Skip to main content
x

श्रीकृष्ण, बेलूर नारायणस्वामी

बी. एन. श्रीकृष्ण

     बेलूर नारायणस्वामी (बी.एन.) श्रीकृष्ण यांचा जन्म मुंबईला झाला. त्यांचे शिक्षण मुंबईतच झाले. बी.एस्सी. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी शासकीय विधि महाविद्यालयातून एलएल.बी आणि मुंबई विद्यापीठातून एलएल.एम. या पदव्या संपादन केल्या. २३डिसेंबर१९६२ रोजी मुंबई उच्च न्यायालयात वकिलीस सुरुवात केली. कामगार कायदा आणि औद्योगिक कायद्यावर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. अनेक व्यावसायिक संस्था व संघटनांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. विशेषत: अमेरिकेतील ‘इंडिस्ट्रिअल रिलेशन्स् रिसर्च असोसिएशन’ आणि लंडनच्या ‘इंटरनॅशनल बार असोसिएशन’चे ते सदस्य होते.

     ३०जुलै१९९० रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून श्रीकृष्ण यांची नियुक्ती झाली. ३ऑक्टोबर१९९१ रोजी ते उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश झाले. डिसेंबर १९९२ - जानेवारी १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या दंगलींची चौकशी करण्यासाठी एक-सदस्य आयोग म्हणून न्या.श्रीकृष्ण यांची नियुक्ती करण्यात आली. आपल्या निर्भीड अहवालात त्यांनी या दंगलीची सखोल कारणमीमांसा केली आहे.

     मुंबर्ई उच्च न्यायालयातील आपल्या कारकिर्दीच्या काळात न्या.श्रीकृष्ण यांनी ‘संयुक्त राष्ट्र मानवी हक्क उच्चायोगा’ने आयोजित केलेल्या अनेक मानवी हक्कांसंबंधीच्या आंतरराष्ट्रीय परिषदांत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांचे मानवी हक्कांविषयीचे शोधनिबंध विविध जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

     ६सप्टेंबर२००१ रोजी न्या. श्रीकृष्ण यांची नियुक्ती केरळ उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून करण्यात आली. ३ऑक्टोबर२००२ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. २०मे२००६ रोजी ते पदावरून निवृत्त झाले.

      केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी नेमण्यात आलेल्या सहाव्या वेतन आयोगाचे ते अध्यक्ष होते.

      तेलंगणाच्या प्रश्नावर विचार करून त्यावर उपाय सुचविण्यासाठी न्या. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती जानेवारी २०१० मध्ये नेमण्यात आली. या समितीने वर्षभरात आपला अहवाल सादर केला आणि विविध पर्याय सुचविले.

- शरच्चंद्र पानसे

श्रीकृष्ण, बेलूर नारायणस्वामी