Skip to main content
x

सूर्यनारायण, मंदा चिन्ना

              आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथे सूर्यनारायण यांचा जन्म झाला. वडिलांच्या बदल्यांमुळे सूर्यनारायण यांचे प्राथमिक शिक्षण विविध ठिकाणी झाले व माध्यमिक शिक्षण पीठापूरम येथे झाले. नंतर काकिनाडा येथील पी.आर. शासकीय महाविद्यालयातून त्यांनी वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र व प्राणिशास्त्र या विषयांतील पदवी प्राप्त केली. अँजिओस्पर्मस हा वनस्पतिशास्त्रातील विषय घेऊन एम.एस्सी. पुणे विद्यापीठातून १९६१मध्ये ते उत्तीर्ण झाले. त्यांनी डॉ. गो.बा. देवडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टडीज ऑन बी बॉटनी अँड पॅलिनॉलॉजी ऑफ फ्लोरा ऑफ कुर्ग अँड अ‍ॅड्जसंट पार्ट्स ऑफ मैसोर स्टेट या विषयावर संशोधन करून १९७७मध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्या वेळी ते मधमाशा संशोधन व प्रशिक्षण संस्थेत वनस्पती विभागप्रमुख म्हणून संशोधन करत होते. खादी ग्राम आयोगाचा मधमाशापालनविषयक एपिअरिस्ट कोर्स त्यांनी १९७०मध्ये पूर्ण केला. ते १९६३मध्ये केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्थेत साहाय्यक वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले व तेथूनच १९८६ ते १९९२पर्यंत प्रभारी संचालक म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांनी १९६२ ते १९६३ या काळात ’Morphological & cytological studies in Ampelidacea’ या विषयावर सखोल संशोधन केले. डॉ. देवडीकरांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांनी मैसूर राज्याच्या कूर्ग जिल्ह्याच्या मधु-वनस्पतींविषयी १९६३ ते १९७५ या बारा वर्षांच्या काळात सखोल संशोधन केले. त्यामुळे हवामानातील मधमाशापालन व्यवसायाला मोठी चालना मिळाली. त्यांच्या २८ वर्षांच्या प्रदीर्घ संशोधन कार्यात मधु-वनस्पतिशास्त्रांतर्गत वनस्पतींचे वर्गीकरण, परागकण विज्ञान, मधमाशांद्वारा पीक वनस्पतींचे परागीकरण, मधु-वनस्पतींची लागवड व संगोपन, मधमाशांचे वर्तन, मधमाशापालन व्यवस्थापन तंत्र, अखिल भारतातील प्रादेशिक मधु फुलोरा व त्या नुसारचे मधुवन-व्यवस्थापन यांच्या प्रमाणकीकरणासाठी मोठी मदत झाली. त्याचप्रमाणे उत्पादित मधाचे मूळ स्रोत निश्‍चित करण्याची पद्धत व त्यासाठी आवश्यक असा परागकणांचा संदर्भ-नमुना संग्रह देशव्यापी पातळीवर एकत्रित करता आला. त्यानुसार देशातील कोणत्याही मधाचा स्रोत ओळखणे शक्य झाले. मधु-वनस्पतींचे मधमाशांद्वारा परागीकरण होऊन विविध कृषिपिकांची वाढ कशी व किती प्रमाणात होते हे व्यापक संशोधन डॉ. सूर्यनारायण यांनी प्रकल्पांद्वारे सिद्ध केले. त्यामुळे कृषी धान्य व फळे यांच्या उत्पादनवाढीस चालना मिळाली. त्यांनी याविषयींच्या विविधस्तरीय शिक्षणक्रमाची योजना करून अध्यापनही दीर्घकाळ केले. त्यामुळे कृषिशास्त्रज्ञ, कृषी बँकअधिकारी व विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करता येऊन या व्यवसायाला मोठी चालना मिळाली. मधमाशापालनविषयक ‘इंडियन बी जर्नल’ या त्रैमासिकाचे ते ३० वर्षे संपादक मंडळ सदस्य आणि १९९५ ते २००० या काळात प्रमुख संपादक होते. हवेतील सूक्ष्म परागकणांमुळे निर्माण होणारी अ‍ॅलर्जीस्वरूप शारीरिक व्याधी, मधमाशांच्या शरीरांतर्गत सूक्ष्म स्रावांमुळे निर्माण होणारे शरीरगंध व त्यांचा त्यांच्या वर्तनावरील परिणाम अशा विषयांवर अन्य संशोधन संस्थांबरोबर संयुक्त प्रकल्पांमध्ये ते सहसंशोधक होते.

              अखिल भा.कृ.अ.प.च्या मधमाशापालन व्यवसाय विकासासाठीच्या संयुक्त प्रकल्पामध्येही मधमाशांसाठी परागकण पर्यायी वा पूरक खाद्य संशोधन, मध प्रक्रिया तंत्रज्ञान, प्रजननशास्त्र इत्यादी विषयातही त्यांनी संशोधन केले व अजूनही त्यामध्ये ते कार्यरत आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांचे १२०हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी भारतीय मधमाशांच्या राणीमाशीची निर्मिती व संशोधन याविषयीच्या पुस्तकासाठी लेखन केले. डॉ. सूर्यनारायण यांनी आधुनिक मधमाशापालन व्यवसायास चालना देणारे महत्त्वाचे कार्य केले आहे.

- संपादित

सूर्यनारायण, मंदा चिन्ना