Skip to main content
x

तोरणे, रामचंद्र गोपाळ

दादासाहेब तोरणे 

      दादासाहेब तोरणे या नावाने चित्रपटक्षेत्रात परिचित असणाऱ्या रामचंद्र गोपाळ तोरणे यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुकुलवाडी येथे झाला. तेथेच शालेय शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी ते मुंबईला आले. ‘ग्रीव्हज कॉटन’ या युरोपियन कंपनीत नोकरी करत असताना ते नाटक पाहण्याचा आपला छंदही पुरा करीत. त्याच सुमारास युरोपातून आपल्याकडे मूकपट येऊ लागले. ते चित्रपट पाहून आपणही चित्रपट बनवावे असे त्यांनी ठरवले.

      नानूभाई चित्रे आणि कीर्तीकर यांच्या मदतीने तोरणे यांनी १८ मे १९१२ रोजी मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात ‘पुंडलिक’ हा चित्रपट प्रदर्शित केला. फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या  चित्रपटाअगोदर एक वर्ष हा चित्रपट झळकला. तो दोन आठवडे दाखवला गेला. परंतु जॉन्सन नामक एका युरोपियन माणसाने या चित्रपटाचे छायाचित्रण केल्याने या चित्रपटाला पहिल्या भारतीय चित्रपटाचा मान मिळू शकला नाही.

      थोड्याच दिवसात त्यांची कराची येथे बदली झाली. तेथे बाबूराव पै यांच्याशी त्यांची ओळख झाली. दोघांनी मिळून तेथे महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या वितरणाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे पंजाब, सिंध व वायव्य सरहद्द प्रांतात महाराष्ट्र फिल्म कंपनीचे चित्रपट झळकू लागले. हा व्यवसाय किफायतीचा ठरल्याने तोरणे यांनी ग्रीव्हज कॉटन कंपनीतील नोकरी सोडून बाबूराव पैंसह मुंबई गाठली. तेथे त्या दोघांनी ‘प्रभात’ व ‘आर्यन’ या दोन फिल्म कंपन्यांच्या वितरणाची जबाबदारी घेतली. त्याचबरोबर छायाचित्रण आणि त्याला लागणारी सामग्री पुरवण्यासाठी ‘मुव्ही कॅमेरा’ नावाची कंपनी स्थापन केली. १९२९-३०च्या सुमारास परदेशातून बोलपट यायला लागल्यावर या दोघांनी अमेरिकेतील ऑडिओ केमिक्स या ध्वनिमुद्रण यंत्राची एजन्सी मिळवली. याच ऑडिओ केमिक्स ध्वनिमुद्रण यंत्राच्या साहाय्याने प्रभातचा ‘अयोध्येचा राजा’ हा चित्रपट निर्माण झाला. प्रभातबरोबरच त्यांनी रणजित फिल्म कंपनी व वाडिया मुव्हीटोन या कंपन्यांनाही ध्वनिमुद्रणाचे यंत्र पुरवले.

     नंतर तोरणे यांनी स्वत:ची चित्रपट संस्था स्थापून चित्रपट बनवण्यास सुरुवात केली. दोराबजी कोल्टा यांच्या भागीदारीत त्यांनी नानासाहेब सरपोतदारांचा आर्यन स्टुडिओ विकत घेतला व ‘सरस्वती सिनेटोन’ असे त्याचे नामकरण केले. पुण्यातील हा पहिला बोलका स्टुडिओ. सरस्वती सिनेटोनतर्फे तोरणे यांनी ‘श्यामसुंदर’ हा मराठी व हिंदी या दोन्ही भाषेतील बोलपट बनवला. मुंबईच्या वेस्ट एंड चित्रपटगृहात हा बोलपट २७ आठवडे चालला. ‘श्यामसुंदर’ हा रौप्यमहोत्सव साजरा करणारा भारतातील पहिला चित्रपट ठरला.

    बाबूराव पै यांच्यासह तोरणे यांनी फेमस पिक्चर्स ही वितरण संस्थाही सुरू केली. या संस्थेकडे प्रभातचे सर्व चित्रपट वितरणासाठी असत. स्वत: तोरणे यांच्या चित्रपट संस्थेने ‘भक्त प्रल्हाद’, ‘औट घटकेचा राजा’, ‘सावित्री’, ‘ठकसेन राजपूत’ असे चित्रपट निर्मिले.

     तोरणे यांनी शाहू मोडक, शांता आपटे, सुधा आपटे, दादासाहेब साळवी, जयशंकर दानवे इत्यादी कलाकारांना पडद्यावर सर्वप्रथम संधी दिली. तसेच मामा वरेरकर, मो.ग. रांगणेकर यांसारख्या साहित्यिकांना चित्रपटसृष्टीशी जोडले.

     दुसऱ्या महायुद्धानंतर चित्रपटसृष्टीत मंदीचा काळ आला आणि त्यानंतर बरेचसे भांडवलदार या क्षेत्राकडे वळल्याने फ्रीलान्सिंगचा व्यवहार सुरू झाला. दादासाहेब तोरणे यांनी त्यानंतर ‘माझी लाडकी’ हा शेवटचा चित्रपट काढून डब्ल्यू.झेड. अहमद यांना आपली चित्रपट संस्था विकून चित्रपटसंन्यास घेतला.

- द.भा. सामंत

तोरणे, रामचंद्र गोपाळ