Skip to main content
x

सुखात्मे, सुहास पांडुरंग

      सुहास पांडुरंग सुखात्मे यांचा जन्म बडोदा येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण दिल्लीच्या सेंट कोलंबिया हायस्कूलमध्ये झाले आणि यंत्र अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग)चे महाविद्यालयीन शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठातून झाले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एम.आय.टी.) मधून ‘मास्टर ऑफ सायन्सेस’ (एम.एस.) आणि ‘डॉक्टरेट ऑफ सायन्सेस’ (डी.एस्सी.) केले. त्यांनी एक वर्षभर तेथेच अध्यापनाचे काम केले आणि १९६५ साली ते मुंबईला येऊन ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आय.आय.टी.), पवई येथे सहायक प्राध्यापकाच्या हुद्यावर अध्यापनाचे काम करू लागले. १९७० साली ते प्राध्यापक झाले.

     १९७३ ते १९७५ या काळात ते आय.आय.टी. पवईच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख होते. १९६५ ते १९८२ अशी १७ वर्षे आय.आय.टी.मध्ये अध्यापन केल्यावर आपणच आपल्याकडे त्रयस्थपणे पाहावे, गुणवत्ता सुधारावी, जगातले काही नवीन पाहावे अशी इच्छा त्यांच्या मनात बळावली. मग १९८२-१९८३ असे एक वर्ष ते अमेरिकेच्या आयोवा स्टेटमध्ये अतिथी प्राध्यापक म्हणून काम करून आले. त्यानंतर डिसेंबर १९८३ ते डिसेंबर १९८५ या काळात ते आय.आय.टी., पवईचे उपसंचालक झाले. जानेवारी १९९५ ते जानेवारी २००० पर्यंतची पाच वर्षे ते आय.आय.टी., पवईचे संचालक होते. या कारकिर्दीनंतर वयाच्या पासष्टीपर्यंतची पाच वर्षे ते अणुऊर्जा नियामक मंडळाचे (अ‍ॅटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड- ए.ई.आर.बी.) अध्यक्ष होते.

     उष्णतेचे वहन (हीट ट्रान्स्फर) आणि सौरऊर्जा हे त्यांचे अध्यापनाचे आणि संशोधनाचे विषय आहेत. १) द्रवीभूत धातूचे बाष्पीभवन होत असताना, संघननाद्वारे होणारे उष्णतेचे वहन; २) बाह्य प्रवाहातून अभिसरणामार्फत होणारा उष्णतेतील बदल; ३) उष्णता रोधक आवरणातून (इन्स्यूलेशन) होणारे उष्णतेचे वहन; ४) धातूची टाकी सपाट पत्र्यापासून बनवण्याऐवजी जर त्रिकोणी काप एकमेकांना जोडून ती बनवली, तर भिंतीचे पृष्ठफळ वाढते. अशा टाक्यातून होणार्‍या उष्णतेचे वहन-(रस्त्यावर विजेची रोहित्रे-टान्सफॉर्मर्स लावलेली असतात. त्यांत तेल भरलेले असते आणि त्यातून विजेच्या तारा जातात. वीजवहनामुळे उष्णता निर्माण होते. ती उष्णता तेल आपल्यात सामावून घेते आणि विजेच्या तारा तुलनेने थंड राहतात. अशी निर्माण झालेली उष्णता वाहून जाण्यासाठी रोहित्रे सपाट भिंतींची न बनवता, त्रिकोणी काप एकमेकांना जोडून अथवा पत्रा तसा वाकवून बनवतात (फिनप्लेट्स). त्यामुळे पृष्ठफळ वाढते आणि आतल्या तेलातील उष्णता बाहेरच्या हवेत निघून जाते; ५) विविध द्रवपदार्थ आणि त्यांच्या मिश्रणाचे उष्मागती (थर्मोडायनॅमिक) गुणधर्म आणि वाहतूक करत असताना होणारे उष्णतेतील बदल; ६) शीतक (रेफ्रिजरंट्स) द्रव्यांच्या संघनन (कंडेन्सेशन) क्रियेमुळे होणारे उष्णतेचे वहन आणि त्याच्या काटेरी भिंतीच्या नलिकांवर (फिन ट्यूब्स) होणारे उष्णतेतील परिणाम, या क्षेत्रात डॉ.सुखात्मे यांनी आपले संशोधन केले.

     १९६५ साली डॉ.सुखात्म्यांनी ‘आय.आय.टी.’मध्ये शिकवायला सुरुवात केली, तेव्हा उष्णतेच्या वहनासंबंधी प्रयोग दाखवायला काही सोयी उपलब्ध नव्हत्या. डॉ.सुखात्म्यांनी यासाठी स्वत: शून्यातून प्रयोगशाळा उभारली. १९६६ साली, चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना, परीक्षेच्या वेळी पुस्तके पाहण्याची (ओपन बुक सिस्टिम) सुविधा उपलब्ध करून दिली. प्रा.सुखात्म्यांनी शिस्तबद्ध आणि तर्कशुद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविले त्या वेळी ते वर्गात जाताना जशी तयारी करून जात, तितक्याच गांभीर्याने तशीच तयारी आज वयाच्या सत्तरीनंतर ‘प्रोफेसर एमिरिटस’ म्हणून शिकवीत असतानाही ते करतात. उष्मागती, सौरऊर्जा उष्णतेचे उपयोग, अभियांत्रिकीतील प्रयोग, इत्यादी विषय त्यांनी शिकविले.

     १९८० सालच्या दशकात एक छोटा विभाग स्थापन करून ‘आय.आय.टी.’, पवईत त्यांनी उर्जायंत्रणेत पदव्युत्तर आणि पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांसाठी विविध विद्याशाखांतर्गत अभ्यासाची सुविधा उपलब्ध करून दिली. या छोट्या विभागाचे रूपांतर आता ‘एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग’ या नावाच्या मोठ्या विभागात झाले आहे. डॉ.सुखात्मे ‘आय.आय.टी.’चे संचालक असताना, ‘शैलेंद्र जे. मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंट’ आणि ‘कन्वल रेखी स्कूल ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’ या दोन विद्याशाखांचे स्वतंत्र विभाग सुरू झाले. अध्यापन चालू असताना, डॉ.सुखात्म्यांचा ‘विज्ञान विभाग’, ‘अवकाश संशोधन विभाग’, ‘विज्ञान आणि प्रौद्योगिक संशोधन संस्था’ (सी.एस.आय.आर.) आणि ‘अण्ाुऊर्जा आयोग’ या संस्थांशी संबंध येत गेला.

     त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५० विद्यार्थ्यांनी एम.टेक. केले आणि १९ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. केले. डॉ.सुखात्मे यांनी विविध संशोधन पत्रिकांमधून ३५ निबंध लिहिले आणि २८ निबंध विविध सभा-संमेलनांत सादर केले. ते निबंध त्या परिषदांच्या कार्यवृत्तांत प्रसिद्ध झाले. त्यांनी आजवर नऊ संशोधनपर वृत्तान्त लिहिले. तीन पाठ्यपुस्तकांत प्रकरणे लिहिली. ‘हीट ट्रान्स्फर’, ‘सोलर एनर्जी’ आणि ‘आय.आय.टी.’, पवईच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त निघालेल्या पुस्तकाचे लेखन, अशी त्यांची पुस्तकसंपदा आहे.

     निवृत्तीनंतर आता डॉ.सुखात्मे बंगळुरूच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’च्या पदोन्नती आणि मूल्यांकन मंडळाचे सभासद आहेत, तसेच अणुऊर्जा आयोगाच्या ‘अणुविज्ञान संशोधन मंडळा’चे सभासद आहेत; ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग इन इंजिनिअरिंग’ (निटी) च्या संचालक मंडळाचे नियंत्रक आहेत, आणि ‘आय.आय.टी.’,पवईच्या सल्लागार मंडळाचे सभासद आहेत.

     प्रा. सुखात्मे यांना बनारसला असताना, अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला, प्रथम वर्गात पहिले आल्याबद्दल ‘प्रिन्स ऑफ वेल्स सुवर्णपदक’ मिळाले होते. १९८३ साली त्यांना ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार’ मिळाला. १९८६ साली ‘इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस’चे,  तर १९८७ साली ‘इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग’चे ते फेलो झाले. १९९९ साली ‘नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस’ने त्यांना फेलोशिप दिली. २००१ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ किताब दिला. २००१ साली आय.आय.टी., पवईने त्यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ दिला. ‘ओमप्रकाश भसीन पुरस्कार’ आणि बनारस हिंदू विद्यापीठाची मानद डॉक्टरेट यासुद्धा त्यांना २००१ सालात देण्यात आल्या.

अ. पां. देशपांडे

सुखात्मे, सुहास पांडुरंग