Skip to main content
x

शुक्ला, विरेंद्रनाथ सिद्धेश्वर

       विरेंद्रनाथ सिध्देश्वर शुक्ला यांचा जन्म उत्तर प्रदेशामधील लखनऊ जिल्ह्यातील उन्नाव येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उन्नाव येथेच झाले. तेथूनच त्यांनी १९४५मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी बी.एस्सी. (कृषी) व एम.एस्सी. (कृषी) या दोन्ही पदव्या कानपूरच्या शासकीय कृषी महाविद्यालयातून प्राप्त केल्या.

       विरेंद्रनाथ सिध्देश्वर शुक्ला यांनी १९६८मध्ये आय.ए.आर.आय. नवी दिल्ली येथून पीएच.डी. प्राप्त केली. त्यांनी कानपूर येथे विविध पदांवर नोकरी केली आणि नागपूर येथील महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून त्यांची निवड झाली. राज्य पुनर्रचनेनंतर त्यांची मुंबई इलाख्यात बदली झाली. ते १९६९-७२पर्यंत अकोला कृषी महाविद्यालयात वनस्पति-रोगशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करत होते. शुक्ला यांची नंतर पुणे येथे उपसंचालक या पदावर नेमणूक झाली. डॉ.पं.दे.कृ.वि.ची स्थापना झाल्यावर नागपूर येथे वनस्पतिशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून त्यांची बदली झाली. त्यानंतर त्यांची विभागप्रमुख वनस्पति-रोगशास्त्र या पदावर पदोन्नती झाली. पुढे त्यांची अधिष्ठाता (कृषी) या पदावर नेमणूक झाली.

       डॉ. पं.दे.कृ.वि.मध्ये ५० विद्यार्थ्यांना एम.एस्सी. (कृषी) पदवीसाठी मार्गदर्शन केले व एका विद्यार्थ्याला पीएच.डी. पदवीसाठी मार्गदर्शन केले. त्यांनी अ‍ॅकॅडमिक काऊन्सिलचे अध्यक्षपदही भूषवले. त्यांना एफ.आय.पी.एस. ही मानद पदवी दिल्लीच्या विकृतिशास्त्र संस्थेने प्रदान केली होती. नोव्हेंबर १९८८ मध्ये विरेंद्रनाथ सिद्धेश्‍वर शुक्ला अधिष्ठाता (कृषी) या पदावरून सेवानिवृत्त झाले.

- प्रा. पद्माकर दत्तात्रेय वांगीकर

शुक्ला, विरेंद्रनाथ सिद्धेश्वर