Skip to main content
x

तारापोर, अर्देशिर बुरसारजी

      र्देशिर बुरसारजी तारापोर यांचा जन्म मुंबई येथे झाला. १९६५ च्या भारत-पाक युद्धामध्ये अर्देशिर तारापोर यांनी पूना हॉर्स रेजिमेंटमधून मरेपर्यंत लढत दिली होती. तारापोर यांचे पूर्वज शिवाजी महाराजांच्या सेवेत अधिकारी होते. त्यांच्या शौर्यामुळेच शिवाजी महाराजांनी त्यांना ‘तारापूर’सह १०० गावांची मनसब दिली. त्यामुळेच त्यांचे आडनाव ‘तारापोर’ पडले.

     पुण्यातल्या सरदार दस्तूर शाळेत तारापोर यांचे प्राथमिक शिक्षण झाले. अभ्यासापेक्षा पोहणे, कसरती, व्यायाम, टेनिस, क्रिकेट, मुष्टियुद्ध यांत त्यांना अधिक रस होता. ते शाळेचे कॅप्टन होते. १९४०मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी हैद्राबाद संस्थानात सैन्यदलातील नोकरीसाठी अर्ज केला.

     अर्देशिर यांनी देशसेवेसाठी सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हैद्राबाद संस्थानातर्फे गोवळकोंडा येथील ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतले. १ जानेवारी १९४२ रोजी सातव्या हैद्राबाद इन्फ्रन्ट्रीमध्ये त्यांची नेमणूक झाली. पण सशस्त्र दलामध्ये जायचे त्यांचे स्वप्न होते.

     अर्देशिर यांनी ग्रेनेड थ्रोइंग रेंजवर शिक्षण घेताना दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे आणि शौर्यामुळे त्यांचे ते स्वप्न पूर्ण झाले. त्यांचे शौर्य पाहून त्यांच्या बटालियनची तपासणी करणारे कमांडर इन चीफ मेजर जनरल अल. एड्रोस यांनी अर्देशिर यांचे कौतुक केले आणि अर्देशिर यांची आर्मर्ड डिव्हिजनला बदली करण्याची विनंती मान्य केली. ‘हैद्राबाद इम्पिरिअल सर्व्हिस लान्सर्स-१’मध्ये त्यांची बदली झाली. दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांनी मध्यपूर्वेत काम केले. तिथेही त्यांचे नैतिक धैर्य दर्शविणारे, रेजिमेंटशी असलेली बांधीलकी स्पष्ट करणारे प्रसंग घडले. हैद्राबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाल्यावर ते भारतीय भूसेनेत ‘पूना हॉर्स’ या रेजिमेंटमध्ये रुजू झाले.

     भारत-पाक युद्धात ११ सप्टेंबर १९६५ रोजी ‘पूना हॉर्स’ या पलटणीला पाकिस्तानातल्या सियालकोट भागातील लिफोरावर ताबा मिळवण्याची महत्त्वाची कामगिरी सोपवली होती. या पलटणीचे नेतृत्व त्यांनी केले होते. तारापोर आपल्या पलटणीसह लिफोरा व चाविंदामध्ये घुसले, तेव्हा शत्रूने तोफांचा भडिमार केला. त्यांनी पलटणीच्या अग्रस्थानी निश्चल राहून शत्रूचा हल्ला परतवला. इन्फन्ट्री बटालियनच्या साहाय्याने त्यांनी आपल्या एका स्क्वॉड्रनसह लिफोरावर हल्ला केला. हे सगळे होत असताना शत्रुपक्षाकडून सतत तोफांचा भडिमार होत होता. त्यात जखमी झाले तरीही ते लढत होते.

     पुढच्या तीनच दिवसांनी वझिरालीवर ताबा मिळवण्यासाठीही त्यांनी पलटणीचे नेतृत्व केले. स्वत:च्या दुखापतीची पर्वा न करता ते लढत होते. त्या दिवशी चाविंदा इथे शत्रू कडवा प्रतिकार करत होता. शत्रूला नमवण्यासाठी चाविंदाच्या मागे मोठ्या ताकदीची फौज पाठवण्याचे आणि त्या जागेचा इतर ठिकाणांशी असलेला संपर्क तोडण्याचे पहिल्या कोअरच्या जनरल ऑफिसर कमांडिंगतर्फे ठरवण्यात आले. त्याकरिता मग तारापोर यांच्या नेतृत्वाखालील पूना हॉर्स रेजिमेंट आणि आठव्या गढवाल रायफल्स फौजांना जस्सोरा-बुतुर-डोगरांडी या भागात पार रोवायला सांगण्यात आले. त्यांनी हा भाग काबीज केला. ते ज्या रणगाड्यावर होते, त्याच्यावर अनेकदा हल्ला झाला. पण पारदळाला शत्रूवर हल्ला करता यावा यासाठी त्याच परिस्थितीत रणगाड्यातून ते लढत राहिले आणि इतरांसमोर त्यांनी आदर्श ठेवला.

     त्या आदर्शाने प्रभावित होऊन पूना हॉर्स रेजिमेंटने जोमाने लढाई केली. या लढाईत शत्रूचे साठ रणगाडे नष्ट झाले, तर भारताचे केवळ नऊ रणगाडे नष्ट झाले. मात्र, तारापोर यांच्यासारखा धीरोदात्त जवान भारताला गमवावा लागला. सातत्याने सहा दिवस शर्थीचा लढा देत अद्वितीय कामगिरी करणाऱ्या तारापोर यांना त्यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल मरणोत्तर ‘परमवीरचक्र’ देऊन गौरवण्यात आले.

     - पल्लवी गाडगीळ

तारापोर, अर्देशिर बुरसारजी