाडी भाषेची जाणीवपूर्वक केलेली पेरणी त्यांच्या कथा-कादंबर्‍यांना एक प्रकारचा जिवंतपणा प्रदान करणारी ठरली आहे. म्हणूनच त्यांच्या कथा-कादंबर्‍या वाचकांच्या मनाला मोह घालतात, शेवटपर्यंत बांधून ठेवतात.

- डॉ. संध्या पवार

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].