Skip to main content
x

सरदेसाई नारायण रामकृष्ण

          जलरंग, तसेच तैलरंग या माध्यमात व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, तसेच प्रसंगचित्रे रंगवणार्‍या बॉम्बे स्कूलच्या प्रमुख चित्रकारांत सरदेसाई यांचा समावेश होतो. अचूक रेखाटन, माध्यमावरील प्रभुत्व व यथार्थदर्शन आणि छायाप्रकाशाचा सुयोग्य वापर करीत निर्माण केलेले वातावरण ही त्यांच्या कलानिर्मितीची वैशिष्ट्ये होती.

            नारायण रामकृष्ण सरदेसाई यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात, संगमेश्‍वर तालुक्यात, मोरडे या गावी झाला. रत्नागिरी येथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांनी रत्नागिरीतील स्कूल ऑफ इंडस्ट्रीमधून सुतारकामाचा  अभ्यासक्रम पूर्ण केला, तसेच ते ड्रॉइंग ग्रेडच्या परीक्षाही उत्तीर्ण झाले. लहानपणापासूनच सरदेसाई यांना चित्रकलेची आवड होती. त्यांनी १९०५ मध्ये बडोद्याच्या कलाभुवन या कला शाळेतून थर्ड ग्रेडची परीक्षा दिली. त्यानंतर आर्थिक परिस्थितीमुळे ते काही काळ शिक्षण घेऊ शकले नाहीत. पुढील काळात त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. ते १९१४ मध्ये ‘जी.डी.आर्ट’ झाले. त्यानंतर त्यांनी १९१७ मध्ये ‘आर्ट मास्टर’ (ए.एम.) चा अभ्यासक्रम पूर्ण केला. आर्ट स्कूलमधील त्यांची कारकीर्द अतिशय उज्ज्वल ठरली. सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी ठेवलेला ‘मेयो’ पदकाचा मान त्यांना १९१४ मध्ये मिळाला.

            सरदेसाई जे.जे. मध्ये शिकत असताना सेसिल बर्न्स, धुरंधर, त्रिंदाद, आगासकर व तासकर हे शिक्षक त्यांना लाभले. त्या काळात विशेषत: स्थिरचित्रण, व्यक्तिचित्रण, निसर्गचित्रण या तिन्हींच्या संगमातून   प्रसंगचित्रणाचा अभ्यास जे.जे.त होऊ लागला होता. त्याचा प्रभाव सरदेसाई यांच्या चित्रांवर आयुष्यभर राहिला. जे.जे. मध्ये १९१५ मध्ये, धुरंधर दोन महिन्यांकरिता रजेवर गेल्यामुळे धुरंधरांच्या जागेवर शिक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

            १९१७ ते १९२० या काळात जे.जे. मध्ये ते खास पेंटिंगचा क्लास घेत. याशिवाय १९२० ते १९३० या काळात फोर्टमधील प्रोप्राएटरी हायस्कूलमध्ये त्यांनी चित्रकला शिक्षक म्हणून काम केले. आर्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेतील चित्रकलेच्या वर्गातील विद्यार्थ्यांनाही ते मार्गदर्शन करीत.

            निसर्गचित्रण आणि व्यक्तिचित्रण या दोन विषयांत सरदेसाई यांनी विपुल चित्रनिर्मिती केली. मुंबई, बडोदा, नाशिक इत्यादी शहरांतील रस्त्यांवरील दृश्ये, नदीचे घाट, मंदिरे, किल्ले, मुंबईतील चौपाटी अशी अनेक दृश्ये जलरंगांतून सरदेसाई यांनी अतिशय तरलतेने व संवेदनक्षमतेने साकार केली. रंगांचा ताजेपणा व हळुवार हाताळणीमुळे त्यांची निसर्गचित्रे आकर्षक होत.

            सरदेसाई हे उत्कृष्ट जलरंग चित्रणासाठी प्रसिद्ध असलेल्या एस.एल. हळदणकरांचे समकालीन होते. त्यांच्या रंगलेपनावर, तसेच विषय निवडीवरही हळदणकरांचा प्रभाव जाणवतो. तरी सरदेसाई यांचे एक स्वत:चे असे वैशिष्ट्यही जाणवते.

            निसर्गचित्रांप्रमाणेच सरदेसाई यांचे व्यक्तिचित्रणावरील प्रभुत्वही दिसते. जलरंगात, तसेच तैलरंगात त्यांनी अनेक व्यक्तिचित्रे रंगविली. त्यांचे ‘ताज आणि नमाज’ हे तैलरंगातील संध्याकालीन रंगछटांच्या प्रकाशाने भारलेल्या वातावरणातील दुवा मागणार्‍या फकिराचे चित्र किंवा लाल आलवणातील व अंगावर लाल शाल पांघरलेल्या त्यांच्या विधवा भगिनीचे चित्र सरदेसाई यांच्या व्यक्तिचित्रणातील रंगछटा व पोत यांचा अभ्यास व चित्रित व्यक्तीची मन:स्थिती टिपण्याची क्षमता दर्शवते.

            त्यांची प्रसंगचित्रे ही त्यांच्याभोवती असणार्‍या तत्कालीन समाजजीवनातील विविध प्रसंगांवर आधारित होती. त्यांत कौटुंबिक सोहळे, सण, मिरवणुका असे प्रसंग असत. किंबहुना, त्यांना समकालीन असलेल्या बर्‍याच चित्रकारांनी अशा विषयांवर चित्रनिर्मिती केली. व्यक्तिचित्रण करताना सरदेसाई समोर बसविलेल्या मॉडेलचेच एखाद्या विषयात रूपांतर करीत असत. त्यांची ‘प्रेयर’, ‘भजन’, ‘नमाज’ अशी चित्रे म्हणजे समोरच्या व्यक्तीला विशिष्ट आविर्भावात बसवून त्याचे केलेले चित्रण असे व त्यातील आविर्भावामुळे ते एखाद्या विषयावर असलेले चित्रही वाटत असे. साहजिकच त्याला होणारा भावनेचा स्पर्श चित्राला वेगळ्या पातळीवर नेत असे व व्यक्तिचित्रणाच्या कौशल्यामुळे अशी चित्रे बघणार्‍याच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण करीत.

            तैलरंगाबरोबरच सरदेसाई यांनी जलरंग, ग्वॉश, चारकोल, पेन्सिल, क्रेयॉन, पावडर शेडिंग आदी माध्यमेही यशस्वीपणे हाताळली. पेन्सिल, पेन आणि इंकमधील केलेली त्यांची मानवी आकृत्यांची रेखाटने त्यांचे रेखाटन कौशल्य व अभ्यास जाणवून देतात.

            सरदेसाई हे वास्तववादी चित्रशैलीचे पुरस्कर्ते होते. वस्तुत: त्यांनी मुंबईतील भारतीय पुनरुज्जीवनवादी कलाचळवळ व त्यानंतरच्या काळात झालेले प्रयोगशील कलाविष्कार जवळून अनुभवले. परंतु त्यांना अशा प्रकारच्या कलानिर्मिती व प्रयोगांबद्दल कधीच आकर्षण वाटले नाही. आयुष्यभर ते यथार्थदर्शी चित्रे श्रद्धेने रंगवीत राहिले.

            नारायण सरदेसाई यांची चित्रे मुंबईतीलच नव्हे, तर भारतातील तत्कालीन अनेक मोठ्या शहरांत होणार्‍या स्पर्धात्मक कलाप्रदर्शनांमधून प्रदर्शित झाली. आपल्या विद्यार्थिदशेपासूनच सरदेसाई यांनी भारतातील मद्रास, म्हैसूर, कलकत्ता, सिमला, मुंबई येथील महत्त्वाच्या प्रदर्शनांना चित्रे पाठवण्यास सुरुवात केली. ते १९२९ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक विजेतेे ठरले. तसेच मुंबईच्या आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रदर्शनांतून त्यांनी १९१७, १९१९ व १९२५ या मध्ये रौप्यपदके मिळविली. याशिवाय त्यांना मद्रास फाइन आर्ट सोसायटीची १९१३ व १९१५ ची रौप्यपदके, सिमला फाइन आर्ट सोसायटीचे १९१५ मध्ये रौप्यपदक व म्हैसूर दसरा एक्झिबिशनमध्ये १९३०, १९३१, १९३३, १९३५ व १९४१ अशी पाच रौप्यपदके मिळाली. याशिवाय ते अनेक ब्राँझ पदकांचेही मानकरी ठरले.

            विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुंबईतील कलाविश्‍वात यशस्वी म्हणून नावाजलेल्या सरदेसाई यांचे वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी मुंबईत निधन झाले. प्रसिद्ध चित्रकार रावबहादूर धुरंधर यांनी आपल्या आत्मचरित्रात सरदेसाई यांच्या व्यक्तिचित्रण कौशल्याबद्दल कौतुकाचे उद्गार काढले आहेत.

            सरदेसाई यांच्या मृत्यूनंतर त्यांची मोठ्या आकाराची तैलचित्रे त्यांच्या चिरंजीवांच्या मालाड येथील तळमजल्यावरील घरात ठेवली होती. अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या आकाराची ही सर्व चित्रे नष्ट झाली. उर्वरित चित्रेही तिथेच राहिली व एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या या कलावंताला समकालीन कलाजगत विसरले. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर ५० वर्षांनी जहांगीर आर्ट गॅलरीच्या ‘मास्टर स्ट्रोक्स-२’ या प्रदर्शनात ती प्रदर्शित झाली. त्यानंतर दिल्ली आर्ट गॅलरीने ‘मॅनिफेस्टेशन’ या त्यांच्या प्रदर्शनमालिकेत सातत्याने ती प्रदर्शित केली असून नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबई व नेहरू सेंटरतर्फे झालेल्या प्रदर्शनांमधून ती २००५ व २०१० मध्ये प्रदर्शित करण्यात आली.

- माधव इमारते

सरदेसाई नारायण रामकृष्ण