Skip to main content
x

तलगिरी, पांडुरंग

पांडुरंग तलगिरी यांचे शालेय शिक्षण मुंबईतील एल्फिन्स्टन विद्यालयात झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयात प्रवेश घेतला. तलगिरी यांचे वडील मुंबई नगरपालिकेत उच्च पदावर होते. ते ललितकलादर्श या नाटक मंडळीचे चाहते होते. कलेची तीच आवड पांडुरंग तलगिरींमध्येही आली होती. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी मुंबईच्या रॉयल आर्ट स्टुडिओत छाया दिग्दर्शक म्हणून १९२४ मध्ये प्रवेश घेतला. ललितकलादर्श मंडळीने मामा वरेरकर यांचे तुरुंगाच्या दारातहे नाटक रंगभूमीवर आणायचे ठरवले. तलगिरींच्या वडिलांनी या नाटकाचा लघुपट तयार करून तो मुंबई-पुण्याच्या दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीनच्या पँट्री कारमध्ये प्रदर्शित करण्यास सांगितले. अशा प्रकारे चित्रपटाद्वारे नाटकाची जाहिरात करण्याचा हा पहिला प्रसंग होता व तो यशस्वी होऊन नाटक लोकप्रिय झाले.

तलगिरींनी पुढे मामासाहेब वरेरकर आणि नेरुरकर यांच्या मदतीने डेक्कन पिक्चर्स कॉर्पोरेशन ही चित्रपट संस्था काढली. त्याद्वारे पुण्यावर हल्लाहा ऐतिहासिक चित्रपट निर्माण केला. मामा वरेरकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात चित्रकार केतकर यांनी प्रमुख भूमिका केली होती. तलगिरींच्या संस्थेचा पुढील चित्रपट प्रभावतीहा नानासाहेब सरपोतदारांनी दिग्दर्शित केला.

१९२५-२६ मध्ये तलगिरी यांनी पुण्यात खडकी येथे युनायटेड पिक्चर्स सिंडिकेट नावाची चित्रपट संस्था काढली. मूकपटांच्या या काळात त्यांनी विष्णुपंत औंधकर, मामा वरेरकर, विठ्ठल सीताराम गुर्जर, न.चिं. केळकर अशा मराठीतील मोठमोठ्या साहित्यिकांच्या कलाकृतींवर चित्रपट (मूकपट) तयार केले.

या चित्रपटांसाठी औंधकर, पार्श्वनाथ आळतेकर, कतनुरकर यांना सर्वप्रथम चित्रपट दिग्दर्शनाची संधी मिळाली. पांडुरंग तलगिरी यांनी स्वत: रक्ताचा सूड’, ‘जिजाबाई’, ‘खुनी ताजआणि शिवजन्मअसे चित्रपट दिग्दर्शित केले.

बोलपट सुरू झाल्यावर १९३८ मध्ये त्यांनी मराठ्याची मुलगीआणि १९४० मध्ये देवयानीहे दोन बोलपट काढले.

द.भा. सामंत

तलगिरी, पांडुरंग