थोरात-पाटील, शंकर पांडुरंग
शंकर पांडुरंग थोरात-पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यातील वडगाव येथे झाला. थोरात शेतकरी कुटुंबातील असले तरी त्यांचे वडील डॉ. पांडुरंग चिमणाजी पाटील उच्चविद्याविभूषित होते. शंकर थोरात यांचे शिक्षण पुण्यातील पूना हायस्कूल आणि नूतन मराठी विद्यालयात झाले. १९२३मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९२४ ते १९२६ दरम्यान इंग्लंडमधील सॅण्डहर्ट येथील रॉयल मिलिटरी कॉलेजमध्ये त्यांचे सैनिकी शिक्षण झाले.
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश भारतीय सैन्यात काम करताना शिस्त, संघटना आणि तंत्रज्ञान अशा सर्व गोष्टी थोरात यांनी कष्टपूर्वक आत्मसात केल्या. १९३५मध्ये त्यांच्या पलटणीला जुन्या वायव्य सरहद्द प्रांतात धाडण्यात आले. तेथील खैबर खिंडीच्या भोवतालच्या प्रदेशात पठाणी टोळ्यांशी सतत चकमकी होत असत. येथेच थोरात यांच्या पलटणीचे मुख्य कार्यालय होते. या वेळी झालेल्या सैनिकी कारवाईत थोरात यांच्या कणखर नेतृत्वाखाली पलटणीने पठाणांच्या टोळीचे कंबरडे मोडले. अचूक टेहळणी व मनोधैर्याच्या जोरावर थोरात यांनी ही कामगिरी यशस्वी केली.
१९३९मध्ये दुसरे जागतिक महायुद्ध सुरू झाले. सैनिकी अधिकाऱ्याने कायमच युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी धडपड करावी, असे थोरात यांचे मत होते. याचा प्रत्यय दुसर्या महायुद्धाच्या रणधुमाळीतही आला. कोहीमाला जपानी सैन्याने घातलेल्या वेढ्यात तीन भारतीय पलटणी अडकलेल्या होत्या. जपान्यांचा वेढा मोडून आपल्या पलटणींची सुटका करण्यासाठी हिंदी सैनिकांनी मोठ्या चकमकींना तोंड दिले. त्यात थोरात यांच्या पलटणीने मोठे कर्तृत्व दाखविले. इंफाळ तर भारतापासून जवळजवळ तुटल्यातच जमा होते. तेथेही थोरात यांनी अतुलनीय कामगिरी बजावून इंफाळ वाचविले.
दुसर्या महायुद्धात ब्रह्मदेशाच्या आघाडीवर केलेला रणसंग्राम हा युद्धशास्त्रातील एक अजोड इतिहासच मानला जातो. थोरातांनी तेथे अतिशय जिद्दीने विजयश्री खेचून आणली. नेतृत्व, चिकाटी, कणखरपणा आणि उत्कृष्ट डावपेच वापरल्याबद्दल थोरातांना त्या काळी ‘डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस ऑर्डर’ हे सध्याच्या ‘महावीरचक्रा’च्या दर्जाचे शौर्यपदक बहाल करण्यात आले.
भारताची 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' असावी असा निर्णय १९४५मध्ये घेण्यात आला. ही योजना तयार करून कार्यवाही करण्यासाठी थोरात यांना ब्रिगेडियरपदी पदोन्नती देण्यात आली. केवळ थोरात यांच्या प्रयत्नामुळेच ही प्रबोधिनी महाराष्ट्रात पुण्यातील खडकवासला येथे उभी राहिली.
देशाची फाळणी झाल्यानंतर थोरात यांनी सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याचे मोठे कार्य केले. प्रक्षोभक आणि स्फोटक वातावरणाच्या राजधानीत दिल्ली एरिया कमांडरच्या पदावर असताना तेथील परिस्थिती कोणाची भीडभाड न राखता थोरातांनी कणखरपणे हाताळली.
याच काळात शेकडो संस्थाने भारतात विलीन झाली. तेव्हाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ही नाजूक समस्या कणखरपणे व कुशलतेने सोडविली. त्या वेळी विविध संस्थानांच्या सैन्यांतील आवश्यक त्या अधिकारी व सैनिकांना भारतीय सैन्यात सामावून घेण्याचे काम थोरात यांच्यावर सोपविण्यात आले. ते त्यांनी समर्थपणे पार पाडले.
१९५३मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने भारत सरकारला कोरियामध्ये ‘कस्टोडियन फोर्स’ पाठविण्याची विनंती केली. या जबाबदारीच्या कामावर कमांडर म्हणून थोरातांची नियुक्ती झाली. त्यांच्या आधिपत्याखाली पाच हजार जणांची सेना होती. अमेरिका, चीन, दक्षिण व उत्तर कोरिया यांच्यातील धुमश्चक्रीत कोरियाचा सत्यानाश झाला होता. उत्तर कोरियाचे पंचावन्न हजार कैदी काबूत ठेवून त्यांच्या पुनर्वसनाच्या व्यवस्थेची अतिशय जोखमीची जबाबदारी थोरात यांच्या शिरावर येऊन पडली.
एका स्फोटक प्रसंगी उत्तर कोरियन कैद्यांच्या चिडलेल्या तुकडीने एका भारतीय अधिकार्याला ओलीस धरून हाताला मिळेल त्या साधनांनी थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला केला.
थोरात यांनी ही कठीण परिस्थिती अशा कौशल्याने हाताळली, की जीवावर उठलेल्या कैद्यांचा जथा थोरात यांचा जयघोष करीत माघारी गेला. सर्व जगात थोरात यांच्याबरोबरच देशाचीही मान उंचावली गेली. या असामान्य धैर्यासाठी त्यांना ‘अशोकचक्र’ (वर्ग २) हा वीरसन्मान देण्यात आला. त्यानंतर त्यांची पूर्व पंजाबच्या एरिया कमांडरपदी नियुक्ती झाली. फाळणीमध्ये मुख्यत्वे सिंध व पंजाब प्रांताचे तुकडे पडले होते. तेव्हा राजस्थानपासून ते पूर्व व पश्चिम पंजाबमधील पठाणकोटपर्यंत संरक्षण रेषा आखण्याचे व या नव्या सरहद्दीवर संरक्षक ठाणी बांधण्याचे जोखमीचे व दूरगामी परिणाम करणारे काम थोरात यांनी तडीस नेले.
थोरातांचे युद्धातील कर्तृत्व, फाळणीच्या काळात केलेले विविध प्रकारचे कार्य आणि अजोड बुद्धिमत्ता लक्षात घेऊन, सर्वांत ज्युनियर मेजर जनरल असूनही जनरल करिअप्पा यांनी त्यांना ‘चीफ ऑफ जनरल स्टाफ’ या अतिमहत्त्वाच्या पदावर नियुक्त केले. या पदावर असताना त्यांना प्रामुख्याने परराष्ट्रातून भारतावर हल्ले झाल्यास त्याला तोंड कसे द्यायचे यावर संभाव्य लढाईचे आराखडे तयार करण्याची जबाबदारी होती.
१९५७ ते ५९ या काळात त्यांनी ईशान्य सरहद्द प्रांत (नेफा- सध्याचा अरूणाचल प्रदेश) या प्रदेशातील पहाड, दऱ्या, खिंडी अक्षरश: पायाखाली तुडवून या सीमेवरचे गांभीर्य जाणले. भारतावर कोणत्या देशाकडून आणि कुठल्या सरहद्दीवरून हल्ला होण्याची शक्यता आहे व तो परतवून लावण्यासाठी कशी योजना आखावयास हवी, याचा आराखडा व आकडेवारीसह तपशीलवार समग्र अहवाल स्पष्ट व परखड शब्दांत, पदाची तमा न बाळगता, दि.८ ऑक्टोबर १९५९ रोजी तेव्हाचे सरसेनापती जनरल थिमय्यांच्या शिफारशीसह संरक्षणमंत्री व्ही.कृष्ण मेनन यांना सादर केला. मेनन यांनी त्याची दखल घेतली नाहीच; पण त्याउलट भारत-चीन संबंध मैत्रीचे असून थिमय्या-थोरात यांच्यासारखे ज्येष्ठ सैनिकी अधिकारी अकारण या गोष्टीचा बाऊ करीत असल्याचा शेरा मारला व त्यांची हेटाळणी केली. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचाही तसाच समज करून दिला. त्यांच्या या अहवालाचा परिणाम त्यांना सरसेनापतीपद न मिळण्यात झाला. ते १९६१मध्ये प्रदीर्घ सैनिकी सेवेतून निवृत्त झाले.
त्यांच्या निवृत्तीनंतर काही महिन्यांतच चीनने भारतावर हल्ला केला. चीनच्या या अनपेक्षित कृतीमुळे भारतातील तमाम नेत्यांना धक्का बसला. त्या वेळी थोरात यांनी तीन वर्षांपूर्वी दिलेल्या अहवालाची सर्वांना प्रकर्षाने आठवण झाली.
त्यांच्या त्या अहवालातील भाकितानुसारच चीनने नेफातून हल्ला केला होता. त्यांच्या अहवालाचा जर स्वीकार केला गेला असता, तर कदाचित भारतावरील नामुष्की टाळता आली असती. लष्करातील त्यांच्या अतुलनीय सेवेबद्दल भारत सरकारने त्यांना ‘कीर्तिचक्र’, तसेच ‘पद्मश्री’ सन्मान देऊन गौरविले. महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर, १९६१मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांची राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केली. या पदावरही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला.
१९६२मध्ये त्यांनी कोल्हापूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविली. त्यांनी आपल्या सैनिकी जीवनाचे आत्मचरित्र, ‘रिव्हेली टू रिट्रीट’ या नावाने लिहिले आहे.