Skip to main content
x

तेलंग, काशिनाथ त्र्यंबक

कोणिसाव्या शतकाच्या सुमारास जी बारा सारस्वत ब्राह्मणांची घराणी गोव्याहून मुंबईला आली, त्यांत काशीनाथ त्र्यंबक तेलंग यांचे घराणे प्रमुख होते. शाळेत व महाविद्यालयात अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून यांची प्रसिद्धी होती. हे एम.., एल्एल.बी. झाले व यांनी वकिली करण्यास सुरुवात केली. संस्कृत भाषेवरील प्रभुत्व व अस्खलित वक्तृत्व यांमुळे  त्यांची यशस्वी कायदे पंडित म्हणून ख्याती झाली. पुढे त्यांची उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी नेमणूक झाली आणि हिंदू कायद्यात सुधारणा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे तर ते लोकांच्या विशेष लक्षात आले.

मात्र सुरुवातीपासून त्यांचा स्वाभाविक कल वाङ्मय आणि संशोधन या विषयांकडे होता. वकिली करत असता यांचा लेखन व्यवसाय तर चालू होताच, पण न्यायमूर्तींची जागा स्वीकारण्यातही लेखनादिकाला अधिक शांतता मिळावी अशी त्यांची योजना होती. त्यांनी वाङ्मय, समाज, संशोधन व राजकारण या सर्व क्षेत्रांत महत्त्वाची कामगिरी केली.

हे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या संस्थापकांपैकी एक असून काही दिवस हे तिचे कार्यवाहही होते. (१८८५-८९). तिच्या अंतर्गत योजनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग असे. पहिल्या अधिवेशनापासून त्यांनी महत्त्वाच्या ठरावांवर भाषणे केली. सर ऑकल कॉल्विन व लॉर्ड डफरिन यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेस त्यांनी झणझणीत उत्तरे दिली.

शास्त्र व रुढी यांच्या बलाबलांविषयी विचार’ (१८८६) सामाजिक विषयासंबंधी तडजोडहे त्यांचे मराठीतील दोन निबंध यांच्या प्रगमनशील विचारांचे द्योतक आहेत. कालमानानुसार धर्मात बदल करण्याची योजना आपल्या इतिहासाने आपल्याला शिकवली आहे. तिला आपण सोडल्यास आपल्या धर्मातील जिवंतपणा नाहीसा होईलअसे विचार काशीनाथ तेलंग यांनी पहिल्या निबंधात मांडले असून दुसऱ्या निबंधात विचार स्वातंत्र्याचे महत्त्व काशीनाथ तेलंग यांनी दाखवले आहे. अशा धडाडीने त्यांनी राजेंद्रलाल मित्र यांच्या इंडियन अँंन्टीक्वेरीतील लेखाला उत्तर दिले. पूर्वीच्या काळी हिंदुस्थानातील लोक गोमांस भक्षण करत असले, तरी पुढे येथील लोकांनी ते विचारपूर्वक सोडले आहे. म्हणून त्याचा आता विचार करण्याची आवश्यकता नाही, असा मुद्दा त्यांनी त्यांच्याविरुद्ध मांडला आहे.

पण यापेक्षाही डॉ.वेबरच्या रामायणविषयक लेखाच्या रे बॉइड यांनी केलेल्या अनुवादाला त्यांनी दिलेले उत्तर विशेष गाजले. हिंदुस्थानातील प्राचीन समजल्या जाणाऱ्या ग्रंथांचा काल ख्रिस्त पूर्व तीन-चार शतकांच्या मागे जात नाही व होमरच्या इलियडची दाट छाया रामायणावर पडली, असे वेबरचे दोन प्रमुख मुद्दे होते.

या लेखाला त्यांनी ‘Was Ramayan Copied from Homer’ या शीर्षकाखाली उत्तर दिले. त्यांनी त्या दोन ग्रंथांतील फरक स्पष्ट करून वेबरने ठरवलेल्या रामायणकालाचे खंडन करण्यासाठी वेबरने दिलेल्या आधारांचा फोलपणा स्पष्ट केला आणि रामायणाचा काळ ख्रिस्तपूर्व अनेक शतके असल्याचा सिद्धान्त लोकांपुढे मांडला. पुढील संशोधकांनीही यांच्या या सिद्धान्ताला दुजोराच दिला आहे.

भगवद्गीता ही बायबलवरून केली आहे या लेरिंगेरच्या विधानालाही त्यांनी मुद्देसूद उत्तर दिले. भगवद्गीता हा स्वतंत्र ग्रंथ असून तो बायबलवरून केलेला नाही हे काशीनाथ तेलंग यांनी साधार सिद्ध करून दाखवले.

पश्चिम मगधचा राजा पूर्णवर्मा राज्य करत असताना शंकराचार्य उदयास आले, हा त्यांचा स्वत:चा असा महत्त्वाचा सिद्धान्त त्यांनी सिद्ध करून दाखवला. सन ५९० हा त्यांचा काळ आहे असे त्यांनी ठरवले.

हिंदुस्थानातील महत्त्वाच्या गोष्टींसंबंधी प्रतिपादन करताना पाश्चात्यांकडून अनेक ठिकाणी कळत-नकळत अपसिद्धान्त प्रतिपादले जात. त्याला त्यांच्याच भाषेत, त्यांच्याच पद्धतीने आणि त्यांच्याइतका सखोल अभ्यास करून सडेतोडपणे उत्तर देणार्या तेलंग यांच्यासारख्या पंडिताची त्या वेळी फार आवश्यकता होती. त्यांनी ते कार्य उत्कृष्टपणे पार पाडल्याने जगभरच्या अभ्यासकांत त्यांची ख्याती झाली.

यांचे ग्रंथ -

संपादित - . भर्तृहरीचे नीति व वैराग्यशतक. . मुद्राराक्षस

भाषांतरित - इंग्रजी १. भगवद्गीता पद्यमय अनुवाद (डॉ. लेरिंगेरला दिलेल्या उत्तरासह), . भगवद्गीतेचा गद्यमय अनुवाद, . जर्नल ऑफ दि रॉयल एशियाटिक सोसायटी व इंडियन अँटिक्वेरी या नियतकालिकात लिहिलेले निबंध.

मराठी - . शहाणा नाथन (Nathan the Wise याचे भाषांतर), . स्थानिक स्वराज्य व्यवस्था (भाषांतर इंग्लिशमधून मराठीत १८८६), . शास्त्र व रुढी यांच्या बलाबलाचा विचार (व्याख्यान १८८६), . सामाजिक विषयासंबंधी तडजोड.

- संपादित                                                                                                 

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].