Skip to main content
x

तेलंग, मंगेश रामकृष्ण

मंगेश रामकृष्ण तेलंग यांचा जन्म कन्नड प्रांतात कारवार जवळील बाड या गावी सारस्वत ब्राह्मण कुळात झाला. त्यांचे वडील रामकृष्ण हे सरकारी नोकरीत मामलेदार होते. मंगेश तेलंग १८८० साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. नंतर ते  चरितार्थासाठी मुंबईत आले. मुंबईच्या उच्च न्यायालयात तीस वर्षे नोकरी करून, सहायक निबंधक (असिस्टंट रजिस्ट्रार)च्या हुद्द्यावर पोहोचून ते निवृत्त झाले.

मंगेश तेलंग व त्यांचे बंधू पुरुषोत्तम हे दोघेही गायन-वादनाचे शौकीन होते. मंगेश तेलंगांना  लहानपणापासूनच संगीताची आवड होती. संस्कृत, इंग्रजी या विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते. साहित्य, वेदान्त, न्याय, काव्य अशा अनेक विषयांत ते रमलेले असायचे. त्यांना संशोधनाची आवड होती. ते १८८२ साली  बडोद्याला गेले व तेथे त्यांनी संगीताचा अभ्यास केला. पं. पन्नालालजी सतारियेे, प्रसिद्ध बीनकार अली हुसेन खाँ, बंदे अली खाँ यांच्याकडून त्यांनी सतार व बीनवादनाचे शिक्षण घेतले. तसेच, तानरस खाँ व खादिम हुसेन यांचे गायन ऐकून त्यातले बारकावे टिपले.

जनतेत संगीताच्या बाबतीत विशेष जागृती याच काळात निर्माण होऊ लागल्यामुळे अनेक हस्तलिखिते छापली जात होती. तेलंगांचा संस्कृत काव्यशास्त्र, प्राचीन न्याय, वेदांत, दर्शन शास्त्र यांचाही गाढा व्यासंग होता. त्यांनी गोविंदसिंह, मंगलगिरी शास्त्री, सुदर्शनाचार्य अशा विद्वांनांकडून विद्या ग्रहण केली होती. यातूनच त्यांनी पुढे अनेक विषयांवरील प्राचीन, दुर्मिळ संस्कृत ग्रंथांचे संपादन कार्य केले. पुण्याच्या आनंदाश्रम छापखान्याने प्रकाशित केलेल्या शारंगदेवांच्या ‘संगीत रत्नाकर’ या ग्रंथाच्या संपादनाचे काम, तसेच १९२० साली बडोदा  राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाने प्रसिद्ध केलेल्या ‘संगीत मकरंद’चे कामही त्यांनी केले असून या ग्रंथातील प्रस्तावना, ग्रंथावरील टिपणे व स्पष्टीकरण हेही मंगेश तेलंगांनीच केले आहे. संगीतावर स्वतंत्र असा ग्रंथ  त्यांनी लिहिला नाही; पण विविध नियतकालिकांतून त्यांनी संगीतविषयक अनेक महत्त्वपूर्ण लेख लिहिलेले आहेत. त्यांनी १९३६ साली ‘कलकत्ता ओरिएंटल जनरल’ या मासिकात लिहिलेला ‘एइन्शन्ट संस्कृत वर्क्स ऑन इंडियन म्युझिक अ‍ॅण्ड इट्स प्रेझेंट प्रॅक्टिस’ हा लेख विशेष गाजला होता. यातून त्यांचे उदारमतवादी धोरणही दिसून येते.

‘संगीत हे परिवर्तनशील असल्यामुळे सध्याची गायन पद्धती आणि जुन्या ग्रंथातील लक्षणे जुळत नसल्यास ती दुरुस्त केली पाहिजेत किंवा बदलली पाहिजेत; वर्तमान संगीताला ती लावून उपयोगाची नाहीत,’ असा आशय या लेखात होता. त्यांचे आणि पं. विष्णू नारायण भातखंडे यांचे मतभेद होते. भातखंडे यांच्या लक्ष्य संगीत आणि हिन्दुस्थानी संगीत पद्धती यांवर त्यांनी टीकाही केली होती. मंगेश तेलंग यांनी केलेल्या विविध ग्रंथांवरचे सर्व लिखाण पुण्याच्या भांडारकर प्राच्य विद्यामंदिर या संस्थेस अर्पण करण्यात आले आहे.

मंगेश तेलंगांचे आवडीचे विषय अनेक होते. संगीताव्यतिरिक्त इंग्रजी वाङ्मय, वेद, पुराणे, चित्रकला, बुद्धीबळ अशा विषयांचाही त्यांचा व्यासंग होता. त्यांनी ‘भगवद्गीतासार’ तयार केले. ‘संगीत हजामत’ हे प्रहसनही त्यांनी लिहिले होते, तसेच ‘बुद्धीबळाचा खेळ’ हे पुस्तकही लिहिले.

त्यांनी १९१४ साली सेवानिवृत्त झाल्यावर भारतभर पर्यटन केले. त्यांना विद्वान लोकांत चांगलीच मानमान्यता मिळाली होती. म्हणून बनारस हिंदू विद्यापीठ, भारत महाधर्ममंडळ, अखिल भारतीय सारस्वत समिती, अयोध्या संस्कृत कार्यालय आदी संस्थांनी त्यांचा सत्कार केला. त्यांना ‘वीणाविशारद’, ‘शास्त्रवाचस्पती’ अशा पदव्याही देण्यात आल्या. यानंतर ते कारवार येथे स्थायिक झाले. पुढे कारवारमध्येच त्यांचे निधन झाले.

             — माधव इमारते

तेलंग, मंगेश रामकृष्ण