Skip to main content
x

सोहोनी, अविनाश दिनकर

            विनाश दिनकर सोहोनी यांनी १९५४ मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून बी.एस्सी. (व्हेट.) पदवी प्राप्त केल्यानंतर मुंबई राज्याच्या पशुवैद्यकीय खात्यामध्ये ते पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांची १९५५मध्ये दुग्ध व्यवसाय विकास खात्यात प्रतिनियुक्ती करण्यात आली. त्यांनी १९६२मध्ये भारतीय पशुवैद्यकीय अनुसंधान संस्थेतून पशु-संवर्धन पदविका प्राप्त केली. त्यानंतर त्यांची आरे दुग्ध वसाहतीमध्ये साहाय्यक पशु-संवर्धन अधिकारी म्हणून निवड झाली. सोहोनी १९६७मध्ये स्टॉकहोम (स्वीडन) येथील रॉयल पशुवैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी गेले. त्यांची १९६८मध्ये पुन्हा आरे दूध वसाहतीत पशु-संवर्धन अधिकारी या पदासाठी निवड झाली. त्यांनी आरे दूध वसाहतीतील म्हशींचे प्रजनन, त्यांचा आहार, व्यवस्थापन, औषधोपचार इ. सर्व कामे शास्त्रीय पद्धतीने पार पाडली. त्यांनी या कामांसाठी नियम तयार केले व शिस्त लावून दिली. त्यांच्या सर्वसमावेशक सर्वांगीण ज्ञानामुळे व अनुभवामुळे त्यांची टांझानिया देशातील सिंगिडा विभागाचा व नेपाळ या राष्ट्राचा जलद गतीने कृषी विकास होण्यासाठी सहजसाध्य व एकत्रित योजना तयार करण्यासाठी व पशु-संवर्धनतज्ज्ञ गठित केलेल्या समितीचे सदस्य म्हणून निवड झाली. तसेच १९७४मध्ये दूध वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही निवड झाली. डॉ. सोहोनी यांनी १९७८-८० या काळात ठाणे जिल्ह्यातील दापचरी येथील दुग्ध व्यवसाय प्रकल्पात प्रकल्प अधिकारी म्हणून काम केले. त्यांनी या मागासलेल्या भागात दुग्ध व्यवसायाविषयी योजना तयार करण्याचे व राबवण्याचे महत्त्वाचे कार्य यशस्वी करून दाखवले. त्यांची १९८१मध्ये राष्ट्रीय सहकारी भूविकास महासंघाने तांत्रिक संचालक म्हणून नेमणूक केली. कनिष्ठ स्तरावरील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, मेषपालन, कुक्कुट व्यवसाय, मत्स्य व्यवसाय इ. बाबतीत कर्जपुरवठा करण्याच्या योजना तयार करण्यासाठी आणि कर्ज प्रकरणांची छाननी व मंजुरीसाठी त्यांच्या शास्त्रीय ज्ञानाचा आणि अनुभवाचा महासंघाला खूप उपयोग झाला. ते १९८९ मध्ये सेवानिवृत्त झाले.

- संपादित

सोहोनी, अविनाश दिनकर