Skip to main content
x

ठाकरे, स्वरराज श्रीकांत

ठाकरे, राज

             डील श्रीकांत ठाकरे आणि काका बाळासाहेब ठाकरे यांच्या सहवासात राज हेही पुढे व्यंगचित्रे काढू लागले, हे अगदी स्वाभाविकच होते. व्यंगचित्रकलेचे बाळकडू त्यांना अगदी लहानपणा-पासूनच मिळाले. घरामध्ये चालणारी राजकीय चर्चा आणि श्रीकांत व बाळासाहेब यांची ‘मार्मिक’मधून बहरणारी कारकीर्द पाहून राज ठाकरे यांच्या हातातही आपोआप कुंचला आला.

             सुरुवातीला ‘स्वरराज’ या नावाने त्यांनी ‘मार्मिक’मधून काही राजकीय व्यंगचित्रे काढली. अ‍ॅनॉटॉमी, कॅरिकेचरिंग, पर्स्पेक्टिव्ह, ब्रशचे फटकारे इत्यादी बाबींत बाळासाहेबांकडून शिक्षण मिळाल्याने, तसेच राजकीय विचारांची बैठकही तयार झाल्यामुळे बाळासाहेबांच्या शैलीचा प्रभाव त्यांच्यावर पडणे साहजिकच होते. नेमके व ठोस राजकीय भाष्य त्यांच्या व्यंगचित्रांत आढळते.

             पुढे ‘लोकसत्ता’ दैनिकातून त्यांनी बरेच दिवस मोठी राजकीय व्यंगचित्रे काढली. शिवसेनेचे ‘सामना’ दैनिक सुरू झाल्यावर त्यातून त्यांची चित्रे प्रसिद्ध होऊ लागली. त्यांच्या राजकीय प्रवासात पुढे ते ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे प्रमुख झाल्यावर त्यांची चित्रे क्वचितच प्रसिद्ध होताना दिसू लागली.‘अर्कचित्र’ हा राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रकलेतील सर्वांत महत्त्वाचा परमोच्च बिंदू मानला पाहिजे.

             महापालिका अधिकारी गो.रा. खैरनार हे नव्वदच्या दशकातील एक खूप लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी राजकीय व्यवस्थेविरुद्ध भाषणे ठोकण्याचा सपाटा लावला होता. ‘मार्मिक’च्या एका अंकात ‘रविवारची जत्रा’ रेखाटताना राज ठाकरे यांनी ‘गो.रा. खैरनार असेच फक्त भाषणे करीत राहिले तर त्यांची प्रतिमा हळूहळू लहान होत जाईल’, अशा आशयाचे व्यंगचित्र काढले होते. या व्यंगचित्रात त्यांनी खैरनार यांना चार-पाच कोनांतून दाखवून त्यांच्या अर्कचित्रात धमाल आणली होती.

             केवळ राजकारणीच नव्हे, तर चित्रपट अभिनेते, संगीत, क्रिकेट इत्यादी क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींची अर्कचित्रे ते लीलया रेखाटतात. त्यांच्या शंभराहून अधिक अर्कचित्रांचे प्रदर्शन काही वर्षांपूर्वी मुंबईत भरले होते. त्याला मुंबईकरांनी रांगा लावून भरभरून प्रतिसाद दिला होता.

- प्रशांत कुलकर्णी

ठाकरे, स्वरराज श्रीकांत