सरदेसाई, गोविंद सखाराम
रियासतकार गोविंद सरदेसाई यांचा जन्म गोविल (जि. रत्नागिरी) येथे झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण रत्नागिरीला झाले. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी घेतल्यावर १८८९पासून १९२५पर्यंत बडोदे येथे श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराजांकडे त्यांनी ‘रीडर’ आणि युवराजांचे ‘ट्यूटर’ म्हणून काम केले. सयाजीराव महाराजांबरोबर त्यांनी संपूर्ण भारत, इंग्लंड आणि युरोपाचा पाच वेळा प्रवास केला. त्यामधून जगातील विविध समाज, तेथील चालीरीती, रूढी, परंपरा यांचे जवळून निरीक्षण करण्याची संधी त्यांना मिळाली.
नोकरी करत असतानाच त्यांनी इ.स.१००० ते १८५८पर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडाचा इतिहास लिहिण्याचे काम हाती घेतले. त्यांच्यापूर्वी लिहिल्या गेलेल्या बहुतांश ऐतिहासिक लेखनांत घटनांचे कथन करणे हाच उद्देश असे; सरदेसाईंनी मात्र घटनांचे पृथक्करण करून उपलब्ध झालेल्या पुराव्यांची यथार्थता परखडपणे पडताळून पाहिली. त्यासाठी आवश्यक असलेली चिकाटी, पूर्वग्रहविरहित दृष्टी आणि संशोधन वृत्ती त्यांच्यापाशी होती.
मुसलमानी रियासतीमध्ये (दोन खंड) सुलतान घराणी व मोगल बादशाही असा इ. स. १००० ते १७०७पर्यंतचा सुमारे ७०० वर्षांचा कालखंड, मराठी रियासतीमध्ये (तेरा खंड) इ.स. १६०० ते १८१८पर्यंतचा २०० वर्षांचा कालखंड, तर ब्रिटिश रियासतीमध्ये (दोन खंड) इ.स. १४९८ ते १८५८ असा २५० वर्षांचा कालखंड समाविष्ट केलेला आहे. वेगवेगळ्या राजवटींचे भारताच्या अर्थकारण, राजकारण व समाजकारण यांवर झालेले परिणाम त्यांनी विस्तृतरीत्या नोंदवले आहेत.
रियासतीबरोबरच ‘न्यू हिस्टरी ऑफ महाराष्ट्र’, ‘मेन करंट्स ऑफ मराठा हिस्टरी’ असे इंग्रजी ग्रंथ; ‘पेशवे दप्तर’ (पंचेचाळीस खंड), ‘पूना रेसिडन्सी कॉरस्पॉण्डन्स’ (पाच खंड) असे संशोधित व संपादित, सुमारे १०५ ग्रंथ आणि २७५ लेख, शिवाय इंग्लंड देशाचा विस्तार (‘एक्सपॅन्शन ऑफ इंग्लंड’ - जॉन सीली) व राजधर्म (‘प्रिन्स’ - मॅकिएव्हेली) हे दोन भाषांतरित ग्रंथ त्यांच्या नावावर जमा आहेत.
हिन्दुस्थानच्या अर्वाचीन इतिहासाविषयी सखोल संशोधन आणि लेखन केल्यामुळे गो.स.सरदेसाई याच्या नावामागे ‘रियासतकार’ सरदेसाई ही उपाधी जोडली गेली आहे, यातच त्यांच्या कामाची थोरवी आहे. रावसाहेब, रावबहादूर, पद्मभूषण (१९५७), पुणे विद्यापीठाची डी.लिट. अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले.