Skip to main content
x

सोमण, लक्ष्मण पांडुरंग

     शिक्षणासाठी त्यांना नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत या गावात लक्ष्मण पांडुरंग सोमण यांचा जन्म झाला. त्यांचे लहानपण भुसावळ येथे गेले. त्यांचे वडील मामलेदार होते. सोमण यांच्या वयाच्या आठव्या वर्षीच पितृछत्र हरपले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे शालेय शिक्षण चालू होते. अशा परिस्थितीतच ते पहिल्या वर्गात मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. महाविद्यालयीन पुण्यास जावे लागले. फर्गसन महाविद्यालयामधून ते बी. ए. झाले. स्वातंत्र्यपूर्व काळचे वातावरण होते. टिळक-आगरकरांचा काळ होता. मुंबईत एका अकाउंट्स कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. पण ‘राष्ट्रीय शाळा’ काढण्याच्या विचाराने सोमण झपाटलेले होते. नोकरी सोडून ते नाशिकला आले. समविचारी सहकाऱ्यांच्या मदतीने सन १९१४ मध्ये त्यांनी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ही शाळा सुरू केली. शाळा सांभाळत असतानाच ते बी.टी. झाले. कायद्याची बाजूही माहीत असावी म्हणून एलएल.बी. पदवी मिळविली. इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोल सर्वच विषयांवर सोमण यांचे प्रभुत्व होते. ते स्वत: उत्तम खेळाडू होते. आट्यापाट्या, हुतूतू असे देशी खेळ, क्रिकेट, व्हॉलीबॉल हे विदेशी खेळ ते उत्तम खेळत. पंचवीस वर्षे ते मुख्याध्यापक असल्याने शाळेची प्रगतीच्या दिशेने घोडदौड चालू होती. याच काळात मुंबईतील दानशूर, शिक्षणप्रेमी जु. स. रुंग्टा यांच्याकडून त्यांनी देणगी मिळविली. शाळेचे ‘जु. स. रुंग्टा विद्यालय’ असे नामकरण झाले. मुलींसाठी ‘पुष्पावती रुंग्टा कन्या विद्यालय’ ही स्वतंत्र शाळा सुरू केली. नाशिक रोडच्या परिसरातील ‘पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल’ ही आणखी एक नवी शाळा काढली. या सर्वच शाळा प्रयोगशाळा, चित्रकला, भूगोलासाठी स्वतंत्र वर्ग, मोठे क्रीडांगण, सुसज्ज जिमखाना यांनी संपन्न होत्या. नाशिकमध्ये उत्तम विद्यार्थी घडविण्याचे कार्य चालू होते. तात्यासाहेब शिरवाडकर तथा कुसुमाग्रज हे सोमण यांचे विद्यार्थी होते. नंतरच्या काळात इगतपुरी, नांदगाव, सिन्नर ह्या तालुक्यांत त्यांनी शाळा सुरू केल्या.

- प्रा. सुहासिनी पटेल

सोमण, लक्ष्मण पांडुरंग