Skip to main content
x

तोरो, विजय अनंत

        कोकण भागातील दूध उत्पादनवाढीसाठी स्थानिक हवामानास आणि शेतकऱ्यांस अनुकूल असे सुलभ, स्वस्त आणि परिणामकारक तंत्रज्ञान विकसित करण्यात मोलाचे योगदान देणारे संशोधक म्हणजे डॉ.विजय अनंत तोरो होत. कोकणातील दुग्ध व्यवसायासंबंधीच्या समस्या व त्यावरील उपाय, व्यवहार्य डेअरी प्रकल्प, दुग्ध व्यवसाय विकासाची संकल्पना याविषयीचा उत्तम जाणकार आणि मार्गदर्शक म्हणून डॉ.तोरो परिचित आहेत. त्यांची साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रभावी वक्ता आणि उत्तम लेखक अशीही ओळख आहे. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. ते १९६५मध्ये सांगली येथून १२वी उत्तीर्ण झाले. घरची आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने महाविद्यालयीन शिक्षण शिष्यवृत्तीवर घेण्याचे तोरो यांनी ठरवले व ‘नॅशनल डेअरी रीसर्च इन्स्टिट्यूट’मध्ये दुग्धशास्त्र विषयातील पदवी अभ्यासक्रमासाठी त्यांना प्रवेश मिळाला व महाराष्ट्र शासनातर्फे गुणवत्ता शिष्यवृत्तीदेखील मिळाली.

        तोरो यांनी तेथे १९६९ साली बी.एस्सी. (पशु-संवर्धन व दुग्धशास्त्र) आणि १९७१ साली एम.एस्सी. (पशु-संवर्धन  व दुग्धशास्त्र) या पदव्या प्राप्त केल्या. (आयसीएआर शिष्यवृत्ती). नंतर जून १९७१ ते सप्टेंबर १९७३ अशी दोन वर्षे त्यांनी नॅशनल डेअरी रीसर्च इन्स्टिट्यूट येथेच पशुपोषण विभागात संशोधक साहाय्यक पदावर काम केले व याच संस्थेत सप्टेंबर १९७७ ते फेब्रुवारी १९८१ या काळात त्यांनी पशुपोषण विषयात पीएच.डी. मिळवली. त्यांनी १९७३ ते २००५ या काळात बा.सा.को.कृ.वि.त पशु-संवर्धन व दुग्धशास्त्र विषयात संंशोधन, अध्यापन आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन या तिन्ही क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम केले. त्यांनी कोकणातील दूध उत्पादनाबाबतच्या समस्यांचा सखोल अभ्यास करून लहान शेतकऱ्यांकडे असणाऱ्या दोन-चार गायी-म्हशींपासून मिळणाऱ्या दूध उत्पादनात वाढ व्हावी; या दृष्टीने तंत्रज्ञान विकसित केले. चांगल्या दूध उत्पादनासाठी गायीला रोज चांगल्या प्रतीचा हिरवा चारा मिळाला पाहिजे, परंतु कोकणात पावसाळ्यानंतर हिरवा चारा दिसतच नाही. भाताचा पेंढा आणि सुके गवत हेच जनावरांचे निकृष्ट प्रतीचे खाद्य. म्हणून पौष्टिकता वाढवण्याच्या दृष्टीने केलेल्या संशोधनातून डॉ.तोरो यांनी ‘युरिया प्रक्रिया’चे तंत्रज्ञान शेतकर्‍यांना दिले. त्यामुळे पेंढ्याची पौष्टिकता ४ ते ५ पटीने वाढते व गायीच्या दूध उत्पादनात लक्षणीय वाढ होते. याची त्यांनी शेतकऱ्यांकडे प्रात्यक्षिके घडवून आणली.

        हिरवा चारा म्हणून झाडपाल्याचा उपयोग महत्त्वाचा ठरतो. परंतु प्रत्येक झाडाचा पाला वैरण म्हणून उपयोगी नसतो. त्या दृष्टीने डॉ. तोरो यांनी वैरणीची उपयुक्तता ठरवण्यासाठी ५०हून अधिक स्थानिक झाडांवर दीर्घकाळ संशोधन केले. यातून शिवण हे कोकणातील झाड हिरव्या चाऱ्यासाठी सर्वोत्कृष्ट असल्याचे दिसून आले व पांगारा, बिबळा, असाना ही झाडे उपयोगी असल्याचे आढळून आली. डॉ.तोरो यांनी विदेशी झाडांवरही संशोधन करून गिरीपुष्प (ग्लिरिसिडीया) हे झाड गायीगुरांसाठी भरपूर पौष्टिक हिरवा चारा देऊ शकते हे दाखवले. याचा पाला गुरे आवडीने खात नसल्यामुळे त्याचा रुचकरपणा वाढवण्याचे उपायही त्यांनी शोेधून काढले आहेत. गायरान सुधारणेसाठी ‘स्टायलो’ हे गवत पेरल्यास गायरानातील जमिनीचा कस व उत्पादन वाढते आणि गुरांना अधिक पौष्टिक चारा मिळू शकतो असे त्यांना दिसून आले.

        दुग्धशास्त्र विषयातही डॉ. तोरो यांनी उपयुक्त संशोधनकार्य केले. दूध काढल्यानंतर ते त्वरित थंड करून साठवणे महत्त्वाचे असते. त्यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त, स्वस्त आणि सुलभ शीतकक्ष तयार करण्यावरही संशोधन केले आहे. हा केवळ विटा आणि वाळूपासून तयार करता येतो. यासाठी वीज, पेट्रोल, डिझेल किंवा बर्फही लागत नाही. अशा शीतकक्षात दूध १२ ते १५ तास चांगल्या स्थितीत टिकून राहते.

        कोकणातील फळे आणि कंदपिके यांचा वापर करून नावीन्यपूर्ण आणि स्वादिष्ट दूध पदार्थ तयार करण्यावरही डॉ.तोरो यांनी उल्लेखनीय संशोधन करून अनेक दूध पदार्थांच्या पाककृती विकसित केल्या आहेत. उदा. शहाळ्यातील पाणी आणि मलई वापरून मिल्क पुडिंग, कणगर आणि करांदा या कंदापासून आइसस्क्रीम आणि गुलाबजाम, आमरसापासून कलाकंद आणि रबडी, ताकाचा वापर करून आरोग्यदायी मशरुम सूप इत्यादी.

        डॉ. तोरो यांनी ४७ लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषद व परिसंवादामध्ये सादर केले आहेत. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांत एकूण ३६ लेख प्रसिद्ध झाले आहेत. शेतकऱ्यांच्या माहितीसाठी मुंबई दूरदर्शनवरून व रत्नागिरी आकाशवाणीवरून त्यांची भाषणे प्रसारित झाली आहेत व शेतीविषयक मासिकातून त्यांचे ३० लेख प्रसिद्ध झाले आहेत. डॉ. तोरो यांनी एम.एस्सी.च्या (पशु-संवर्धन व दुग्धशास्त्र) २९ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी बा.सा.को.कृ.वि.तील विद्यार्थ्यांसाठी मुख्य समुपदेशक म्हणून १० वर्षे काम केले. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि तत्सम स्पर्धात्मक परीक्षांसाठी, देशांतील नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी व भा.कृ.अ.प.च्या कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन केलेले आहे.

        डॉ. तोरो यांनी साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतही आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. विविध विषयांवर त्यांनी दापोली परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी व्याख्याने दिली आहेत.

- डॉ. नागोराव विश्वनाथ तांदळे

तोरो, विजय अनंत