Skip to main content
x

ठाकरे, कृष्ण राजाराम

           कृष्ण राजाराम ठाकरे यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील चिंचखेड या गावी शेतकरी कुटुंबात झाला. नवी  दिल्ली येथील पुसा संस्थेतून त्यांनी असो.आय.ए.आर. आय. ही एम.एस्सी. समकक्ष पदवी संपादन केली. ते पुढे १९५८मध्ये विशेष प्रशिक्षणासाठी मॅनहॅटन व कॅलिफोर्निया येथे जाऊन आले. त्यानंतर त्यांनी पुसा संस्थेतूनच पीएच.डी.ची पदवी मिळवली. नागपूर येथील कृषी महाविद्यालयामध्ये ठाकरे यांची व्याख्याता म्हणून नियुक्ती झाली. तसेच तेथील प्राध्यापकपदही त्यांना मिळाले. त्यांच्या कर्तृत्वामुळे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली. अकोल्याला कृषी विद्यापीठ स्थापन झाल्यावर १९८०-१९८१मध्ये ठाकरे तेथे संशोधन संचालक झाले. ते १३ फेब्रुवारी १९८२ला अकोल्याच्या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू झाले.

           कृष्णा ठाकरे यांनी कीटकशास्त्र (एंटोमॉलॉजी) या विषयात उल्लेखनीय संशोधन केले आहे. मिरची पीक संरक्षण व संत्रा पिकावरील कोळशी नियंत्रणाच्या औषध योजनेबाबतच्या संशोधनात त्यांचे मोलाचे योगदान होते. अकोल्यास त्यांच्या प्रयत्नाने ऑगस्ट १९८४मध्ये उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन झाले.

           ठाकरे यांनी कुलगुरू म्हणून विद्यापीठाच्या कामकाजात व व्यवस्थेत लक्षणीय बदल घडवून आणले. त्यांनीच १९८२-१९८३च्या पाण्याची भीषण टंचाई व दुष्काळी परिस्थितीत पाणी अडवा-जिरवा, काटकसरीने पाणी देण्याच्या पद्धतीवर प्रबोधन, शिवार फेरी या कार्यक्रमाची सुरुवात केली होती.

                - डॉ. प्रकाश पुंडलिक देशमुख

ठाकरे, कृष्ण राजाराम