Skip to main content
x

तरन्नुम, कादरभाई

            रन्नुम कादरभाई यांचे पूर्वाश्रमीचे नाव जोत्स्ना गजानन लेले हे होय. यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण बालमोहन विद्या मंदिर, दादर येथे; कनिष्ठ महाविद्यालयीन शास्त्र शाखेमधील शिक्षण रामनारायण रुईया महाविद्यालय येथे झाले. त्यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षणामध्ये पहिली श्रेणी कधीही सोडली नाही. पशुवैद्यक क्षेत्रामधील बी.व्ही.एस्सी.ए.एच.पदवी १९८७मध्ये प्रथम श्रेणीत विशेष प्रावीण्यासह संपादन केली. तरन्नुम यांनी पदवी प्राप्त केल्यावर आपल्या संशोधनात्मक कारकिर्दीची सुरुवात १९८८मध्ये निंबकर कृषी संशोधन केंद्र, फलटण येथे कनिष्ठ संशोधन साहाय्यक या पदावर केली. या संस्थेमध्ये कार्यरत असताना त्यांनी शेळ्या व मेंढ्या यांच्यामधील प्रजननक्षमता व कोकरांसाठी दुधाला पर्यायी द्रवरूप खाद्य या दोन प्रमुख विषयांवर संशोधन केले. त्या १९८९ मध्ये अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती येथे पशुवैद्यक विभागामध्ये व्याख्याता या पदावर रुजू झाल्या; या कालावधीमध्ये त्यांनी पशुविज्ञान शाखेमधील महत्त्वाच्या विषयांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली व अल्पावधीत त्या  विद्यार्थिप्रिय शिक्षिका झाल्या. १९९२ ते १९९४ या काळात ट्रेनिंग असोसिएट्स या पदावर त्या कार्यरत होत्या. या काळामध्ये पशुवैद्यक क्षेत्राशिवाय कृषि-विस्तार व ग्रामसुधार या विषयांवर त्यांनी विशेष अध्यापन केले. कार्यक्षमतेच्या जोरावर शैक्षणिक निवड समितीच्या अध्यक्षा होण्याचा मान त्यांना १९९४ ते २००६ या काळात मिळाला. उत्तम नियोजन व सादरीकरण या कार्यप्रणालीमुळे २००६ पासून संस्थेच्या विभागप्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. शास्त्रज्ञ व सेवकांबरोबर काम करताना व संस्थेचे ध्येय प्राप्त करताना खंबीर नेतृत्व कसे असले पाहिजे, याचा आदर्श त्यांनी घालून दिला.

            तरन्नुम कादरभाई यांनी स्वतःचे ज्ञान कायम अद्ययावत ठेवण्यासाठी १९९४ मध्ये डॉ. वाय.एस. परमार कृषी विद्यापीठामधील शेती विस्तार व ग्रामीण सहभाग हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम केला. १९९८ मध्ये इस्राएलमधील २१ दिवसांचा ‘प्रादेशिक संशोधन व विकास कार्यक्रम कृषिक्षेत्र’ असा अभ्यासक्रम पूर्ण केला. जानेवारी २००८ मध्ये नेदरलँड येथील बारनेवेल्ड शहरामधील प्रात्यक्षिक तंत्रज्ञान केंद्र येथे ‘शेती विस्तारामधील तंत्रशिक्षणाचे महत्त्व’ या विषयाबाबत ११ दिवसांच्या अभ्यासवर्गास त्या उपस्थित होत्या. फेब्रुवारी २००८ मध्ये थायलंडमध्ये आयोजित केलेल्या ‘निसर्गशेती सूक्ष्मजीवांचे महत्त्वपूर्ण अस्तित्व’ या अभ्यासवर्गामध्ये, तसेच सप्टेंबर २०१० मध्ये नेदरलँड येथे ‘व्यवसायाचे व्यवस्थापन’ या विषयावरील अभ्यासवर्गासाठी तरन्नुम कादरभाई या उपस्थित होत्या. तरन्नुम कादरभाई यांना थायलंडमध्ये (२००५) ऋज संस्थेचा आदर्श शास्त्रज्ञ पुरस्कार, २००६ मध्ये बारामती मित्र मंडळाचा प्राइड ऑफ बारामती पुरस्कार, २००७ मध्ये कृषी क्षेत्रामधील विशेष कामगिरीबद्दलचा नैपुण्य वैयक्तिक पुरस्कार, २००८ मध्ये ज्येष्ठ पशुवैद्यक संघटनेतर्फे दिला जाणारा आदर्श पशुवैद्यक पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार लाभले आहेत. व्यक्तिगत प्रगतीसोबत संस्थेचाही विकास व्हावा, या भावनेने तरन्नुम कादरभाई कार्यरत आहेत. म्हणूनच बारामती कृषी विज्ञान केंद्राला २००६-२००७चा राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शैक्षणिक संस्था हा पुरस्कार मिळाला.

- मानसी मिलिंद देवल

तरन्नुम, कादरभाई