Skip to main content
x

सुझा, फ्रान्सिस न्यूटन

चित्रकार

प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूपचे संस्थापक आणि बंडखोर आधुनिक चित्रकार, फ्रान्सिस न्यूटन सुझा यांचा जन्म सालीगो या गोव्यातील पोर्तुगीज कॉलनीमध्ये, वडील जोेसेफ न्यूटन व आई लिली मेरी यांच्या रोमन कॅथलिक कुटुंबात झाला. त्यांच्या जन्मानंतर अवघ्या तीन महिन्यांत वडिलांंचा मृत्यू झाला. परिणामी, अर्थार्जनाकरिता त्यांची आई मुंबईत आली व तिने भरतकाम, शिवणकामाचे शिक्षण देणारी संस्था स्थापन केली. पुढे न्यूटनला देवीचा गंभीर आजार झाला, पण तो वाचला. परिणामी, नवसानुसार आईने त्याच्या मूळ नावात गोव्याचे पेट्रन सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या नावावरून ‘फ्रान्सिस’ हे नाव जोडले. त्यांचे १९४२ पासून ‘फ्रान्सिस न्यूटन सुझा’ हे नाव प्रचलित झाले.

सूझांनी १९३७ साली मुंबईच्या सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये उच्च माध्यमिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला. परंतु १९३९ मध्ये शाळेच्या प्रसाधनगृहात अश्‍लील रेखाचित्रे काढल्याच्या आरोपामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. तेव्हापासूनच समाज किंवा ‘व्यवस्थे’कडून विरोध होण्यास, आणि सूझा व व्यवस्था यांच्यात एक संघर्षमय नाते निर्माण होण्यास सुरुवात झाली.

पुढे १९४० मध्ये त्यांनी, वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला; पण १९४५ मध्ये संचालक चार्ल्स जेरार्ड यांनी त्यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतल्यामुळे आर्ट स्कूलमधून काढून टाकले. 

हे सगळे घडत असतानाच तरुण सूझा मार्क्सवादाकडे आकर्षिले गेले व ते कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य झाले. पण जेव्हा चित्रे कशी काढावीत याबद्दल पार्टीतले लोक सांगू लागले, तेव्हा ते पार्टीतून बाहेर पडले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४८ मध्ये सूझांनी ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप’ स्थापन करण्यात पुढाकार घेतला. रझा, सुझा, आरा, गाडे, बाकरे व हुसेन हे या ग्रूपचे सुरुवातीचे सभासद होते. या ग्रूपचे १९४९ मध्ये पहिले प्रदर्शन झाले. भारतीय कलाजगतातील ही एक प्रमुख घटना होती. या ग्रूपने या प्रदर्शनाच्या वेळी जाहीर केले, की हे सर्व चित्रकार आधुनिक आहेत व ते भारताच्या भूतकालीन महान चित्रकारांशी, परंपरांशी नाते तोडून आशय व तंत्राबाबत स्वातंत्र्यपूर्णतेने चित्रे घडवत आहेत.

आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रदर्शनातून १९४९ मध्ये सुझांची दोन चित्रे उतरवण्यात आली व अश्‍लील चित्रे काढल्याबद्दल पोलिसांनी त्यांच्या घरावर धाड टाकली.

पुढे २२ जुलै १९४९ रोजी त्यांनी पत्नी मारियासह लंडनला प्रयाण केले. लंडनला जाण्यासाठी पैसे जमवणे आवश्यक होते. स्वत:च्या चित्रांचे प्रदर्शन भरवून त्यांनी ते जमवले. इंग्लंडमधील पहिली पाच वर्षे चित्रकार म्हणून जम बसवण्यात गेली. या काळात पत्रकारिता करून त्यांनी उदरनिर्वाह केला. लंडनमध्ये सुरुवातीचा काळ कठीण गेला; पण त्या वेळचे उच्चायुक्त व्ही.के. कृष्ण मेनन यांनी दिलेल्या भित्तिचित्राच्या म्हणजेच ‘म्यूरल’च्या कामामुळे, तसेच भरवलेल्या प्रदर्शनामुळे हळूहळू सुझांची ओळख लंडनच्या कलाक्षेत्रात व्हायला लागली. त्यांची १९५२ पासून पुढे लंडन, पॅरिस, स्पेन, अमेरिका येथे प्रदर्शने झाली. त्यांचे अनेक लेख, कविता प्रसिद्ध झाल्या. त्यांत ‘निर्वाणा ऑफ अ मॅगॉट’ (१९५५) व ‘वडर्स अ‍ॅण्ड लाइन्स’ (१९५९) ही आत्मचरित्रात्मक लेख असलेली पुस्तके प्रसिद्ध झाली व ती गाजली.

एडवर्ड मुलीन्स, स्टीफन स्पेन्डर (‘एन्काउण्टर’ मॅगझीन), अ‍ॅण्ड्र्यू फोर्ज, जॉर्ज बुचर, जॉन बर्जर यांसारख्या नामांकित लेखक, कलासमीक्षकांनी सूझांवर अनेक वेळा लिहिले. स्टीफन स्पेंडर यांनी सूझांचा ‘निर्वाणा ऑफ अ मॅगॉट’ हा लेख वाचल्यावर ‘गॅलरी वन’चे मालक व्हिक्टर मस्ग्रेव्ह यांच्याशी सूझा यांची ओळख करून दिली. या गॅलरीत १९५५ मध्ये प्रदर्शित झालेली सुझा यांची सर्व चित्रे विकली गेली.

व्हेनिस बिनाले, गॅलरी वन लंडन, द व्हाइट चॅपेल आर्ट गॅलरी, अमेरिका, टेट गॅलरी, एडलबर्ग फेस्टिव्हल, कॉमनवेल्थ एक्झिबिशन्स, नॅशनल गॅलरी ऑफ व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया अशा गॅलर्‍यांमध्ये सुझांची प्रदर्शने झाली.

ते १९६० मध्ये भारतात आले. त्यांची १९६३ पासून भारतातही अनेक गॅलर्‍यांमध्ये एकल प्रदर्शने झाली. परदेशांतील समूह प्रदर्शनांत त्यांची चित्रे फ्रान्सिस बेकन, ल्यूसियन फ्रॉइड यांसारख्या ब्रिटिश चित्रकारांच्या चित्रांसोबत प्रदर्शित केली गेली. एका आर्ट गॅलरीच्या आमंत्रणावरून १९६७ मध्ये त्यांनी अमेरिकेत स्थलांतर केले व शेवटपर्यंत तेथेच वास्तव्य केले.

सुझा यांचा चित्रकार म्हणून असलेला दबदबा कालांतराने ओसरत गेला. लंडनच्या टेट मॉडर्न गॅलरीत सुझा यांचे ‘क्रूसिफिक्षन’ हे चित्र २००१ मध्ये पुन्हा लावण्यात आले आणि सुझांचे स्थान पुनर्स्थापित झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चित्रांचे नव्याने मूल्यमापन होत आहे आणि संग्रहकांकडूनही त्यांच्या चित्रांना मागणी येत आहे. ‘बर्थ’ हे त्यांचे चित्र एका चित्रांच्या लिलावात मोठ्या किमतीला विकले गेले. ललित कला अकादमी, नवी दिल्ली इथे एप्रिल २०१० मध्ये सुझा यांच्या दोनशेहून अधिक कलाकृतींचे प्रदर्शन भरले होते.

एक आधुनिक भारतीय चित्रकार म्हणून सुझा नावारूपाला आले. सुझा, तसेच इतर प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूपच्या शैलीवर जर्मन एक्स्प्रेशनिझम, अतिवास्तववाद, अमेरिकन कला, तसेच पिकासो, हेन्री मातीस व इतर फॉविझम शैलीमधील चित्रकारांच्या चित्रशैलीचा प्रभाव आहे. 

सुझा यांचे चित्रविषय स्थिरचित्र, निसर्गचित्र, पुराणकथांमधील प्रसंग, मानवी चेहरे, स्त्रीदेह असे अनेक आहेत. अत्यंत उत्स्फूर्तपणे रंगवलेली चित्रे, ठळकपणे चित्रणात आणलेला थेटपणा, अत्यंत तीव्रतेने केलेली भावनिक अभिव्यक्ती, मुक्त रंगसंगती व  लेपन ही सुझा यांच्या चित्रांची वैशिष्ट्ये आहेत.

आर्ट स्कूलमधील अकॅडमिक कलाशैली, तसेच भारतीय शैली यांच्या तुलनेत सुझांची चित्रे खूप वेगळी होती आणि आहेत. त्यांचा आविष्कार आर्ट स्कूलमधील चित्रांप्रमाणे सभ्य समाजाच्या कल्पनांनुसार नसतो. त्यांतील मानवी शरीराचे विरूपीकरण, त्यातील सुचवलेली हिंसा, कुरूपता, वासना रसिकांना आक्रमक वाटतात. या आक्रमकपणामुळे प्रेक्षक व चित्रप्रतिमा यांत संघर्षमय अनुभव प्रस्थापित होतो.

या संघर्षमय अनुभवाच्या निर्मितीद्वारे समाज, स्त्रिया, चर्चची व्यवस्था, त्यातील भ्रष्टाचार यांच्याबद्दलची अस्वस्थता, चीड आणि घृणा सुझा व्यक्त करतात; किंवा पौराणिक, तसेच वर्तमानातील गोष्टीं-संबंधातील भावनाही त्यांच्या चित्रांमधून तीव्रतेने येतात.

सुझा एक तरल भाववृत्ती असलेले, वासनाविकारांचा नि:संकोचपणे रांगडा आविष्कार करणारे बंडखोर कलावंत होते. पण या बंडखोरीमागे त्यांची अशी एक वैचारिक बैठक होती, ती त्यांच्या लेखनातून जाणवते. प्रोग्रेसिव्ह ग्रूपपैकी कलानिर्मितीमागच्या प्रेरणा, कलातत्त्वे यांबाबत चित्रांइतक्याच समर्थपणे आणि विस्ताराने लेखन करणारे सुझा एकमेव असावेत.

लहानपणी त्यांच्यावर ख्रिस्ती धार्मिक रीतिरिवाजांचे झालेले संस्कार आणि लैंगिक विचारांची नैसर्गिक ओढ यांच्यातला संघर्ष त्यांच्या चित्रांमधून येतो. लहानपणी एकलकोंडे असलेले सुझा कल्पनेच्या राज्यात रमत. चर्चच्या इमारतींची भव्यता आणि यातनांनी भरलेल्या ख्रिस्ती संतांच्या पुराणकथा यांच्या प्रभावामुळे सुझा स्वर्गीय देवदूत, चंद्रतारे आणि राक्षसांच्या दुनियेत रममाण होत.

सुझा यांना लहानपणापासून नग्न स्त्री-देहाचे आकर्षण होते. सुझा यांनी असंख्य नग्नचित्रे काढली. त्यांच्या नग्नचित्रांमध्ये बर्‍याच वेळा स्त्रीचा योनिभाग, मोठ्या आकाराचा स्तनभार ठळकपणे चित्रित केलेला असे. स्त्री-देहाचे चित्रण करताना त्यांची रेषा कधी तरल, सौंदर्यपूर्ण होई, तर कधी आदिम कलाकृतींमधला रांगडेपणा त्यांच्या स्त्री-देह चित्रणात येत असे. सुझा यांनी तथाकथित सभ्यतेच्या मर्यादा झुगारून दिल्या आणि त्यांच्या अंतर्मनाला जे

वाटले, ते त्यांनी त्याच रांगड्या उत्कटतेने कागदावर चितारले. गोव्याच्या निसर्गाचा त्यांच्या मनावर खोल संस्कार होता, तो त्यांच्या निसर्गचित्रांमधून प्रकटपणे येत राहिला.

सुझा यांनी सांगितल्याप्रमाणे निसर्ग हाच त्यांचा धर्म होता. माणसाच्या मनात ईश्‍वर, देवदेवता, सैतान, देवदूत आणि भुतेखेते निर्माण करणारा निसर्गच असतो. जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसाच्या मनात ती वसत असतात. सुझा यांची कलानिर्मिती त्यांच्या व्यक्तिगत संघर्षातून आलेली होती. सुझा यांच्या बंडखोरीला स्वातंत्र्य चळवळीची, कम्युनिस्ट विचारांची लेबले लावली जातात. पण त्यांच्या कृतीला असा काही सामाजिक संदर्भ नव्हता. सुझा त्यांच्या हयातीतच एक आख्यायिका बनले होते. स्वातंत्र्यचळवळीत सहभाग, कम्युनिस्ट पार्टीचे सदस्यत्व असे त्यांच्याबद्दलचे तपशील तारतम्यानेच घेतले पाहिजेत.

सर्वसाधारणपणे सुझा यांच्या सहवासात आलेल्या स्त्रिया, चर्च आणि एकूणच धार्मिक आणि सामाजिक व्यवस्था यांच्याबद्दल त्यांना ओढ होती आणि तिरस्कारही होता. हा अंतर्विरोध सुझा यांच्या चित्रांमधून सातत्याने येतो. सुझा यांच्या १९४० च्या दशकातील चित्रांमधून बंडखोर वृत्ती प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या रेखाचित्रांमध्ये आणि गोव्याच्या निसर्गचित्रांमध्ये, रेषेमध्ये आणि रंगलेपनात एक प्रकारची रांगडी ऊर्जा आहे. मानवाकृती आणि शरीररचनेचा ध्यासही या काळात दिसतो. पन्नासच्या दशकात लंडनला स्थलांतरित झाल्यामुळे आणि कौटुंबिक ताणतणावामुळे आलेली अस्वस्थता त्यांच्या चित्रांमधून दिसते.

साठच्या दशकात सुझा यांना चित्रकार म्हणून मान्यता मिळाली होती. त्यामुळे या काळातल्या चित्रांत एक प्रकारचा आत्मविश्‍वास दिसतो. सुझा यांचे पहिले लग्न १९६५ नंतर  मोडले आणि त्यांनी दुसरे लग्न केले. त्यांनी न्यूयॉर्कला स्थलांतर केले. या काळात सुझा पुन्हा अस्वस्थ होते. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रांमध्ये दिसते. चित्रे काढणे हा सुझा यांनी अस्तित्वासाठी दिलेल्या लढ्याचा एक अविभाज्य भाग होता. ‘‘चित्रकला माझ्यासाठी सौंदर्यपूर्ण कला नाही. एखाद्या सरपटणार्‍या प्राण्याप्रमाणे ती कुरूप आहे,’’ अशी धक्कादायक विधाने ते करत.

नव्वदच्या दशकात सुझा यांच्या चित्रांमधून मृत्यू एक विषय म्हणून येऊ लागला. ‘द लास्ट सपर’, ‘पिएता’ अशा ख्रिस्ती धर्माशी संबंधित प्रतिमा त्यांच्या चित्रांमधून दिसू लागल्या. या अखेरच्या चित्रांमध्ये वेदनेचा एक अंत:स्वर जाणवतो. कॅथलिक संस्कार आणि गोव्याच्या भूमीपासून सुझा यांनी मुक्त होण्याचे अनेक प्रयास केले. पण सारा प्रवास करूनही ते मायभूमीची आणि धर्माची नाळ तोडू शकले नाहीत. पुन्हा पुन्हा ते तिथेच येत राहिले. यात विरोधाभास असला तरी सुझा यांच्या व्यक्तिमत्त्वाशी ते सुसंगतच आहे.

भारतीय कलेच्या इतिहासात स्वातंत्र्योत्तर काळात मानवाकृतिप्रधान व अमूर्त अशा दोन प्रकारांची चित्रे घडवली जाऊ लागली. भारतीय समाजमनाचे प्रतिबिंब मानवाकृतीद्वारे दर्शवणारे अनेक कलाकार अस्तित्वात आले. अशा प्रकारच्या चित्रांचे फ्रान्सिस न्यूटन सुझा हे एक प्रमुख प्रणेते होते. वयाची अठ्ठ्याहत्तर वर्षे पूर्ण करण्यास दोन आठवडे बाकी असतानाच सुझांचे मुंबईत निधन झाले.

- महेंद्र दामले, दीपक घारे

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].