Skip to main content
x

सपार , विष्णू अर्जुन

            सोलापूर येथील दिनदर्शिका चित्रकार विष्णू अर्जुन सपार यांचा जन्म कोजागरीला झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण न्यू हायस्कूलमध्ये झाले. त्यांना पिसाळ सरांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. परिस्थितीमुळे त्यांना दहावीनंतर शाळा सोडावी लागली. मामाच्या ओळखीने भागवत चित्र मंदिरातील कादर पेंटरांकडे त्यांनी गुरुकुल पद्धतीने चित्रकलेचे शिक्षण घेतले. विष्णू अर्जुन सपार यांचे मूळ घराणे कर्नाटक येथील आहे. पणजोबांच्या काळात त्यांचे पूर्वज उदरनिर्वाहासाठी सोलापूरच्या श्री सिद्धरामेश्‍व-राच्या कृपाछत्राखाली येऊन स्थिरावले.

               याच काळात लक्ष्मी-विष्णू कापडगिरणीमध्ये टेक्स्टाइल डिझाइन विभागात प्रमुख संकल्पनकार (डिझाइनर) म्हणून सपार यांनी काम केले. या कामानिमित्त त्यांचे मुंबई, मद्रास (चेन्नई) येथे जाणे- येणे असल्याने  ते शिवकाशीच्या दिनदर्शिका मुद्रणालयाच्या संपर्कात आले. त्यांना दिनदर्शिकांसाठी चित्रे काढण्याची कामे मिळत गेली, त्यामुळे विष्णू सपारांची चित्रे अखिल भारतीय स्तरावर प्रसिद्ध झाली.

               सोलापूर-विजापूर वेशीनजीकच्या स्वकुळसाळी श्रीविठ्ठल मंदिराच्या भिंतींवर व मंडपातील भिंतींवर त्यांनी दशावतार, शेषशयनी विष्णू, श्रीकृष्णलीलेश्‍वर अशी मोठी चित्रे श्रीविठ्ठलाच्या चरणी सेवा म्हणून काढली. सोलापुरातील, भारतीय चौकातील भवानी मंदिरातील महिषासुरमर्दिनी व भुवनेश्‍वरीची ४ फूट × ८ फूट लांबीची चित्रे त्यांनी काढली आहेत. विष्णू सपारांची चित्रे अनेक घरांतील भिंतींवर लावली गेली. यांत अनेक देवदेवता, संत-महात्मे, राष्ट्रीय व्यक्ती व स्वातंत्र्यसेनानी यांची चित्रे आढळतात.  

- मल्लिनाथ बिलगुंदी

 

सपार , विष्णू अर्जुन