Skip to main content
x

श्रीखंडे, जगेश्वर गोपाळ

        गेश्वर गोपाळ श्रीखंडे यांनी नागपूर विद्यापीठातून १९२७ साली एम.एस्सी. उत्तीर्ण केल्यावर ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये रोथॅमस्टेड संशोधन केंद्र, हार्पेन्डन येथे गेले. त्यांनी वनस्पतीजन्य पदार्थांचे सूक्ष्म जीवांकडून विघटन या विषयावरील संशोधनाबद्दल लंडन विद्यापीठातून १९३३मध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली. भारतात परतल्यावर त्यांनी अनेकाविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांनी बंगळूर येथील अखिल भारतीय कंपोस्ट योजनेत १९३३ ते १९३६ या काळात जीव-रसायनशास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले. त्यांनी १९३६-४३ या कालखंडात सिलोन येथील चहा संशोधन संस्थेत कृषि-रसायनशास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले तर साखर-रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख या नात्याने काम केले. त्यांनी १९४४-४६ या दोन वर्षांत साखर तंत्रज्ञान संस्था, कानपूर येथे प्राध्यापक म्हणून काम केले. तसेच तेथील शासकीय कृषी महाविद्यालयात १९४७-५८ या काळात कृषि-रसायनशास्त्रज्ञ व १९५५ ते ५६ या काळात प्राचार्यपद भूषवले. शेवटी ते ऊस संशोधन संस्था, उत्तर प्रदेश या संस्थेचे संचालक झाले व १९६२मध्ये निवृत्त झाले.

        श्रीखंडे यांचे सूक्ष्मजीवशास्त्र, जीव-रसायनशास्त्र (वनस्पती),  साखर-रसायनशास्त्र व तंत्रज्ञान, गोंद इ.ची सूक्ष्म जीवांकडून आंबवणी, नत्रस्थिरीकरण, निरुपयोगी पदार्थांचा पुनर्वापर विशेषतः साखर उद्योगांतील, गांडूळ व वाळवींचे कार्य, ऊस व अन्य उद्योगातील सांडपाण्याचे खत म्हणून मूल्यमापन, इ. २००पेक्षा जास्त संशोधनपर लेख भारतीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. शासकीय कार्यातून निवृत्त झाल्यावर त्यांनी वर्धा येथील मध्यवर्ती ग्रामोद्योग संशोधन संस्थेत २ वर्षे संचालक म्हणून काम केले. त्यानंतर ते नागपूरला स्थिरावले व त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र या विषयावर कृषी महाविद्यालय, नागपूर येथे १० वर्षे संशोधन केले.

       श्रीखंडे यांना अनेक सन्मान व पुरस्कार मिळाले. वरिष्ठ अभियांत्रिकी शिष्यवृत्ती मॉरिस स्मृती संशोधन शिष्यवृत्ती, इंग्लंडच्या रॉयल रसायनशास्त्र संस्थेची शिष्यवृत्ती इ. अनेक विद्वत संस्थांचे ते सदस्य होते. तसेच भारतीय रसायनशास्त्र संस्था, भारतीय ऊस संस्था, भारतीय मृदाशास्त्र संस्था, जीव रसायनशास्त्र संस्था इ. संस्थांसाठीही त्यांनी काम केले आहे. डॉ. श्रीखंडे नागपूर येथे निधन पावले.

- डॉ. श्रीपाद यशवंत दफ्तरदार

श्रीखंडे, जगेश्वर गोपाळ