Skip to main content
x

ठाकरसी, विठ्ठलदास दामोदर

     हाराष्ट्रातील एका सधन कुटुंबात जन्मलेल्या विठ्ठलदास दामोदर ठाकरसींचे शिक्षण मुंबईला झाले. उद्योग -व्यवसायाबरोबरच त्यांनी सामाजिक आणि राजकीय कार्यात मनापासून रस घेतला. मुंबईच्या महापालिकेवर निवडून येऊन ते नंतर महापौर झाले आणि १९०३, १९०५ व १९०७ मध्ये मुंबईच्या कायदेमंडळावर निवडून आले. १९१९ मध्ये ठाकरसी मध्यवर्ती कायदेमंडळावरही निवडून गेले. सिडनेहॅम महाविद्यालय स्थापन करण्यात ज्या महानुभावांचे योगदान होते त्यात ठाकरसीही होते. अखिल भारतीय होमरूल लीग संस्थापकांमध्ये त्यांचीही भूमिका होती. १९२० मध्ये उद्योगपती ठाकरसी ३१०४ माग व १,२४,१४४ चात्यांचे मालक होते. राजकारणात जहाल-मवाळ अशी फूट झाल्यानंतर सर विठ्ठलदास ठाकरसींनी १९१५ चे काँग्रेसचे मुंबईचे अधिवेशन बोलविले.

ठाकरसी कुटुंब १९१९ मध्ये परदेशी गेले. या प्रवासात टोकियोमधील स्त्रियांचे विद्यापीठ पाहून तसे विद्यापीठ महाराष्ट्रात असावे अशी कल्पना ठाकरसींच्या मनात आली. अण्णासाहेब कर्वे यांनी मुलींसाठी महाविद्यालय काढले होते. मुलींसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांनी अखिल भारतीय महिला विद्यापीठ १९१६ मध्ये स्थापन केले होते. सर विठ्ठलदास यांनी १९२० मध्ये या विद्यापीठाला पंधरा लाख रुपयांची देणगी दिली व त्याचे नामकरण आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ असे करण्यात आले. ब्रिटिश शासनाने त्यांना ‘सर’ ही उपाधी देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला होता.

- वि. ग. जोशी

ठाकरसी, विठ्ठलदास दामोदर