Skip to main content
x

सप्रे, मनोहर श्रीधर

           र्ध्या शतकाहून अधिक काळ सातत्याने कार्यरत राहून मनोहर श्रीधर सप्रे यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून संख्येने आणि गुणात्मकतेने मराठी व्यंगचित्र क्षेत्रात लक्षणीय योगदान केलेले तर आहेच; पण त्याहीपेक्षा व्यंगचित्रकलेचा आस्वादक आणि अभ्यासक म्हणून त्यांनी केलेले विपुल लिखाण म्हणजे मराठी व्यंगचित्रकलेला दिलेली अमोल देणगी आहे. मराठीमध्ये आजमितीला केवळ अत्यल्प आढळणारा हा प्रकार आहे हे लक्षात घेतले तर सप्य्रांच्या या कामगिरीची महती लक्षात येईल.

           खानदेशातील मजूर या खेड्यात जन्मलेल्या सप्रे यांनी खासगीरीत्या अभ्यास करून नागपूर विद्यापीठाची तत्त्वज्ञान आणि राज्यशास्त्र या दोन विषयांतील एम.ए. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर बावीस वर्षे प्राध्यापकी केल्यावर कार्यकर्ता म्हणून समाजसेवेला दिल्यानंतर ते चंद्रपूरला स्थायिक झाले. तेथेच आजतागायत स्वतःच्या प्रशस्त बंगल्यात त्यांचे वास्तव्य असते.

           सप्रे यांचे पहिले व्यंगचित्र ‘किर्लोस्कर’च्या जून १९५७ च्या अंकात प्रसिद्ध झाले. केवळ सुखदायी मनोरंजन म्हणून व्यंगचित्रनिर्मितीकडे वळलेल्या सप्रे यांनी जराही खंड पडू न देता अक्षरशः हजारो व्यंगचित्रे रेखाटली. सुरुवातीला नागपूरच्या ‘उद्यम’ मासिकासाठी;  १९६२ पासून १९८४ पर्यंतच्या बावीस वर्षांच्या कालावधीत, दररोज मुंबईच्या ‘दैनिक लोकसत्ता’साठी तत्कालीन घटनांवर टीकात्मक टिप्पणी करणारी ‘पॉकेट कार्टून्स’; नंतर नागपूरच्या ‘हितवाद’ दैनिकासाठी आठ ते दहा वर्षे; नागपूरच्या ‘तरुण भारत’  आणि पुण्याच्या ‘केसरी’साठी, अशी त्यांची व्यंगचित्रनिर्मिती अखंड बहरत राहिली.

           सप्रेंच्या एवढ्या थक्क करणार्‍या प्रचंड व्यंगचित्र निर्मितीला एम.ए. पदवी प्राप्त करून घेताना तत्त्वज्ञान आणि राज्यशास्त्र या विषयांचे केलेले सखोल अध्ययन; नंतरच्या समाजसेवेच्या निमित्ताने संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि अनुभवलेले प्रसंग यांचा भक्कम आधार तर आहेच. पण त्याहीपेक्षा त्यांना अधिक फलदायी ठरली ती जीवनातील विसंगतीतून निर्माण होणारा विनोद टिपण्याची त्यांना लाभलेली उपजत शोधक नजर व निरीक्षणशक्ती. त्यांच्या मराठी, तसेच जागतिक स्तरावरील पाश्चात्त्य साहित्याच्या चौफेर वाचनातून आणि संपर्कात आलेल्या भिन्न भिन्न देशी-परदेशी लेखक, कलावंतांच्या प्रत्यक्ष भेटीमधून या उपजत गुणांना पोषण मिळाले.

           यातून घडलेल्या सप्रेंच्या संवेदनक्षम बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे व्यंगचित्रे ही निव्वळ हसवण्यासाठी असतात ही संकुचित समजूत ओलांडून त्यांमधून घडणारे जीवनवास्तव बघण्याची आणि चित्रांचे अभिजातत्व ओळखण्याची जाण त्यांच्यात निर्माण झाली आणि मराठी वाचकांना चित्रामधील अंतर्गत आशयाची ओळख करून देणारे लिखाण करणे त्यांना शक्य झाले.

           व्यंगचित्रांबरोबरीने काष्ठशिल्पांचा छंदही त्यांनी तेवढ्याच मनस्वितेने जोपासला. मिळतील तेथून सुंदर-सुंदर कलात्मक, दुर्मीळ काष्ठशिल्पे जमा करून त्यांनी संग्रह केला. त्यांचा ठिकठिकाणी केवळ भारतातच नव्हे, तर फ्रान्समध्ये सिर्केना व अमेरिकेत फिलाडेल्फिया येथे प्रदर्शने भरवली. त्यांना उत्स्फूर्त, उत्तम प्रतिसाद मिळाला. ही सर्व काष्ठशिल्पे त्यांनी आपल्या बंगल्यात आर्ट गॅलरी बनवून एकत्र ठेवली आहेत. त्याचप्रमाणे कलावंत आणि कला-रसिकांसाठी जमविलेले भारतीय, पाश्चात्त्य, अन्य परकीय व्यंगचित्रसंग्रह, व्यंगचित्रकला व इतर दृश्यकलांवरील दुर्मीळ ग्रंथ एकत्रित पाहण्याची उत्तम सोय त्यांनी आपल्या बंगल्यात ग्रंथालय बनवून केली आहे.

- वसंत सरवटे

सप्रे, मनोहर श्रीधर