सरदेशमुख, त्र्यंबक विनायक
त्र्यंबक सरदेशमुख यांचा जन्म अक्कलकोट (जि. सोलापूर) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अक्कलकोट व सोलापूर येथे झाले. एम.ए.बी.टी. पर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी १९४२ ते १९६० पर्यंत सोलापूरच्या चांडक हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून आणि पुढे सोलापूरच्याच दयानंद महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम केले. सेवाकालानंतर त्यांनी मराठी अभ्यास मंडळ, मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, शिवाजी विद्यापीठाचे सिनेट या संस्थांचे सदस्य म्हणून काम पाहिले.
प्रा.देशमुख यांची समीक्षक आणि कादंबरीकार म्हणून असलेली कारकीर्द जास्त लक्षणीय आहे.
‘उच्छाद’, ‘ससेमिरा’, ‘बखर एका राजाची’, ‘डांगोरा एका नगरीचा’ या त्यांच्या काही उल्लेखनीय कादंबर्या आहेत. त्यांपैकी पहिल्या कादंबरीसाठी त्यांना महाराष्ट्र शासन आणि मराठी साहित्य परिषद, पुणे यांचे पुरस्कार लाभले, तर दुसर्या कादंबरीसाठी महाराष्ट्र शासनाचा व दमाणी संस्थेचा पुरस्कार लाभला.
‘उत्तररात्र’ हे त्यांचे काव्य आहे, तर ‘टाहो’, ‘थैमान’ ह्या त्यांच्या नाट्यकृती होत. ‘नदीपार’ हा अनुवाद असून ‘अंधारयात्रा’, ‘धुके आणि शिल्प’, ‘प्रदेश साकल्याचा’, ‘गडकर्यांची संसारनाटके’ आणि ‘रामदास: प्रतिमा आणि प्रबोध’ ही त्यांची समीक्षात्मक पुस्तके असून त्यांपैकी गडकर्यांवरील पुस्तकांसाठी महाराष्ट्र शासनाचा तर रामदासांवरील पुस्तकांसाठी मराठी साहित्य परिषद, रा.श्री.जोग समीक्षा, सोनोपंत दांडेकर प्रकाशन मंडळ यांचे पुरस्कार लाभलेले आहेत.
खलील जिब्रान या लेबनॉनमधील ख्रिश्चन लेखकाने ‘दि प्रॉफेट’ नावाचे पुस्तक लिहिले. सरदेशमुखांनी त्याचा ‘देवदूत’ या नावाने अनुवाद केलेला आहे. ते म्हणतात की, खलीलच्या अनोख्या शैलीचे मुक्त पडसाद म्हणजे माझा हा अनुवाद आहे. खलीलचा देवदूत आवाहनातून, उपदेशातून सनातन सत्याचे आणि शिवतत्त्वाचे जागरण करू पाहतो. सुख-दुःखाच्या प्रसंगांत तो लोकांचा सांगती होतो.
‘रामदास : प्रतिमा आणि प्रबोध’ हे समीक्षात्मक पुस्तक म्हणजे अभिनिवेशमुक्त मनाने त्या महामानवाचे मनोगत जाणून ते सादर करण्याचा एक प्रयत्न आहे. रामदास जे आहेत आणि जसे आहेत, ते आणि तेवढे आमच्या आकलनाचा आणि प्रीतीचा विषय व्हावेत, अशी लेखकाची अपेक्षा आहे. समर्थांचा गौरव करणारे आणि त्यांच्यावर टीका करणारे, दोघांनीही समर्थ नीट समजून घेतलेले नाहीत. ते समजून सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकात सरदेशमुखांनी केलेला दिसतो.
‘गडकर्यांची संसारनाटके’ ह्या समीक्षणात्मक पुस्तकात सरदेशमुखांनी गडकर्यांच्या ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, ‘भावबंधन’ आणि ‘एकच प्याला’ या चार नाटकांचा विचार केलेला आहे. या नाटकांवरून गडकर्यांचा केला जाणारा उपरा गौरव, तसेच व्यंगरूप वाळवी खरवडून काढण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यांच्या मते, तीन गोष्टींमध्ये गडकर्यांचे सामर्थ्य एकवटलेले आहे:
१. त्यांची कथानके पात्रांच्या व्यक्तिमत्त्वदर्शनाला शरण गेलेली आहेत.
२. हे व्यक्तिमत्त्वदर्शन अतिबौद्धिकतेचा पांगुळगाडा डावलून सुजाणपणे भावात्मक झालेले आहे.
३. परिणामस्वरूप गडकर्यांची ही संसारनाटके एका अंगाने व्यक्तींचे मनोमंथन करीत विकसू पाहतात, तर दुसर्या बाजूला नैतिक-आत्मिक समस्यांचे उलट-सुलट फासे मांडून संसाराचा सारिपाट कसा बिकट आहे, याचे दर्शन घडवितात.
व्हिक्टर ह्यूगो ह्या फ्रेंच लेखकाची ‘हसणारा’ या नावाची एक कादंबरी आहे. तिचे सरदेशमुखांनी केलेले ‘थैमान’ हे नाट्यरूपांतर आहे. त्याचा नायक ज्या व्यक्तींपाशी आणि ज्या परिस्थितीत मोठा होतो, त्या व्यक्तींचा आणि परिस्थितीचा साम्यांश या नाटकाचा आधार आहे, असे ते म्हणतात.
‘प्रदेश साकल्याचा’ या समीक्षणात्मक पुस्तकात सरदेशमुखांचे सहा लेख आहेत. त्यांचे म्हणणे असे की, “मी साहित्याचा आणि समीक्षेचा जीवनाशी असलेला संबंध शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे. तसेच कलाकृती आणि तिची समीक्षा वाचकाची जाणीव संपन्न व विस्तृत करतात.”
‘बखर एका राजाची’ ही त्यांची सर्वोत्तम म्हणून गाजलेली कादंबरी आहे. आपल्या देशातील राजघराणी कालपरवा इतिहासात विलीन झाली. तसल्या राजकुळातील एका स्मृतिशेषाची ही शोकात्म आणि शोकांत कहाणी आहे. लेखकाने ती आत्मनिवेदनात्मक पद्धतीने लिहिलेली आहे. या कादंबरीचा नायक-संस्थानचा राजा भोवतीच्या परिस्थितीने त्याला स्वतःचे अस्तित्वच शारीरिक आणि मानसिक पातळीवर निरर्थक आणि कृतिशून्य वाटल्याने, अखेरीस तो आत्महत्या करतो, असे दाखविलेले आहे.
अशा रीतीने आपल्या बहुविध लेखनाने श्री. सरदेशमुखांनी मराठी वाङ्मयात आपले एक स्थान निर्माण केलेले आहे.
- शशिकांत मांडके