Skip to main content
x

स्वामी, सिद्ध्पा शांतप्पा

सिद्धारूढ स्वामी

सिद्धारूढ स्वामी

शिव संप्रदाय, सिद्धयोगी, सत्पुरुष

२६ मार्च १८३६ — २१ ऑगस्ट १९२९

सिद्धप्पा म्हणजेच सिद्धारूढ स्वामी यांचा जन्म कर्नाटक राज्यातील चालकपुरा येथे रामनवमीच्या शुभदिनी झाला. त्यांचे वडील शांतप्पा यांना मुलाच्या जन्माआधी भगवान शंकरांनी स्वप्नात दृष्टान्त दिला होता. सिद्धप्पा यांच्या आईचे नाव देव मल्लम्मा असे होते. त्यांच्या घरातील वातावरण धार्मिक होते. शांतप्पा लिंगायत समाजातील असून त्यांनी वीरभद्रय्या यांच्याकडून दीक्षा घेतली होती.

लहानपणापासून सिद्धप्पांबद्दल एक चमत्कारी बालक अशी ख्याती सर्वत्र पसरली. थोडेसे तीळ अनेक जणांना वाटूनही शिल्लक उरणे, मेलेल्या म्हशीला जिवंत करणे, असे चमत्कार त्यांच्याबद्दल सांगितले जातात. सिद्धप्पाला शाळेत घालण्याचा विचार सुरू झाला तेव्हा त्याने आईवडिलांना नकार देऊन, ‘त्या मायावी जगात मला पाठवू नका. मला जगाच्या शाळेत शिकायचे आहे आणि जनता-जनार्दनाला स्नेहबंधाचे महत्त्व सांगायचे आहे,’ अशी विनवणी केली. यावर आई-वडिलांनीही त्यांना शाळेत घालण्याचा विचार सोडून दिला.

सिद्धप्पाला बालपणातच सद्गुरुशोधाचा ध्यास लागला होता. त्यासाठी त्याने दिवसेंदिवस अथक वणवण केली. तो कर्नाटकातील मल्लिकार्जुन तीर्थाच्या गजदंड स्वामींच्या मठात जाऊन पोहोचला. गजदंड स्वामींनी सिद्धप्पाचे तेज जाणले. त्याला मठात ठेवून घेतले. गजदंड स्वामींचे प्रवचन सिद्धप्पा तासन्तास उभ्यानेच ऐके. एव्हांना सिद्धप्पा वाद-विवादात प्रवीण बनला. त्याने मठातील महापंडित सुबय्या शास्त्रींनाही एके दिवशी वाद-विवादात हरवले. त्यामुळे प्रसन्न होऊन गजदंड स्वामींनी त्यास ‘सिद्धारूढ’ हे नाव दिले आणि अनुभवसंपन्न होण्यासाठी देशाटन करण्याची आज्ञा केली. त्यानुसार सिद्धारूढ स्वामी देशाटनास निघाले. वाटेतील लोकांना ज्ञानदान करता करताच किष्किंधास्थळी जाऊन त्यांनी विरूपाक्ष देवाचे आशीर्वाद घेतले. हेमकूट पर्वतावर जाऊन अवघड समाधी-योग पूर्ण केला. नंतर ते तिरुपतीला गेले.

दशकभर भ्रमंती करून, आत्मज्ञान मिळवून, लोकांना बोधामृत पाजून ते हुबळीला आले. तेथील जनसागराने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यथावकाश तेथे सिद्धारूढ स्वामींसाठी आश्रम बांधला गेला व तेथे रोज निरूपणे होऊ लागली. हुबळीलाच एकदा कर्नाटकातील एक कृष्णभक्त कलावतीदेवी व त्यांचे यजमान स्वामींना भेटावयास गेले. तेव्हा स्वामींनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि ‘ॐ नम: शिवाय’ मंत्र जपण्यास सांगितले. तेव्हापासून कलावतीदेवींचे जीवन बदलून गेले.

प्रपंच करूनही त्या पुढे अनेकांच्या आध्यात्मिक क्षेत्रात माता कलावतीदेवी म्हणून विख्यात झाल्या. महाराष्ट्रातील गोंदवलेकर महाराजांशी सिद्धारूढ स्वामींचा विशेष स्नेह होता. महाराष्ट्रातील नाशिक, सातारा, यवतमाळ, कोल्हापूर, नांदेड अशा जिल्ह्यांत सिद्धारूढ स्वामींचे लाखो भाविक भक्त आहेत. सिद्धारूढ स्वामी आपल्या सिद्धीने अनेकांच्या व्याधी, समस्या बर्‍या करीत. अनेकांना त्यांनी मरणासन्न स्थितीतून बाहेर काढले.

महाशिवरात्रीच्या दिवसांत हुबळी येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. एके वर्षी भीषण दुष्काळ पडला. स्वामींनी त्या वर्षी पाण्याअभावी उत्सव साजरा न करण्याचे ठरविले. पण भक्तांनी, ‘आम्ही दूरवरून पाणी आणू’ असे म्हटल्यावर स्वामींनी एक भांडे घेतले व आकाशाखाली धरले. काही काळातच पाऊस बरसू लागला. सिद्धारूढ स्वामींनी आपल्या ९३ वर्षांच्या हयातीत अगणित जणांना सन्मार्गाचा मार्ग दाखवला. स्वामींनी नामस्मरण, जप यांचे माणसाच्या जीवनातील महत्त्व जाणले होते. जो कुणी पूर्ण श्रद्धेने हा नामजप करील त्याच्या वाट्याला विपदा केव्हाच येणार नाहीत, हे ते निक्षून सांगत. ‘ॐ नम: शिवाय’ या शिवमंत्रावर त्यांची प्रगाढ श्रद्धा आणि निष्ठा होती. सिद्धारूढ स्वामींनी कधीच लिखित स्वरूपात काही लिहून ठेवले नाही. श्रावण वद्य प्रतिपदा, शके १८५१ रोजी हुबळी येथील मठातच त्यांनी समाधी घेतली. हुबळी येथील त्यांच्या मठाद्वारे स्वामींचे कार्य त्यांचे अनुयायी व भक्त निष्ठेने पुढे नेत आहेत.

संदीप राऊत

स्वामी, सिद्ध्पा शांतप्पा