तांबे-वैद्य, मालती
मालती तांबे-वैद्य यांचा जन्म अकोला येथे झाला. त्यांचे वडील के.व्ही. तांबे हे नागपूर येथे न्यायाधीश होते. मालती यांचे शिक्षण अकोला आणि नागपूर येथे झाले. १९५३ मध्ये त्यांनी नागपूर येथील विज्ञान महाविद्यालयामधून रसायनशास्त्र या विषयात एम.एस्सी.चे शिक्षण घेतले. या परीक्षेत त्यांनी ‘डबल फर्स्ट’चा मान मिळवला. एम.एस्सी.मध्ये त्यांना सुवर्णपदक ही मिळाले होते.
१९५५ मध्ये त्या भारतीय प्रशासकीय सेवेची परिक्षा उत्तीर्ण झाल्या. ही परिक्षा उत्तीर्ण होणार्या त्या पहिल्या महाराष्ट्रीय महिला अधिकारी आहेत. त्यांची प्रथम नियुक्ती नागपूर येथे उपजिल्हाधिकारी या पदावर करण्यात आली.
मंत्रालयाच्या सचिव वर्गात आज महिला अधिकाऱ्यांची मोठी संख्या असली तरी १९७०-८० च्या दशकात मंत्रालयात एकमेव महिला सचिव म्हणून मालती तांबे-वैद्य गाजत होत्या. मालती तांबे-वैद्य यांनी मंत्रालयात सचिव शिक्षण, समाजकल्याण, सामान्य प्रशासन, सांस्कृतिक अशी अनेक खाती हाताळली असली तरी त्यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याचा ठसा उमटविला तो पर्यटन खात्यावर. किंबहुना महाराष्ट्राला पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचे श्रेय त्यांना द्यावे लागेल. कारण तोपर्यंत पर्यटन क्षेत्राचा आथिर्क व व्यावसायिक दृष्टिकोनातून कुणी फारसा विचार केला नव्हता.
१९६९ मध्ये मालती तांबे-वैद्य यांना फ्रान्स सरकारच्या शिष्यवृत्तीवर पर्यटनाचा विशेष अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून फ्रान्स येथे पाठवण्यात आले. तेथील एक्स मार्सेलय या विद्यापीठातील ‘सेंटर ऑफ टुरिझम स्टडी’ या विभागाचे संचालक आणि जगप्रसिद्ध पर्यटन तज्ञ डॉ.बारेटज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एक वर्षाचे पर्यटन याविषयाचे प्रगत प्रशिक्षण घेतले. तेथून परतल्यावर १९७० मध्ये मालती तांबे-वैद्य महाराष्ट्र पर्यटन खात्याच्या सचिव झाल्या.
फ्रान्स मधील प्रशिक्षणामुळे महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी त्यांना प्राप्त झाली. महाराष्ट्रातील सागरकिनार्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याला त्यांनी प्राधान्य दिले. महानगरी मुंबईमधील पर्यटकांचे आकर्षण ठरलेले घारापुरी लेण्याचे बेट पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करण्यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
राज्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची स्थळे निश्चित करून पर्यटकांसाठी तेथे आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रमांची आखणी त्यांनी केली.
मालती तांबे-वैद्य सचिव असतानाच सांस्कृतिक विकासालाही चालना मिळाली. त्यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाखेरीज सामान्य प्रशासन व महसूल या खात्याचेही सचिवपद सांभाळले होते.
नंतर मालती तांबे-वैद्य यांना राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या पहिल्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करण्याचा मान मिळाला. केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर या पदावर असताना त्यांनी समांतर सिनेमाच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. प्रायोगिक किंवा समांतर सिनेमा त्यांच्या काळात रुजला व फोफावला.
मालती तांबे-वैद्य यांना चित्रपटविषयक व्यासंग दांडगा असल्यामुळे एनएफडीसीमधील त्यांच्या कामाचे सर्व स्तरातून नेहमीच कौतुक होत असे. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या काळात आणि त्या नंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या राज्याच्या वाटचालीला विकासाची दिशा दाखविण्यात ज्या धुरिणांनी मोलाची कामगिरी बजावली त्यात मालती तांबे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. प्रागतिक विचार, आधुनिक राहणी, मृदु भाषा, शांत स्वभाव, प्रशासनावर पकड, आत्मविश्वास, मेहनती वृत्ती ही त्यांची वैशिष्ट्ये होती.
त्या उत्तम बॅडमिंटनपटू होत्या व बॅडमिंटनच्या अनेक स्पर्धांत त्यांनी भाग घेतला होता. क्रीडांगणावर हे कर्तृत्व बजावताना शैक्षणिक आघाडीवरही त्यांनी अव्वल स्थान राखले होते. प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यानंतरही क्रीडांगणावरही त्यांची कारकीर्द सुरूच होती. १९६८ मध्ये बॅडमिंटनच्या राष्टीय स्पर्धेत त्यांनी मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले होते.
प्रशासकीय क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत असताना त्या घरची आघाडीही उत्तम सांभाळत होत्या. नेत्रतज्ज्ञ असलेले त्यांचे पती डॉ. वसंत वैद्य, एक मुलगा आणि एक मुलगी अशा चौकोनी कुटुंबाचे तहहयात गृहसचिवपद त्यांनी तितक्याच समर्थपणे सांभाळले. वयाच्या ७९ व्या वर्षी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.