Skip to main content
x

श्रीरंभट्टलवार, बाळाराव व्यंकटेश

हरदास, बाळशास्त्री

     आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात येऊन स्थायिक झालेल्या घराण्यांपैकी एक महत्त्वाचे घराणे म्हणजे श्रीरंभट्टलवार यांचे होय. गोदावरीच्या उत्तर किनार्‍यावरील चिन्नूर या गावी विश्वनाथ महाराज श्रीरंभट्टलवार राहत होते. उग्र तपश्चर्या, वेदांचे प्रखर अध्ययन, निःस्पृहता, अपरिग्रह या सर्व श्रेष्ठ गुणांमुळे आंध्रात त्यांचे नाव मोठ्या मानाने घेतले जाई. लोक त्यांना आदराने ‘सांबावतारम्’ म्हणत असत. विश्वनाथ व पार्वती यांना एक मुलगा व एक मुलगी होती. मुलाचे नाव नारायण होते. नारायण दोन वर्षांचा असताना विश्वनाथरावांचे निधन झाले व पार्वतीबाई मुलांना घेऊन आपल्या माहेरी, नागपूरला आल्या.

     नारायणाला हरिभजनाचेच आकर्षण अधिक होते. त्यांनी नागपूरजवळ असलेल्या सहस्रचंडी मंदिरातील ब्रह्मचारी महराजांकडून मंत्रदीक्षा घेतली. त्यांची उपासना बघून लोक त्यांना नारायण महाराज तेलंग असे म्हणू लागले. या नारायण महाराजांना व्यंकटेश नावाचा एकुलता एक मुलगा होता. मोठेपणी हा उत्तम कीर्तनकार झाला. लोक त्यांचा उल्लेख ‘व्यंकोबा हरदास’ असा करू लागले. श्रीरंभट्टलवार घराण्याचा हरदास या आडनावापर्यंतचा प्रवास हा असा आहे. व्यंकोबांना बाबूराव व बाळाराव अशी दोन मुले होती.

     बाळारावांचा जन्म श्रावण वद्य नवमीला, नागपूरमध्ये झाला. बाळारावांचे प्राथमिक शिक्षण आदितवार दरवाजा शाळेमध्ये व माध्यमिक शिक्षण कायदे हायस्कूलमध्ये झाले. सर्व विषयांत त्यांची उत्तम प्रगती होती; पण गणित मात्र त्यांना जमत नसे. एकदा गणिताचे शिक्षक त्यांना म्हणाले की, ‘‘अरे, अशाने तू आपल्या घराण्याचं नाव बुडवशील.’’ बाळाराव संतापले व म्हणाले, ‘‘सर, माझ्या घराण्याचा लौकिक गणितात नाही. मी तो उंचावूनच दाखवीन.’’ त्यानंतर त्यांनी पुन्हा शाळेचे तोंड पाहिले नाही. त्यांनी पंडितसम्राट कृष्णशास्त्री घुले यांच्याकडे व्याकरणाचा, श्रीनिवासशास्त्री हरदास यांच्याकडे संस्कृत पंचकाव्यांचा व काशीचे पंडित भाऊशास्त्री वझे यांच्याकडे वेदान्ताचा अभ्यास करायला सुरुवात केली. ‘काव्यतीर्थ’, ‘वेदान्ततीर्थ’ आणि ‘साहित्याचार्य’ अशा तीन्ही परीक्षांत ते वयाच्या केवळ अठराव्या वर्षी वरच्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. यानंतर त्यांनी धर्मग्रंथांचा अभ्यास सुरू केला. त्यांना प्रवचनांची निमंत्रणे येऊ लागली. ते थिऑसॉफिकल सोसायटीत ब्रह्मसूत्र शांकरभाष्यावर प्रवचने देत. ती ऐकायला न्यायमूर्ती सर भवानीशंकर नियोगी, श्रीमंत बाबासाहेब खापर्डे यांसारखे महान श्रोते असत. लोक त्यांना ‘बाळशास्त्री’ असे म्हणू लागले. संस्कृतच्या अध्ययनाबरोबर आधुनिक काळाला अनुसरून त्यांनी इंग्लिशचाही अभ्यास सुरू केला. धर्मग्रंथांच्या अभ्यासाबरोबरच देशापुढील समस्या शास्त्रीबुवांना महत्त्वाच्या वाटू लागल्या. ते हिंदुत्वनिष्ठ चळवळींतून भाग घेऊ लागले.

     भारतभर होत असलेले हिंदूंवरील अत्याचार, धर्मांतर, हिंदू स्त्रियांचे अपहरण, अस्पृश्योद्धार अशा विविध समस्यांवर हिंदुमहासभा कार्य करत होती. जनजागृतीसाठी श्रीशिवजयंती, शिवराज्यारोहणदिन, टिळक पुण्यतिथी असे उत्सव हिंदुमहासभा साजरे करत होती. या उत्सवांतून शास्त्रीबुवांची जाज्वल्य भाषणे होत. सखोल अभ्यास, धर्माविषयी प्रखर अभिमान असलेले शास्त्रीबुवा विशेषतः तरुणांवर योग्य प्रभाव पाडत. हिंदुमहासभेसाठी सामाजिक व राजकीय कार्य करत असताना शास्त्रीबुवांना १९३९मध्ये भागानगर येथे, १९४१मध्ये भागलपूर येथे आणि १९४९मध्ये रायपूर येथे कारावास घडला.

     व्याख्यानांच्या जोडीला अनेक लोकांपर्यंत पोहोचायचे, तर वृत्तपत्रे हे प्रभावी माध्यम आहे. म्हणून त्यांनी नियतकालिकांतून लिखाण सुरू केले. १९४०मध्ये राष्ट्रधर्म प्रसारक संस्थेची स्थापना करून बाळशास्त्री  यांनी ग्रंथ प्रकाशनालाही सुरुवात केली. पहिल्याच वर्षी या संस्थेतून प्रकाशित झालेला त्यांचा ग्रंथ म्हणजे ‘भाई परमानंदांचे चरित्र’. हिंदुमहासभेच्या प्रसारासाठी त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या विद्यापीठांमुळे त्यांचा विविध ठिकाणी प्रवास होई अशा परिस्थितीत त्यांना दिसलेल्या बिहारवर, ‘थहरीं ख डशश ळि इळहरी’ हा त्यांचा दुसरा ग्रंथ इंग्लिशमध्ये प्रकाशित झाला. संस्कृत, मराठी, हिंदी व इंग्लिश या चारही भाषांवर सारखेच प्रभुत्व असल्याने त्यांना भाषेची अडचण कधीच जाणवली नाही. त्यांना अनेक ठिकाणांहून व्याख्यानांची निमंत्रणे येऊ लागली.

     बाळशास्त्री यांच्या व्याख्यानमाला होऊ लागल्या. काही व्याख्यानमाला १५ ते २८ व्याख्यानांच्यासुद्धा झाल्या. याचे फलित म्हणजे वाल्मिकी रामायण, महाभारत, भगवान श्रीकृष्ण, वेदांतील राष्ट्रदर्शन, छत्रपती शिवाजी, भारतीय स्वातंत्र्यसमर, आर्य चाणक्य, रामायण व महाभारतातील राज्यव्यवस्था अशा राष्ट्रभावना उद्दीपित करणार्‍या विविध विषयांवरील ग्रंथनिर्मिती. याशिवाय आद्य शंकराचार्य, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर, स्वामी विवेकानंद, श्रीसमर्थ रामदास, महारुद्र देवतेचे स्वरूप अशा अनेक विषयांवर शास्त्रीबुवांनी व्याख्याने दिली; पण ती ग्रंथरूपात प्रसिद्ध झाली नाहीत. शास्त्रीबुवांचे नियतकालिकांतून सामाजिक, ऐतिहासिक, साहित्यविषयक, व्यक्तिचित्रण करणारे व संतविषयक एवढे लेख आहेत, की त्यांची जंत्री करणे केवळ अशक्य आहे. पुराणकाळविषयक समाजातील गैरसमजुती व अपप्रचारांचेही ते समर्थपणे खंडन करत होते. त्यामुळे बाळशास्त्री यांनी अशा विषयांना वाहिलेले स्वतंत्र लेख लिहिले. याशिवाय, नागपूरच्या ‘साप्ताहिक महाराष्ट्र’मधून त्यांनी १९४९ ते १९६३ असे सतत पंधरा वर्षे लेखन केले. हे लेखन म्हणजे विविध विषयांवरील ग्रंथांचे समालोचन होते. हे समीक्षणात्मक लेखनही इतके समृद्ध आहे की, त्या सर्व लेखांचा संग्रह केला, तर जवळपास दोन हजार पृष्ठांचा ग्रंथ सहजी तयार होईल. ते पत्रकार म्हणूनही प्रसिद्ध होते. ‘आदेश’, ‘युगांतर’ या साप्ताहिकांचे ते संपादक होते. त्यांनी ‘हिंदुहृदय’ या नावाचे त्रैमासिकही सुरू केले. हळूहळू ते मासिक, पाक्षिक, साप्ताहिक व दैनिक अशा प्रगतिपथावर नेण्याचा त्यांचा मानस होता.

     वैचारिक, समीक्षणात्मक, ऐतिहासिक, सामाजिक असे विविध प्रकारचे लेखन करत असतानाच त्यांची काव्यप्रतिभाही तेवढ्याच ताकदीने बहरत होती. संस्कृत व मराठी अशा दोन्ही भाषांतून त्यांची कविता अभिव्यक्त होत होती. महाभारताच्या विविध प्रसंगांवर, विविध वृत्तांतून त्यांनी रचलेले ‘गीतभारत’ हे ३५० पृष्ठांचे सटीप काव्य १९७५ साली प्रकाशित झाले.

     बाळशास्त्री  यांनी वाल्मिकिरामायणाचे समवृत्त रूपांतर मराठीतून करायला सुरुवात केली होती. त्यातील बालकांड व अयोध्याकांड यांतील काही सर्ग रूपांतरित करून झाले, पण दुर्दैवाने ते कार्य अपूर्ण राहिले. बाळशास्त्रींची विद्वत्ता व व्यासंग पाहून गोवर्धनपीठाच्या शंकराचार्यांनी त्यांना ‘महामहोपाध्याय’ ही पदवी दिली. त्यांच्या ठिकाणी राष्ट्रभक्ती व धर्मभक्ती यांचा सुंदर संगम होता. हिंदू संस्कृतीच्या प्रचारासाठी आसिंधुसिंधू भारतभ्रमण करत असताना त्यांच्या नित्य उपासनेत कोणताही खंड पडला नाही. स्नान, संध्या, जप व धर्मग्रंथांचे नित्य वाचन हे नियमितपणे होत असे. त्यांना धर्मग्रंथांत भगवद्गीता अत्यंत प्रिय होती. त्याखालोखाल ज्ञानेश्वरीचे स्थान होते.

     चतुर्मासात भागवताची प्रत्येकी सात दिवसांचे एक पारायण अशी त्यांची पारायणे होत. पुढेपुढे तर ते ‘एकाह भागवत’ म्हणजे एका दिवसात संपूर्ण भागवताचा पाठ करू लागले. असे एकाह द्वारका, मथुरा व पुष्कर या ठिकाणी करण्याचा त्यांचा मानस होता. पैकी, द्वारकेचा एकाह पूर्ण झाला. इतर दोन पूर्ण होऊ शकले नाहीत.

     हिंदुमहासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विदर्भ साहित्य संघ, महाराष्ट्र संस्कृत परिषद, भोंसला वेदशास्त्र महाविद्यालय, महाराष्ट्र ब्राह्मण सभा, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती, महाराष्ट्र मंडळ, अशा अनेक संस्थांपैकी काहींचे ते अध्यक्ष, तर काहींचे मानद सभासद होते. ज्या संस्थेसाठी त्यांनी कितीही अल्पकाळ काम केले तरी त्या संस्थेला त्यांनी केवळ ऊर्जितावस्थेतच नव्हे, तर सरकारदरबारीही त्या संस्थेची पत वाढेल असे प्रयत्न केले. त्यासाठी विविध योजनांची आखणी, मोठमोठे उत्सव व मोठ्या लोकांना संस्थेत आणणे यांसारख्या गोष्टी ते करत.

     शास्त्रीबुवांचे सर्वच ग्रंथ गौरवले गेले; महाराष्ट्र शासनानेही त्यांच्या डॉ. मुंजे यांच्या चरित्राला प्रथम क्रमांक देऊन त्याचा यथायोग्य गौरव केला. श्री. बापूजी अणे त्यांचा ‘चालते-बोलते विद्यापीठ’ असाच उल्लेख करत. त्यांचे व्यक्तिगत जीवनही स्पृहणीय आहे.

     शास्त्रीबुवांंना स्वतःच्या घराण्याचा सार्थ अभिमान होता. त्यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचे दातृत्वही वाखाणण्यासारखे होते. १९६३पर्यंत उत्तम शरीरयष्टी असणार्‍या शास्त्रीबुवांना पाठीला काळपुळी झाली. १९६४मध्ये सेल्युलायटिस झाले. १९६५मध्ये पाय मुरगळल्याचे निमित्त होऊन त्यांच्या पायाला भेग पडली व त्यात खडा अडकून त्याचे सेप्टिक झाले. पण १९६७मध्ये त्यांना अनाकलनीय अशी व्याधी झाली. तिचे निदान कोणत्याच डॉक्टरला करता आले नाही आणि अवघ्या सहा महिन्यांत ते अनंतात विलीन झाले. एक ज्ञाननिधी हरपला. संस्कृतीचा अखंड वाहणारा प्रवाह असा अचानक खंडित झाला. एक चालते-बोलते विद्यापीठ अस्तास गेले!

डॉ. आसावरी बापट

श्रीरंभट्टलवार, बाळाराव व्यंकटेश