Skip to main content
x

शर्मा, मनमोहन

     डॉ. मनमोहन शर्मा यांचा जन्म जोधपूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण त्या काळात जोधपूर येथील महेश्‍वरी शाळेत, तसेच सरदार विद्यालयामध्येही झाले. जसवंत महाविद्यालय, जोधपूर येथून त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. मुंबई विद्यापीठातून बी.ई. ही रसायन अभियांत्रिकीतील पदवी त्यांनी १९५८ साली, तसेच एम.टेक. ही पदवी १९६० साली संपादन केली. आपल्या विद्यार्थिदशेत त्यांना फुटबॉल व टेबल टेनिस या खेळांची आवड होती.  

     मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये (आय.सी.टी.) त्यांनी १९५८ साली आपल्या शास्त्रीय संशोधनाची सुरुवात केली. त्यानंतर ते केंब्रिज विद्यापीठात पुढील संशोधनाकरिता गेले व त्यांनी १९६४ साली पीएच.डी. ही पदवी मिळवली. आय.सी.टी. संस्थेमध्ये अध्यापक, प्राध्यापक, विभागप्रमुख इत्यादी पदांवर त्यांनी १९८९ सालापर्यंत काम केले व १९८९ साली ते आय.सी.टी.चे संचालक म्हणून काम पाहू लागले. वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी ते प्राध्यापक झाले.

     रसायन अभियांत्रिकीमधील सर्व शाखांमध्ये त्यांनी संशोधनाचे कार्य केले. रासायनिक प्रक्रिया घडत असताना संयंत्रांमधील सर्व घटकांच्या निरनिराळ्या टप्प्यांत होणाऱ्या हालचालींवरील (मास ट्रान्सफर) त्यांचे संशोधन जागतिक मान्यतेचे ठरले. निरनिराळ्या अवस्थांतील रसायनांच्या प्रक्रियांवरील संशोधन, उत्प्रेरक आणि त्याच्या विविध स्वरूपांचे परिणाम, ‘आयन प्रक्रिया उत्प्रेरक’ (आयन एक्स्चेंज कॅटॅलिस्ट) आणि रासायनिक प्रक्रियांतील विघटन या विषयांत त्यांनी मौलिक संशोधन केले.

     गुंतागुंतीच्या दोन किंवा जास्त अवस्थेतील रासायनिक प्रक्रियांवर त्यांनी मूलभूत संशोधन केले व त्यायोगे अनुत्तरित प्रश्‍नांची उत्तरे मिळवली. त्यांनी मोजमापनाकरिता शोधून काढलेल्या नवीन पद्धतीने अतिशीघ्र रासायनिक क्रियांची गती मोजणे शक्य झाले. पदार्थाच्या रासायनिक संयंत्रात पदार्थांच्या शुद्धीकरणाकरिता पदार्थशोषण व त्याचे विघटन या क्रियांना फार महत्त्व असते व अशा प्रकारच्या प्रक्रियांना वरील मूलभूत संशोधनातून त्यांनी गणितिसूत्रे तयार केली. दोन द्रवपदार्थांतील मिश्रण व त्याचा रासायनिक प्रक्रियेकरिता उपयोग या विषयांतही त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले.

     रासायनिक पदार्थांच्या शुद्धीकरणाकरिता उपयोगात येणाऱ्या प्रक्रिया ऊर्ध्वपतन, स्फटिकीकरण इत्यादींमध्ये नावीन्यपूर्ण संशोधन करून त्यांचा उपयोग रसायन अभियांत्रिकीमध्ये मोठ्या प्रमाणात केला.

     डॉ. शर्मा हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रसायन अभियंता असून जगातील निरनिराळ्या विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे काम केले आहे. देशातील आणि देशाबाहेरील रसायन उद्योगाच्या बऱ्याच प्रकल्पांमध्ये त्यांच्या संशोधनाचा उपयोग केला जात आहे. त्यांनी लिहिलेली, त्यांच्या विषयातील पुस्तके जगभरातील विद्यापीठात वापरली जातात. त्यांना निरनिराळे पुरस्कार व मानद सभासदत्वे मिळाली.

     शास्त्रीय संशोधनातील उत्कृष्ट कामगिरीकरिता भारत सरकारतर्फे ‘शांती स्वरूप भटनागर’ पुरस्कार ४५ वर्षांखालील संशोधकास दिला जातो. डॉ. शर्मा यांना हा पुरस्कार १९७३ साली त्यांच्या वयाच्या छत्तिसाव्या वर्षी मिळाला, तर ते ४५ वर्षांचे होण्याअगोदर त्यांच्या एका विद्यार्थ्यासही तो मिळाला. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीतर्फे दिला जाणारा ‘मेघनाथ साहा’  पुरस्कार त्यांना १९९६ साली मिळाला. इंग्लंडच्या रॉयल सोसायटीतर्फे त्यांना १९८२ मध्ये ‘फेलोशिप’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याच संस्थेतर्फे ‘लिव्हरह्यूम पुरस्कार’ त्यांना १९९६ साली देण्यात आला. त्यांना ‘फेलो’ म्हणून मान्यता देण्यात येणाऱ्या संस्था नॅशनल सायन्स अकॅडमी, इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स, थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्स या होत्या. १९८५ साली त्यांना ओमप्रकाश भसीन पुरस्कार देण्यात आला. त्याच साली त्यांना विश्वकर्मा पुरस्कार मिळाला. ‘जी.एम. मोदी सायन्स पुरस्कार १९९१ साली त्यांना मिळाला. त्यांनी केलेल्या संशोधन व शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्याकरिता त्यांना १९८९ साली पद्मभूषण व २००१ साली पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

     त्यांनी आय.सी.टी.मध्ये संशोधन करत असतानाच एकंदर ७१ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवीसाठी मार्गदर्शन केले. यांमध्ये डॉ. माशेलकर व डॉ. जे.बी. जोशींसारखे नामवंत संशोधकही होते. सध्या त्यांच्या या गुरुकुलातील चौथी पिढी कार्यरत आहे. केंब्रिज व मुंबई विद्यापीठात ते आपल्या कुशाग्र निरीक्षण व स्मरणशक्तीमुळे सर्वांस परिचित आहेत. १९६० सालापासून ४० वर्षे त्यांनी संस्थेच्या प्रगतीचे कार्य इतक्या सक्षमपणे केल्यामुळेच आज सर्व जगभर ‘आय.सी.टी.’चे नाव एक अग्रगण्य शिक्षण संस्था, असे प्रसिद्ध झाले आहे. आज भारतातच नव्हे, तर जगभर त्यांचे विद्यार्थी ‘आय.सी.टी.’चे, पर्यायाने त्यांनी सुरू केलेले संशोधनकार्य करीत आहेत. ‘मेटोजीनिअस रिअ‍ॅक्शन’ या विषयावरील त्यांनी लिहिलेले दोन ग्रंथ आजही जगभर संशोधन व उद्योग क्षेत्रास मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत.

     — डॉ. श्रीराम मनोहर

शर्मा, मनमोहन