सुतार, दादासाहेब मारुती
कऱ्हाड भागात चित्रकला क्षेत्रात चित्रनिर्मितीसोबत चित्रकलाविषयक उपक्रमांतून कलाप्रसार करणारे चित्रकार म्हणून दादासाहेब मारुती सुतार कार्यरत आहेत. त्यांचा जन्म खटाव तालुक्यातील लाडेगाव येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण चितळी व पुसेसावळी येथे झाले.
शालेय वयात, १९६७ मध्ये अभिनेते मनोजकुमार, धुमाळ, संगीतकार वसंत देसाई, पद्मश्री देवचंद शहा इ. मान्यवरांच्या उपस्थितीत सुतारांनी मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या बंगल्यावर त्यांचे पेन्सिल स्केच केले. ते पाहून पुढील कलाशिक्षणाची व्यवस्था करण्याची जबाबदारी बाळासाहेब देसाई यांनी त्यांचे चिरंजीव शिवाजीराव देसाई यांच्यावर सोपवली व त्यानुसार कोल्हापूर येथील ‘कलानिकेतन’ येथे दादासाहेब सुतार यांचे शिक्षण सुरू झाले. त्या वेळी चित्रकार रा.शि. गोसावी, रवींद्र मेस्त्री यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. त्यांना अभिनेते-चित्रकार चंद्रकांत मांढरे यांचाही सहवास लाभला. कलानिकेतन येथे त्यांचे डी.टी.सी व एलिमेंटरी हे शिक्षण झाले.
पुढील शिक्षणासाठी १९७२ मध्ये ते मुंबई येथे ‘बांद्रा स्कूल ऑफ आर्ट’ येथे गेले व तेथे त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. या काळात त्यांनी अर्धवेळ नोकरीतून शिक्षण पूर्ण केले. या दरम्यान सुतारांनी स्टूडिओ दिवाकरमध्ये एक वर्ष काम केले. पदविका अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर ते मुंबईतून कर्हाड येथे स्थायिक झाले. येथे आल्यावर त्यांनी व्यावसायिक व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, दिनदर्शिका, पुस्तकांची मुखपृष्ठे ते गणपती सजावटीपर्यंतची सर्व प्रकारची कामे केली.
आंध्र-तामीळनाडूमध्ये झालेल्या वादळामुळे मोठी हानी झाली होती. स्थानिक कलावंतांची चित्रे जमवून सुतारांनी त्यांची प्रदर्शने भरवली व त्यांतून उभी केलेली मदत त्यांनी वादळग्रस्तांकडे पाठवली. या वेळी बरेच कलाकार एकत्र आले. यातूनच पुढे कर्हाड येथे ‘कलासंगम’ या संस्थेची स्थापना झाली.
दादासाहेब सुतारांनी या संस्थेच्या माध्यमातून नामवंत चित्रकारांची चित्रप्रदर्शने व प्रात्यक्षिकांची शिबिरे कर्हाड येथे आयोजित केली.
कर्हाड येथे सुतारांनी बा.भ. बोरकर, गो.नि. दांडेकर आदींची, त्यांना प्रत्यक्ष बसवून व्यक्तिचित्रे रंगविली. तसेच शंतनूराव किर्लोस्कर, चंद्रकांत किर्लोस्कर, मुकुंदराव किर्लोस्कर, अरुण किर्लोस्कर, खासदार आबासाहेब खेबुडकर, सातर्याचे प्रतापसिंहराजे भोसले, माजी पंतप्रधान राजीव गांधी अशा अनेक सन्माननीय व्यक्तींची व्यक्तिचित्रे केली. याबरोबरच त्यांनी मंदिरांसाठी दगडी मूर्तीही घडवल्या आहेत. यांमध्ये रेणुका, कालभैरव, योगिनी, योगेश्वरी, विठ्ठल, रखुमाई यांचा समावेश आहे.
सुतारांनी १९९५ मध्ये ६ फूट × १२ फूट या आकाराचे ‘शिवराज्यारोहण’ या विषयावरील एक भव्य तैलचित्र अमेरिकेतील यु.एस. एअरोमोटिव्ह या कंपनीस दिले. त्या वेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते त्याचे अनावरण झाले.
पी.डी. पाटील प्रतिष्ठानाचा पहिला ‘कर्हाड गौरव’ पुरस्कार १९९५ मध्ये दादासाहेब सुतारांना दिला गेला.
- विजयकुमार धुमाळ