Skip to main content
x

थत्ते, विनायक नारायण

      डॉ. विनायक नारायण थत्ते यांचा जन्म अमरावती, येथे व महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथील विज्ञान महाविद्यालयात झाले. १९१९ साली त्यांना अलाहाबाद विद्यापीठाची भौतिकशास्त्रातील एम.एस्सी. पदवी मिळाली. (त्या काळी नागपूरची सर्व महाविद्यालये अलाहाबाद विद्यापीठाशी संलग्न होती; नागपूर विद्यापीठाची स्थापना नंतर झाली.) इ.स. १९२७-१९२९ या काळात त्यांनी लंडन विद्यापीठात भौतिकशास्त्रात, प्रा. पोर्टर आणि प्रा. आंद्रेड यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले व त्याबद्दल त्यांना नागपूर विद्यापीठाने १९३५ साली डी.एस्सी. ही शास्त्र शाखेतील सर्वोच्च पदवी दिली.

      इ. स. १९१९ ते १९५४ या ३६ वर्षांच्या दीर्घ काळातील, डॉ. थत्ते व त्यांचे सहकारी यांचे संशोधनात्मक निबंध, फिलॉसॉफिकल मॅगझिन (हे जगातले बहुधा सर्वांत जुने, विज्ञानविषयक संशोधन निबंध प्रसिद्ध करणारे मासिक आहे. या मासिकात फॅरॅडे, ज्यूल, मॅक्सवेल, जे.जे. थॉम्प्सन, रेले, रूदरफोर्ड वगैरे दिग्गजांचे शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत) आणि झेट एफेल फिजिक (टाइम फॉर द रीडर्स ऑफ फिजिक्स) या मासिकांत प्रसिद्ध झालेले आहेत. असेंद्रीय संयुगे आणि रमण परिणाम, निरनिराळ्या स्फटिकांतून होणारे प्रकाशाचे वक्रीभवन आणि त्यांची संरचना, वगैरे विषयांवर मुख्यत: प्रकाशिकी क्षेत्रात त्यांनी मूलभूत संशोधन केले आहे.

     १९४७-१९५४ या स्वातंत्र्योत्तर काळात त्या वेळच्या मध्यप्रदेश शासनाने विद्यापीठासाठी आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी, विज्ञानाची, मराठी व हिंदी भाषांत पाठ्यपुस्तके लिहिण्याचा प्रकल्प राबविला. नागपूर माध्यमिक शिक्षण मंडळाची १९५० सालाची मॅट्रिकची परीक्षा, मराठी आणि हिंदी माध्यमातून झाली. मातृभाषेच्या माध्यमाला पर्यायच ठेवला नव्हता. स्वतंत्र भारतात मातृभाषेच्या माध्यमातून विद्यापीठाच्या स्तरापर्यंत सर्व विषयांत शिक्षण देणे आवश्यक आहे, हा नागपूर विद्यापीठाने तातडीने घेतलेला निर्णय म्हणजे शिक्षण क्षेत्रातील फार मोठे संक्रमण होय. डॉ.थत्ते या समितीचे प्रमुख आधारस्तंभ होते. या योजनेत त्यांनी स्वत: भौतिकशास्त्रावर, इंटर सायन्स आणि बी.एस्सी. स्तरावर दोन्ही भाषांत अनेक पुस्तके लिहिली आणि इतर शास्त्र शाखांसाठी तज्ज्ञांकडून लिहून घेतली. मराठी आणि हिंदी माध्यमांसाठी विज्ञानाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात डॉ. थत्ते यांचे प्रयत्नच कारणीभूत आहेत. मातृभाषेतून शिक्षणाचा भारतातील हा पहिलाच प्रयत्न होता. त्यांनी इंग्रजी-मराठी शास्त्रीय परिभाषेच्या अनेक पुस्तिकाही लिहिल्या. ३१ जानेवारी १९८२ रोजी त्यांच्या निवृत्तीचा सत्कार समारंभ नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली झाला. त्या वेळी ‘डॉ.वि.ना. थत्ते सायन्स फाउंडेशन’ ही संस्था डॉ.थत्ते यांचे विद्यार्थी व चहाते यांनी स्थापन केली. या न्यासाच्या वतीने दरवर्षी नागपूर येथे नामवंत वैज्ञानिकांची दोन भाषणे होतात. मराठी विज्ञान परिषदेचा नागपूर विभाग १५ सप्टेंबर १९६८ रोजी स्थापन झाला. तेव्हापासून डॉ.थत्ते यांनी त्या विभागाचे एक तपाहून अधिक काळ अध्यक्षपद भूषविले. मराठी विज्ञान परिषदेने १९७० साली नागपूर येथे संपन्न झालेल्या पाचव्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनात ज्येष्ठ वैज्ञानिक म्हणून त्यांचा जाहीर सन्मान केला.

— गजानन वामनाचार्य

थत्ते, विनायक नारायण