Skip to main content
x

सप्रे, वसंत अनंत

      संत अनंत सप्रे यांचा जन्म अमरावती येथे झाला. त्यांच्या आईचे नाव रमाबाई होते. त्यांचे वडील अनंत विष्णू सप्रे हे कोकणातले मूळचे घर सोडून अमरावतीला आले. वसंत सप्रे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चंद्रपूरला झाल्यानंतर जबलपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातून १९५५ साली पशुवैद्यकीय पदवी प्राप्त केली. त्यांनी १९५५ ते १९६४ या काळात अमरावती विभागातील वेगवेगळ्या पशुवैद्यकीय दवाखान्यांत काम केले. नंतर १९६५मध्ये जबलपूरच्या जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठात पशु-रोगचिकित्सा या विषयातील पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांची निवड झाली. त्यांनी १९६७मध्ये विद्यापीठाच्या सुवर्णपदकासह पशु-रोगचिकित्सा पदवी संपादन केली.

      तत्कालीन महाराष्ट्र कृषी विद्यापीठांतर्गत नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात पशु-रोगचिकित्सा विषयाचे व्याख्याता म्हणून सप्रे यांचा शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश झाला. त्यांनी पदवीपूर्व आणि पदव्युत्तर वर्गात पशु-रोगचिकित्सा विषयाचे अध्यापन करतानाच अनेक संशोधन प्रकल्पांचे प्रमुख संशोधक साहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक आणि विभागप्रमुख या पदांवर काम केले. त्यांची १९९३मध्ये विद्यापीठीय सेवा समाप्त झाली. त्यांनी १० एम.व्ही.एस्सी. आणि ४ पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना संशोधन मार्गदर्शन केले. पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या तृतीय आणि चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांसाठी आजारी जनावरांवर प्रत्यक्ष उपचार दाखवणे व उपचारांची उपयुक्तता त्यांच्या मनावर बिंबवणे हा पशु-रोगचिकित्सा विषयातील अध्यापनाचा महत्त्वाचा भाग आहे. या प्रात्यक्षिक ज्ञानावरच भावी पशुवैद्य घडवायचा असतो. याचसाठी प्रत्येक पशुवैद्यकीय महाविद्यालयाला सुसज्ज आणि दिवस-रात्र कार्यरत पशुरुग्णालय संलग्न असावे लागते. तेथे आंतररुग्ण विभाग, शल्यक्रिया कक्ष इत्यादी सुविधा असाव्या लागतात.

      गावाबाहेर डोंगरावर उभ्या असलेल्या नागपूर पशू महाविद्यालयाला संलग्न रुग्णालयापर्यंतचे अंतर लक्षात घेता नागपूर शहरातील आजारी पशू येथे उपचारासाठी क्वचितच आणले जायचे. परिणामी क्लिनिकल प्रॅक्टिस समाधानकारक होत नसे. ही त्रुटी हेरून डॉ. सप्रे यांनी नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागात विद्यापीठातर्फे सुसज्ज रुग्णालय उभारले. सर्व प्रकारच्या आधुनिक वैद्यकीय रोगनिदान सुविधा असलेले हे रुग्णालय आज मध्य भारतातील ‘रेफरल आणि अ‍ॅडव्हान्स्ड डायग्नोस्टिक सेंटर’ म्हणून ओळखले जाते. भावी पशुवैद्यांना रोगनिदान आणि रोगोपचारात पारंगत करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

      सर्वसामान्य पशुपालकांना पशुउपचार प्रभावीपणे तरीही स्वस्त दरात उपलब्ध होणे आवश्यक आहे याची जाणीव डॉ. सप्रेंना होती. होमिओपॅथीसारखी स्वस्त उपचार पद्धती जनावरात वापरात यावी म्हणून त्यांनी संशोधन केले. विदर्भ विभागातील तीन मोठी शासकीय रुग्णालये आणि नागपूर पशुमहाविद्यालय यांच्या संयुक्त सहभागाने जनावरांचे दहा महत्त्वाचे रोग निवडून त्यांवर होमिओपॅथी औषधांच्या उपयुक्ततेवर दोन वर्षे ५०० जनावरांवर पडताळणी करण्यात आली. या प्रयोगाला प्रचंड यश मिळाले आणि सहज उपलब्ध, स्वस्त होमिओपॅथी औषधांचा वापर जनावरांत तितक्याच प्रभावीपणे करता येतो, या डॉ. सप्रे यांच्या निष्कर्षानुसार आज भारतभर पशुवैद्य मोठ्या प्रमाणावर या औषधांचा वापर करत आहेत. विदर्भातील जनावरांची उत्पादकता हा नेहमीच चर्चेचा आणि चिंतेचा विषय होता. आहारपोषण आणि संगोपनासकट सर्व गोष्टी आमूलाग्र बदलणे शक्य नसल्याने विद्यमान संगोपन पद्धतीत बदल न करता पशूउत्पादकता वाढवण्यावर संशोधन करण्यासाठी सप्रे यांनी नागपूरजवळील सेलू या प्रातिनिधिक खेड्याची निवड केली. तेथील सर्व जनावरांची चार वर्षे तिन्ही ऋतूंत सर्वंकष प्रयोगशाळा तपासणी केली. पशुसंगोपन पद्धतीत बदल न करता वर्षातून दोन वेळा बहुउपयोगी जंत औषधाची मात्रा, जनावरांच्या अंगावरील गोचिडांचे प्रमाण कमी करण्यासाठी वर्षातून किमान दोन वेळा ०.२ टक्के कीटकनाशकाचा फवारा आणि जनावरांच्या खाद्यान्नातून रोज २% या प्रमाणात खनिज मिश्रण दिल्याने उत्पादकतेत लक्षणीय वाढ होते, हा डॉ. सप्रे यांच्या संशोधनाचा निष्कर्ष विद्यापीठाने विदर्भातील सर्व पशुपालकांसाठी प्रसृत केला आणि पशुपालक आजही त्याचे पालन करताना आढळतात.

      बर्‍याच वर्षांपूर्वी पशुवैद्यकीय महाविद्यालयातून उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेला व खेडोपाडी पशुवैद्यकीय दवाखान्यातून पशुआरोग्य सेवा निभावणारा सामान्य पशुवैद्यकीय अधिकारी हा नवीन उपचार पद्धती आणि संशोधनाद्वारे सिद्ध झालेले निष्कर्ष यापासून वंचित राहतो हे जाणून त्याला नवीन गोष्टी शिकायला मिळाव्यात यासाठी डॉ.सप्रेंनी ‘पशुवैद्यासाठी हस्तपुस्तिका’ (हॅण्डबुक फॉर व्हेटरनरी फिजिशिअन) हे पुस्तक प्रथम नव्वदीच्या सुरुवातीला प्रसिद्ध केले. पुस्तकाच्या सुधारित आवृत्त्या ठरावीक अंतराने प्रसिद्ध केल्या. या पुस्तकाच्या निमित्ताने डॉ.सप्रेंचे नाव भारताच्या कानाकोपऱ्यातील पशुवैद्यांपर्यंत पोहोचले आणि डॉ.सप्रेंच्या रूपाने त्यांच्या ज्ञानाला झळाळी देणारा शिक्षक गवसला. विदर्भात १९९२-९३ सालापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले. अवर्षण, नापिकी, खासगी सावकारांची कर्जे अशी अनेक कारणे दाखवण्यात येत होती. दुग्धोत्पादन, बकरीपालन, कोंबड्यापालन यांसारखे शेतीपूरक जोडधंदे असणाऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली नाही, हे सत्य प्रकर्षाने अधोरेखित झाले. डॉ. सप्रेंनी १९९५ साली सेवानिवृत्तीनंतर ‘ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान’ या संघटनेचे सभासदत्व स्वीकारून प्रतिष्ठानमार्फत खेडोपाडी जाऊन शेतकऱ्यांसाठी पशुपालन या जोडव्यवसायाविषयी मार्गदर्शन सुरू केले. ते पशुपालनाचे महत्त्व आणि अधिक पशुउत्पादनासाठी योग्य संगोपन याविषयी भाषणे, प्रचार साहित्य आणि दृक्श्राव्य माध्यमाद्वारे जनप्रबोधन करतात. प्रश्‍नोत्तरांच्या कार्यक्रमांद्वारे पशुपालनविषयक गैरसमजांचेही निराकरण केले जाते. कोणताही आर्थिक मोबदला न स्वीकारता केवळ निरलस समाजसेवा म्हणून डॉ. सप्रे चालवत असलेल्या या उपक्रमाला विदर्भाच्या अवर्षणग्रस्त, म्हणून आत्महत्याप्रवण जिल्ह्यांमधून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या अभियानाचा एक भाग म्हणून दै. ‘लोकसत्ता’साठी डॉ.सप्रेंनी ‘मार्गदर्शन दुग्धव्यवसायाचे’ ही ३४ लेखांची मालिका प्रसिद्ध केली व त्याच लेखांचे संकलन करून बनविलेली पुस्तिका दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन शिबिरांमधून निःशुल्क वितरित केली जाते.

      - डॉ. रामनाथ सडेकर

सप्रे, वसंत अनंत