Skip to main content
x

सुतार, राम वनजी

           धुनिक भारतीय स्मारकशिल्पाच्या क्षेत्रातील राम वनजी सुतार हे सध्याच्या काळातील अत्यंत यशस्वी शिल्पकार मानले जातात. भारताच्या राजकीय पटावरील अनेक महत्त्वाची व्यक्तित्वे त्यांनी संवेदनशीलतेने शिल्पबद्ध केली. भव्यता, प्रमाणबद्धता, साधर्म्य ही त्यांच्या व्यक्तिशिल्पांची ठळक वैशिष्ट्ये होत.

           त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील गोंडुर या गावी ‘विश्‍वकर्मा सुतार’ समाजात झाला. त्यांच्या आईचे नाव सीताबाई होते. आठ मुलांपैकी राम हे दुसरे अपत्य. त्यांचे वडील लोहारकाम व सुतारकाम करीत. शेतीची लाकडी अवजारे, बैलगाड्या व टांगा बनविणे यांच्या सोबत ते लाकडावर कोरीव कामही करीत. ‘विश्‍वकर्मा’ समाजात जात्याच त्यांच्या कामाचे हुन्नर असते. त्यांच्या घरची थोडी शेती होती. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी खाण्यापिण्याची भ्रांत नव्हती. राम सुतार यांना लहानपणापासून स्केचेस करणे, चित्रे काढणे, मातीची खेळणी बनविणे याचा नाद होता.

           शालेय वयात, म्हणजे ते दहा-पंधरा वर्षांचे असताना अवतीभोवतीचे वातावरण महात्मा गांधीजींच्या विचार- सरणीने भारावलेले होते. गांधींनी गोंडुरला भेट दिली होती. सुतार विनोबा भावे यांच्या नित्य संपर्कात होते. त्यांच्या सभांना व बैठकांना जाणे हा सुतारांचा नित्यक्रम होता. गोंडुरमध्ये झालेल्या विदेशी मालाच्या होळीत त्यांचाही सक्रिय सहभाग होता. शालेय शिक्षण घेण्यासाठी मात्र त्यांना बर्‍याच खस्ता खाव्या लागल्या. राहत्या ठिकाणी शिक्षणाची धड सोय नसल्याने ते नातेवाईक, परिचित मंडळी, शिक्षक यांच्याकडे राहत. थोडीफार कामे करत, कष्टमय जीवन जगत ते मॅट्रिकपर्यंत पोहोचले.

           मॅट्रिकची परीक्षा सुरू असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. या आघाताने ते अत्यंत दु:खी झाल्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले. पूर्वीपासून सहवासात असणार्‍या धुळ्याच्या टीचर्स ट्रेनिंग कॉलेजमधील चित्रकला शिक्षक श्रीराम कृ. जोशी गुरुजींनी त्यांना धीर दिला व राम सुतार सावरले. राम सुतारांच्या आयुष्यात जोशी सरांना गुरुस्थानाचे महत्त्व आहे. जोशी यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांना उद्युक्त केले व त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारे मदत केली.

           मॅट्रिक झालेले नसले तरी त्या काळात जे.जे. स्कूलला प्रवेश घेता येत असे. जे.जे. च्या शिल्पकला विभागात त्यांनी प्रवेश घेतला. तेथील शिक्षणात सुतारांनी नेहमीच आपली चमक दाखविली. त्यांनी १९५३ मध्ये उत्तमरीत्या प्रथम वर्गात पदविका मिळवली. त्यांना मानाचे ‘मेयो’ पदकही मिळाले.

           त्या दरम्यान म्हणजे १९५२ मध्ये त्यांचा विवाह प्रमिला चिमठणकर यांच्याशी झाला. त्यांना १९५४ मध्ये वेरुळच्या ‘आर्केऑलॉजिकल सर्व्हे’मध्ये नोकरी मिळाली. चार वर्षांच्या त्या नोकरीत राम सुतारांनी पडझड झालेल्या पाषाणमूर्तींच्या दुरुस्त्यांची कामे केली. त्यानंतर दिल्लीच्या ‘इन्फर्मेशन ब्रॉडकास्टिंग’ येथे १९५८ मध्ये मॉडेलर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. या काळात झालेल्या शेतकी प्रदर्शनात ठेवण्यासाठी सुतारांनी तेरा फूट उंचीचे शेतकरी जोडप्याचे शिल्प तयार केले व प्रदर्शनाच्या दरवाज्यातच ते ठेवण्यात आले. तत्कालीन केंद्रीय मंत्री पंजाबराव देशमुख यांच्यासह अनेकांनी ते वाखाणले. परंतु अंतर्गत राजकारणामुळे अकरा महिन्यांतच ते राजीनामा देऊन बाहेर पडले.

           नोकरीचा शोध सुरू होता; पण दुसर्‍या बाजूला शिल्पे करण्याची कामे मिळण्यास सुरुवात झाली होती. चंबळ नदीच्या शिल्पाचे काम करण्यासाठी  १९६० च्या दरम्यान काही शिल्पकारांना स्केचेस बनविण्यास सांगण्यात आले. त्यांतील सुतारांनी घडविलेले पाच फुटांचे मॉडेल समितीस आवडले. चंबळ नदी देवतेचे हे शिल्प, चंबळ नदीवरील गांधीसागर या धरणाच्या ठिकाणी असून ते ४५ फूट उंचीचे आहे. सिमेंट काँक्रीटच्या या शिल्पातील अनावृत देवतेच्या दोन बाजूंना दाखविलेली बालके म्हणजे राजस्थान व मध्य- प्रदेशाची प्रतीकात्मक रूपे आहेत. हे शिल्प भारतीय शिल्पकलेची परंपरा दर्शविणारे आहे. चंबळ नदीला देवतेप्रमाणे कल्पिले आहे. तिचा चेहरा, शरीरयष्टी, वस्त्रे, आभूषणे यांची अभिव्यक्ती, तसेच मूर्तीतील लय, चेहर्‍यावर विलसणारा दैवी अंशाचा भाव यांची बीजे वेरूळच्या शिल्पाकृतींत आहेत. या शिल्पाची स्थापना १९६१ मध्ये धरणाच्या उद्घाटनप्रसंगी झाली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन झाले तेव्हा नेहरूंनी या शिल्पाची मुक्तकंठाने स्तुती केली. तसेच वर्तमानपत्रांनी, लोकांनी प्रशंसा केली व राम सुतार यांच्याकडे कामे येऊ लागली.

           दिल्लीच्या लोकसभेसमोरचे बसलेल्या पोझमधील महात्मा गांधींचे ब्राँझमधील ध्यानस्थ व्यक्तिशिल्प हे त्यांच्या कारकिर्दीतील एक मानाचे पान आहे. गांधींचे डोळे मिटलेले दाखविले असले तरी एकंदरीत देहबोली, स्नायूंची रचना यांतून विचारमग्न, सात्त्विक, शांत भाव प्रभावीपणे प्रगटले आहेत. या शिल्पाच्या प्रतिकृती गांधीनगर (गुजरात), हैदराबाद येथेही बसविण्यात आल्या आहेत.

           एकंदरीत १९४७ ते २०१० पर्यंतच्या चौसष्ट वर्षांत त्यांनी २००हून अधिक शिल्पे निर्माण केली. त्यांत व्यक्तिशिल्पे, म्यूरल्स, एखाद्या संकल्पनेशी संबंधित शिल्पाकृती यांचा समावेश आहे. संसद भवन, राष्ट्रपती भवन यांसह अन्य महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी केलेले राजकीय वर्तुळातील मान्यवरांचे सुमारे पन्नास पुतळे दिल्लीत आहेत. तसेच काश्मीर, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामीळनाडू, लक्षद्वीप, अंदमान अशा बर्‍याच राज्यांत त्यांच्या शिल्पाकृती पोहोचल्या आहेत. भारताबाहेर मॉरिशस, जपान, रशिया, कंबोडिया, क्यूबा, सॅन्फ्रॅन्सिस्को, लंडन, कॅनडा, स्पेन अशा अनेक ठिकाणी त्यांची भित्तिशिल्पे व स्मारकशिल्पे आहेत.

           त्यांच्या निर्मितीत भारताचे भूतपूर्व राजे, महाराजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, पृथ्वीराज चौहान, रणजित सिंग यांसारख्यांची शिल्पे आहेत. तसेच पंतप्रधान नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद, जयप्रकाश नारायण, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. जोतिबा फुले, दीनदयाळ उपाध्याय, शंकरदयाळ शर्मा, अगदी अलीकडचे कांशीराम, मायावती, काही उद्योगपती, संत कबीर, संत रोहिदास, रवींद्रनाथ टागोर, विवेकानंद अशी अनेकांची व्यक्तिशिल्पे त्यांनी साकारली. महाराष्ट्रात पुण्यातील बालेवाडी येथील शिवाजी महाराजांचा, देहू येथील संत तुकाराम यांचा, नाशिकचा राजीव गांधींचा, चाकूरचे साईबाबा हे पुतळे त्यांनी घडविले आहेत.

           इ.स. २००८ मधील त्यांचे भव्य व याच परंपरेतील वेगळे शिल्प म्हणजे ‘रथारूढ श्रीकृष्णार्जुन’ हे ब्रॉन्झमधील ६० फूट लांब × ३५ फूट उंच शिल्प हरियाणातील कुरुक्षेत्र येथे ब्रह्म सरोवराजवळील विस्तीर्ण मैदानात स्थापित केले आहे. स्मारक व्यक्तिशिल्पांखेरीज ‘त्रिनाले’ या आंतरराष्ट्रीय चित्रशिल्प स्पर्धात्मक प्रदर्शनाच्या सन्मानचिन्हाचे डिझाइन त्यांचे आहे. तामीळनाडूत राजीव गांधींचे स्मारक म्हणून १५ फूट उंचीचे सात स्तंभ उभे केले आहेत. त्यावर ‘विज्ञान’, ‘धैर्य’, ‘न्याय’ अशी सात प्रकारची प्रतीके त्यांनी कल्पकतेने घडविली आहेत.

           वयाची ८५ वर्षे उलटल्यावरही ते उत्तमरीत्या कार्यक्षम आहेत. त्यांचे आर्किटेक्ट पुत्र अनिल यांची त्यांना मोलाची साथ आहे. दिल्लीतील नॉएडा येथे २००० चौ. मीटरची त्यांची स्टूडिओची जागा आहे. त्यातील १२,००० चौ. फुटांवर बांधकाम केले आहे. शिवाय त्यांची स्वत:ची प्रशस्त फाउण्ड्री असून तेथे दिवसाला एक हजार किलो धातू वितळवता येतो. त्यांच्या शिल्पाकृतींच्या प्रतिकृतींचे ‘शिल्पोद्यान’ दिल्लीजवळील फरीदाबाद येथे ‘आनंदवन’ या नावाने सहा एकरांच्या विस्तीर्ण जागेत फेब्रुवारी १९९९ मध्ये सुरू झाले आहे.

           त्यांना मान्यता, पैसा, प्रसिद्धी, सर्व काही मिळाले. साठीच्या दरम्यान त्यांनी काही अमूर्तवादी शिल्पे करण्यास सुरुवातही केली होती, असे म्हणतात. पण त्यांचा ओढा राहिला तो व्यक्तिशिल्पे व विशेषत: व्यावसायिक स्मारकशिल्पे घडविण्यात. त्यासाठी लागणारा अभ्यास, अचूकता, अनेक तांत्रिक अवधाने, त्यात परिपूर्णता राखीत केलेली शिल्पनिर्मिती यांत त्यांना नेहमीच आव्हान वाटत राहिले. तेच त्यांचे जीवनध्येय असल्याचे त्यांची एकंदरीत शिल्पनिर्मिती बघता जाणवते.

           मातीचे पॅचेस लावत असताना ते त्यातून घडवीत असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे साधर्म्य कलात्मकरीत्या हुबेहूब साकारतात. मातीच्या पॅचेसच्या कडा एकमेकांत बेमालूमपणे मिसळत त्यांच्या शिल्पाला एक सुंदर पोत लाभतो व विशेष म्हणजे हे सर्व बारकावे ते त्यांच्या ब्रॉन्झ कास्टिंगच्या फाउण्ड्रीतही अत्यंत उत्तम प्रकारे कास्टिंग करून अखेरपर्यंत जपतात.

           राजा रणजितसिंहांचा अश्‍वारूढ पुतळा व महात्मा गांधींची शिल्पे ही त्यांची या प्रकारची सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे. त्यांच्या शिल्पनिर्मितीच्या अनेक प्रतिकृतीही त्यांच्या स्टूडिओत तयार होऊन विविध ठिकाणी त्या प्रदर्शित झाल्या. या प्रकारे स्मारकशिल्पांना व्यावसायिकतेची जोड देणारे यशस्वी शिल्पकार हे स्थान त्यांनी अधोरेखित केले आहे.

           त्यांच्या कलागुणांची व कार्यकर्तृत्वाची कदर करणारे अनेक सन्मानही त्यांना मिळाले. त्यात पद्मश्री (१९९९),  कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार (२०००), बॉम्बे आर्ट सोसायटीचा ‘रूपधर जीवन गौरव’ पुरस्कार (२०१०) यांचा समावेश आहे.

- प्रा. सुभाष पवार,  साधना बहुळकर

सुतार, राम वनजी