Skip to main content
x

उदगावकर, जयंत भालचंद्र

     यंत भालचंद्र उदगावकर यांचा जन्म मुंबईत झाला. शालेय आणि पदवीपर्यंतचे शिक्षणही मुंबईत झाले. अतिशय बुद्धिमान असलेल्या उदगावकरांनी १९७९ साली मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्र घेऊन बी.एस्सी. पदवी मिळवली. त्या वेळी विद्यापीठातून प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. पदवी परीक्षेतील या यशामुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे त्यांनी मद्रास (चेन्नई) आय.आय.टी.त एम.एस्सी.करिता प्रवेश घेतला. तिथे १९८१ साली त्यांनी रसायनशास्त्रात एम.एस्सी. पदवी संपादन केली. त्यानंतर अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात जीवरसायनशास्त्र विभागातील पेशी आणि रेण्वीय जीवशास्त्र उपविभागात संशोधन केले. या पाच वर्षांतील जीवरसायनशास्त्रातील संशोधनामुळे कॉर्नेल विद्यापीठातून त्यांना १९८६ साली पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यानंतर १९८९ सालापर्यंत त्यांनी अमेरिकेतील स्टॅन्फोर्ड विद्यापीठात पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून ‘प्रोटीन फोल्डिंग’ या विषयावर संशोधन केले. त्या वेळी त्यांना जेन कॉफिन चाइल्ड्स मेमोरियल फंडाची फेलोशिप मिळाली होती.

     १९९० साली ते भारतात परतले. त्यानंतर ते ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’च्या बंगलोर येथील ‘सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस’ येथे ‘रीडर’ या पदावर रुजू झाले. सहप्राध्यापक, प्राध्यापक आणि विभागप्रमुख अशा बढत्या मिळवत ते तिथे कार्यरत आहेत. १९९७ सालापासून या केंद्रात होणाऱ्या संशोधन कार्याचे प्रमुखपद त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

     या कामगिरीमुळे उदगावकर यांना अनेक वेळा फेलोशिप, पारितोषिके आणि पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये १९९१ ते १९९५ सालांदरम्यान मिळालेली रॉकफेलर फाउंडेशनची फेलोशिप, १९९७ साली भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडून मिळालेली फेलोशिप (या फेलोशिपसाठी  जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील पन्नास वर्षांखालील वयाच्या फक्त दोनच भारतीय शास्त्रज्ञांची निवड झाली होती,) १९९६ साली मिळालेला बी.एम. बिर्ला पुरस्कार, १९९८ साली, भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त दिलेली स्वर्णजयंती फेलोशिप (भारतातील ४० वर्षांखालील निवडक अकरा शास्त्रज्ञ, डॉक्टर व अभियंता यांमधील एक) आणि २००० साली जीवशास्त्रातील उत्कृष्ट कामगिरीकरिता तरुण शास्रज्ञ म्हणून मिळालेला शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार यांचा प्रामुख्याने समावेश आहे. इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसचे ते १९९६ सालापासून व इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे २००२ सालापासून फेलो आहेत. त्यांचे त्र्याहत्तरच्यावर शोधनिबंध देशातील व परदेशातील नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले आहेत.

     जयंत उदगावकरांच्या संशोधनासंबंधी थोडक्यात माहिती जीवविज्ञानातील एक कुतूहल निर्माण करणारी गोष्ट म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला हजारो प्रथिने स्वत:च स्वत:चा विशिष्ट आकार धारण करतात, जो त्यांच्या कार्याची गुरुकिल्ली ठरतो. नवीन अमायनो आम्लांची साखळी वाकते, स्वत:भोवतीच गुंडाळली जाऊन वलय रूप घेते, पिळवटते, स्वत:तच कोसळते व स्वत:चा अंतिम आकार साकारते. अमायनो आम्लांतील रासायनिक आकर्षणामुळे ही पुनर्रचना होते. डी.एन.ए. ज्या तऱ्हेने अमायनो आम्लांची गणिती अचूकतेने क्रमवारी लावतो, त्याचे आपणांस ज्ञात असलेल्या ज्ञानाच्या संपूर्ण विरोधात रासायनिक दाब, जो या दुमडण्यास दिशा देतो, त्याविषयी अपूर्ण ज्ञान आहे. तसेच ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे.

     प्रथिनांच्या रचनेचा अपेक्षित नमुना हा शास्त्रातला ‘होलीएस्ट ग्रेल’ समजला जातो. याच्यामुळे जीव-आयुर्विज्ञानात अविश्वसनीय फायदे मिळण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या प्रयोगशाळेत या विषयावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. खर्‍या घटनांवरील निरीक्षणांवर, ज्यामध्ये प्रथिनांचे दुमडणे, उलगडणे, अर्धवट दुमडणे, चक्षुर्वैसत्यं चालते, हा पूरक व गणनविधीवर आधारित असलेल्या प्रतिकृतीजवळ जाण्याचा खरा मार्ग. अगदी लहान प्रथिने वापरून व जे तंत्रज्ञान नॅनो ते मायक्रोसेकंदात पृथक्करण मापू शकते, ते वापरून हे विशिष्ट आकार घेण्याचे कोडे सोडवण्याविषयी निर्माण होणारे प्रश्‍न उदगावकर आणि त्यांचे सहकारी हाताळत आहेत. प्रथिने हळूहळू आकार घेतात की झटक्या-झटक्यात घेतात? प्रत्येक प्रथिनाचा दुमडण्याचा एकच क्रम असतो का? हे दुमडणे पेशीय स्थितीला किती संवेदनशील असते? अगोदर काय होते? आकाराचा बाह्य आराखडा की संपूर्ण तपशील? त्यांची निपुणता त्यांनी, प्रथिन दुमडण्याकडे व अगदी अलीकडे अपूर्ण दुमडण्याकडे, लावली आहे. या अपूर्ण दुमडण्याकडे प्रथिने एकमेकांना चिकटून तंतुमय पुंज तयार करतात. अल्झायमर्स हा चेतातंतुर्‍हासाचा रोग हा त्याचा परिणाम. अल्झायमर्ससारखा रोग का होतो ते शोधण्याचे ध्येय उदगावकर आणि त्यांचे सहकारी यांच्यासमोर आहे. आपल्या वडिलांचा - प्रा.भालचंद्र उदगावकरांचा - संशोधनाचा वारसा जयंत उदगावकर समर्थपणे चालवत आहेत.

     - मृणालिनी साठे / दिलीप हेर्लेकर

उदगावकर, जयंत भालचंद्र