Skip to main content
x

तडसरकर, संजय दादासाहेब

शिल्पकार

१९ ऑक्टोबर १९६६  

                शिल्पकलेबद्दलची ओढ असल्याने संजय दादासाहेब तडसरकर यांनी पेंटिंगची पदविका घेतल्यानंतर शिल्पकलेचेही शिक्षण घेतले, म्हणूनच आज तडसरकर कोल्हापूर परिसरात शिल्पकार म्हणून ओळखले जातात.

                वडील दादासाहेब व आई सुधा यांचे हे तिसरे अपत्य. संजय तडसरकरांचा जन्म किर्लोस्करवाडी येथे झाला. शालेय शिक्षण कोल्हापुरातील विविध शाळांतून घेतल्यानंतर उच्चशिक्षणासाठी ते चित्रकलेकडे आकर्षित झाले. प्रथम कला विश्‍व महाविद्यालय, सांगली, दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट, कोल्हापूर व नंतर सर जे.जे स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे संजय विद्यार्थी म्हणून घडले. ‘कलादीप’ या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधील स्टूडंट असोसिएशनचा कलामेळा असो अथवा ‘रंगबहार’ (कोल्हापूर) किंवा ‘कलापुष्प’ (सांगली) असे चित्र-शिल्पविषयक कार्यक्रम असोत, तडसरकर मनापासून व तळमळीने या सर्व उपक्रमांत झोकून देऊन काम करतात. विविध प्रकारचे कला उपक्रम धाडसाने अंगावर घ्यायचे व अत्यंत काटेकोरपणे अभ्यासून ते शेवटपर्यंत पार पाडायचे असे तडसरकरांचे धोरण असते. त्याद्वारे कला जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कष्ट करावयाची त्यांची तयारी असते.

                व्यावसायिक कामे, बंधनात्मक नियोजनात करावी लागतात. त्यांतही ते कलात्मक वैशिष्ट्ये जपतात. त्यांनी ब्रॉन्झ, फायबर ग्लास अशा माध्यमांत अनेक व्यावसायिक पूर्णाकृती व अर्ध-व्यक्तिशिल्पे साकारली आहेत. त्यांपैकी पंत अमात्य बावडेकर (कोल्हापूर), बालगंधर्व (मिरज), कागल येथील राजे श्री शाहू महाराज यांचे ब्रॉन्झमधील पूर्णाकृती शिल्प, तर डॉ. बापूजी साळुंंखे, एम.आर. देसाई यांची कोल्हापूर येथील शिल्पे, तसेच लाल महाल येथील वादग्रस्त ठरलेले बालशिवाजी, जिजाऊ व दादोजी कोंडदेव यांचे समूह शिल्प त्यांच्या प्रतिभेची साक्ष आहेत.

                ‘हेल्पर्स ऑफ दी हॅण्डिकॅप’ या नसीमा हुजूरकर यांच्या संस्थेसाठीचे ‘फ्लाइंग विंग्ज’ हे फायबर ग्लासमधील शिल्प विशेष उल्लेखनीय आहेत. या शिल्पात अपंगत्वावर मात करून गगनात भरारी मारण्याची क्षमता दर्शविणार्‍या व्यक्ती असून, त्यांचे पंख नुसतेच आशेचे प्रतीक नसून निश्‍चय व पराकाष्ठेचे प्रतीक ठरतात.

                आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, मुंबईतर्फे आयोजित प्रदर्शनात, १९८८, १९८९, १९९० मध्ये त्यांनी पारितोषिके मिळविली आहेत, तसेच सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या वार्षिक प्रदर्शनात १९९० मध्ये, तर महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात १९९१ मध्ये त्यांनी पारितोषिके मिळविली आहेत. १९९३ मध्ये मनीषा वडणगेकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

                सध्या तडसरकर व्यावसायिक कामे व स्मारकशिल्पांसोबत निसर्ग व मानवजीवन यांमध्ये होणार्‍या घडामोडीतील ‘ताण’ या विषयावर स्वतःच्या आनंदाप्रीत्यर्थ शिल्पनिर्मिती करीत आहेत.

-अस्मिता जगताप

तडसरकर, संजय दादासाहेब