Skip to main content
x

वाडिया, आर्देशीर करसेटजी

      लंडन येथील रॉयल सोसायटीचे पहिले भारतीय फेलो म्हणून २७ मे १८४१ रोजी निवडले गेलेले आर्देशीर करसेटजी वाडिया मुंबईतील एक सागरी अभियंता होते. एस. रामानुजन हे गणितज्ञ रॉयल सोसायटीचे फेलो होण्याआधी ७५ वर्षे वाडिया फेलो झाले होते.

      वाडियांचे कुटुंब जहाजबांधणी क्षेत्रात अग्रेसर होते आणि त्यांनी या क्षेत्रात ब्रिटिशांची खूप सेवा केली होती. या घराण्याचे संस्थापक कौजी नुसरवानजी (वाडिया) सुरत गोदीत सुतार होते. एक नवीन गोदी तयार करण्यासाठी त्यांना मुंबईला आणण्यात आले. मलबारी सागवान लाकूड आणि स्थानिक कारागिरीच्या बळावर मुंबई जहाजबांधणीचे एक प्रमुख केंद्र बनले. जहाजबांधणी व्यवसायातून वाडिया कुटुंबाला मोठा मानमरातब मिळाला. सरकारने या कुटुंबाला चांदीच्या वस्तू, शाली आणि हुद्यांबरोबरच जहागिरीही इनाम दिल्या.

     वाफेवर चालणाऱ्या इंजिनामुळे जहाजबांधणी उद्योगास कलाटणी मिळण्यास सुरुवात झाली. त्याच वेळी एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्याच दशकात वाडियांचा जन्म मुंबईमध्ये झाला. नौवहनात क्रांती घडविणाऱ्या वाफेच्या यंत्रसामग्रीमध्ये वाडियांना जहाजबांधणीपेक्षा जास्त रस होता. म्हणूनच उत्तम नौकांच्या बांधणीचे अधीक्षक म्हणून काम करण्याऐवजी टाकसाळ अभियंता (मिंट इंजिनिअर) म्हणून त्यांनी काम सुरू केले. या कामातून मिळणाऱ्या फावल्या वेळेत त्यांनी वाफेच्या यंत्रसामग्रीचा अभ्यास करण्यास आणि फाउण्ड्री व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केली.

      लवकरच एक अश्वशक्तीचे इंजीन तयार करून त्यांनी आपली क्षमता सिद्ध करत आपल्या जागेत त्याची उभारणी केली. त्याचा वापर करून विहिरीतल्या पाण्यास बाहेर खेचून छोटे कारंजे सुरू केले. भारतामध्ये बनलेले हे पहिले इंजीन होते आणि ते एका दशकाहून अधिक काळ उत्तम प्रकारे चालले. १८३३ साली वाडियांनी इंग्लंडहून १० अश्वशक्तीचे इंजीन मिळवले आणि ‘इंडस’ नावाच्या बोटीस बसवले. इंजीन आणि बोट दोन्हींसाठीचे पैसे त्यांच्या वडिलांनी पुरवले. ‘ट्युलिंड्स’ ह्या पहिल्या स्टीमरनंतर चार वर्षांनी ‘इंडस’ हे दुसरे स्टीमर मुंबईत बांधण्यात आले. त्यानंतर मुंबई इलाख्याच्या सरकारने ते खरेदी केले. वाडियांना त्यांच्या प्रयत्नांचे फळ मिळाले. ऑक्टोबर १८३३ मध्ये त्यांना माझगाव गोदीत सहायक बांधणीतज्ज्ञाचे (असिस्टंट बिल्डर) पद बहाल करण्यात आले. सागरी अधीक्षकांच्या शिफारशीने खास वाडियांसाठी हे पद निर्माण करण्यात आले होते.

     वाडियांनी स्वत:च्या राहत्या घरी अत्यंत फायद्यातील फाउण्ड्री सुरूच ठेवली होती. त्यांनी २२,००० लिटरहून अधिक क्षमतेच्या जहाजांसहित विविध प्रकारच्या जहाजांसाठी घडीव लोखंडाच्या टाक्या बनविल्या.

     १८३४ साली त्यांनी गॅसचा उपयोग करून प्रकाश यंत्रणा उभारून स्वत:चा माझगाव येथील बागबगिचा आणि बंगला प्रकाशमान केला. तत्कालीन मुंबई इलाख्याच्या गव्हर्नरांनी त्यांना मानाची वस्त्रे प्रदान करून सन्मानित केले. त्याचबरोबर, ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाच्या नजरेसदेखील ही बाब आणली.

     नुकत्याच स्थापन झालेल्या एल्फिन्स्टन संस्थेने करसेटजींच्या अंशकालिक सेवांची मागणी केली. संस्थेकडे गणित, खगोलशास्त्र आणि ‘नॅचरल फिलॉसॉफी’ (विज्ञान) चे ब्रिटिश प्राध्यापक होते; पण व्यावहारिक प्रायोगिक विज्ञानासाठी कोणीही नव्हते. स्थानिकांना शिकविण्यासाठी वाडियांना यांत्रिकी आणि रसायन विज्ञान विषय देण्यात आले. तीन वर्षांनी रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ इंग्लंडचे अनिवासी सदस्य म्हणून त्यांची निवड झाली.

     वाडियांनी इंग्लंडमध्ये जाऊन वाफेवर चालणाऱ्या इंजिनाबाबतचे स्वत:चे ज्ञान वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांना सरकारच्या परवानगीची गरज होती. परंतु, त्यांचे मुंबईहून प्रयाण नियोजित दिवसापेक्षा खूपच लांबले. प्रथम ते चीनला जाऊन आले. त्यानंतर एका शासकीय जहाजावर त्यांची मोफत सोय करण्यात आली, पण त्या वेळी ते आजारी पडले. एका वर्षानंतर १००० रुपये भरून त्यांनी त्याच बोटीतून प्रवास केला.

     ते कर्मठ वृत्तीचे असल्यामुळे केवळ पारशांच्याच हातचे अन्न ग्रहण करत, म्हणून त्यांनी नोकरही बरोबर घेतले होते. ते कोणत्याही बिगर पारश्याच्या सोबतीने जेवत नसत. इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर त्यांनी स्वत:च्या मानास योग्य प्रकारच्या राहणीमान भत्त्याची मागणी संचालक मंडळाकडे केली. त्यांना मुंबईच्या मासिक ७९ रुपयांच्या पगारासह वार्षिक एक पौंडाचा भत्ता मंजूर करण्यात आला. इंग्लंडमधील त्यांच्या वास्तव्यात केवळ वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा अभ्यास एवढेच मर्यादित उद्दिष्ट न ठेवता, त्यांनी अनेक गोष्टींमध्ये भाग घेतला. त्यांनी संसदेच्या हाउस ऑफ कॉमन्सच्या अफूविषयक बैठकीत कंपनीच्या धोरणाविरुद्ध मत व्यक्त केले.

     त्यांना लंडन फारसे आवडले नाही. तिथली शाही टाकसाळ त्यांना मुंबईच्या तुलनेत हलक्या दर्जाची वाटली. तिथले रस्ते मुंबईच्या तुलनेत हलक्या दर्जाचे वाटले. व्यावसायिकदृष्ट्या विचार करता, वाडियांचा ब्रिटिश दौरा यशस्वी ठरला. ते ‘इन्स्टिट्यूशन ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स’चे सदस्य झाले. त्यांनी ‘सोसायटी ऑफ आटर्स अ‍ॅण्ड सायन्स’चे सदस्यत्व घेतले. त्याच वेळी ‘ब्रिटिश असोसिएशन ऑफ द अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ सायन्सचे’ही ते सभासद झाले. कंपनीच्या मुंबई येथील स्टीम फॅक्टरी आणि फाउण्ड्रीमध्ये मुख्य अभियंता आणि यंत्र निरीक्षक म्हणून दरमहा ६०० रुपये पगारावर त्यांची नियुक्ती झाली. त्याच वेळी ते रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवडले गेले. त्यांचे नाव काही प्रतिष्ठित व्यक्तींनी सुचवले होते.

     १९१८ साली जेव्हा रामानुजन फेलो म्हणून निवडले गेले, तेव्हा अनेक प्रतिष्ठित शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या रॉयल सोसायटीची वैज्ञानिक संस्था म्हणून प्रतिमा निर्माण झाली होती. मात्र, एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस तशी स्थिती नव्हती. रॉयल सोसायटी ‘नैसर्गिक इतिहासात रुची असणाऱ्या’ उच्चभ्रू लोकांचा एक क्लब होता. त्यांना गणित आणि अभियांत्रिकीत रुची होती आणि विविध प्रकारच्या प्रयोगशील तत्त्वज्ञानाची आवड होती. सोसायटीच्या तत्कालीन मापदंडांनुसार वाडियांचे वर्गीकरण एक अलौकिक अभियंते आणि विज्ञानाशी संलग्न असलेले आणि त्याचा प्रसार करण्यासाठी उत्सुक असलेले गृहस्थ म्हणून झाले असावे.

      दरम्यानच्या काळात ते भारतात परतले आणि १ एप्रिल, १९४१ रोजी त्यांनी नवीन कार्यभार स्वीकारला. युरोपियन लोकांपेक्षा वरच्या हुद्यांवर नियुक्त झालेले ते पहिले स्वदेशीय स्थायिक होते. त्यामुळे युरोपीयांना ही बाब सलू लागली. ‘बॉम्बे टाइम्स’ या तत्कालीन वसाहतवादी शासकांची बाजू घेणाऱ्या वर्तमानपत्राला हे अजिबात आवडले नाही. त्यांनी तसे मत वृत्तपत्रातून व्यक्त केले देखील. वाडियांनी या कामात आपली चमक दाखवली. त्यांनी अमेरिकेला भेट देऊन मुंबईला पाठविण्यासाठी लाकूड कापण्याच्या यंत्रांची निवड केली.

     फेब्रुवारी १८५१ मध्ये त्यांनी लौजी फॅमिली नावाचे एक ८० टनांचे स्टीमर तयार केले. याचे वैशिष्ट्य असे की, त्याच्या प्रत्येक घटकाची निर्मिती स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे आर्देशीर वाडियांच्या स्वत:च्या घरी असलेल्या स्वत:च्या मालकीच्या फाउण्ड्रीत करण्यात आली. नंतर त्यांनी मुंबईकरांना शिवणयंत्र, फोटोग्राफी आणि इलेक्ट्रोप्लेटिंगचा परिचय घडवला. १८५५ साली त्यांची ‘जस्टीस ऑफ पीस’ म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या स्मरणार्थ पोस्ट खात्याने ‘पायोनियर’ व ‘इनोव्हेटर’ या शीर्षकाची तिकिटे काढली होती. आर्देशीर करसेटजी वाडिया यांचा मृत्यू इंग्लंडमधील रिचमंड येथे झाला.

शैलेश माळोदे

वाडिया, आर्देशीर करसेटजी