Skip to main content
x

सोनावणे, कृष्णा सयाजी

    कृष्णा सयाजी सोनावणे यांचा जन्म पोलादपूर तालुक्यातील कुडपण या गावी झाला. ७नोव्हेंबर १९४१ रोजी ते भूसेनेत दाखल झाले. १६फेब्रुवारी१९४८ रोजी शत्रूने नौशेराच्या सर्व ठिकाणी एकाच वेळी चौफेर हल्ला चढविला. त्यांपैकी ७ क्रमांकाच्या एम.एम.जी. चौकीवर शत्रूच्या सुमारे बाराशे जणांनी जोरदार हल्ला केला. कृष्णा सोनावणे यांच्या ताब्यात ही चौकी होती. हल्लेखोरांनी अगदी जवळून आपल्या बंदुका चालविल्या. हल्लेखोरांचे गट चौकीवर एकसारखे हल्ले करू लागले.

     नाईक कृष्णा सोनावणे यांनी आपल्या पथकाला आपली शांतता ढळू न देता मारा चालू ठेवण्याचे आदेश दिले आणि शत्रूची मोठी हानी करणे चालू ठेवले. या चकमकीत क्रमांक एकचा बंदूकधारी मानेवर गोळी लागून जखमी झाला. नाईक सोनावणे यांनी स्वत: ती बंदूक चालविण्यास सुरुवात केली. हे करीत असताना शत्रूच्या गोळ्यांनी त्यांच्या उजव्या हाताची चाळण झाली. गंभीर जखमी अवस्थेतही त्यांनी जीवाची तमा न बाळगता डाव्या हाताने बंदुकीचा मारा चालू ठेवला. त्यांच्या चौकीचे भवितव्य दोलायमान स्थितीत असताना त्यांनी लढा चालूच ठेवला. त्यांची बंदूक नंतर नादुरुस्त झाली. अशा परिस्थितीत त्यांनी डाव्या हाताने हातगोळा फेकून व आपल्या सैनिकांनाही तसे करण्याचा आदेश देऊन लढा जारी ठेवला. अशा प्रकारे शत्रूची जबरदस्त हानी करून त्यांनी हल्ला परतवून लावला.

     अशा प्रकारे धैर्य व निर्धार दाखवून कठीण प्रसंगातही थंड डोक्यानेे कर्तव्यनिष्ठा बजावली आणि दोन तासांच्या अतिशय निकराच्या व बिकट प्रसंगात आपल्या सहकार्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यांच्या कृतीमुळे शत्रूचे सातशेहून अधिक सैनिक ठार झाले व महत्त्वाचे ठाणे वाचविणे शक्य झाले. या कार्याबद्दल त्यांना ‘महावीरचक्र’ प्रदान करण्यात आले.

- वर्षा जोशी-आठवले

सोनावणे, कृष्णा सयाजी